आस्वाद

जेव्हा शिक्षण व्यवसाय बनतं

– शिल्पा पंडित

शिका, लिहा, पुढे चला…लहानपणापासून आपण हे ऐकत आलो. पण आज ही ओळ अपुरी वाटते. आता ती अशी झाली आहे – शिका, लिहा आणि वडिलांकडे पैसा असेल तरच पुढे चला. कारण आज शिक्षण म्हणजे ज्ञान नाही, तर पैसा झाला आहे.
एखाद्या मुलाला दहावीत 96% गुण मिळतात. पालकांना वाटतं, चला, आता चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल. पण कॉलेज सांगतं – सीट फुल आहे मॅनेजमेंट कोट्यात घ्या फक्त पाच लाख डोनेशन. 96% मिळवलेलं मूल घरी बसतं आणि 65% मिळवलेलं मूल पैशाच्या जोरावर प्रवेश घेतं. बिल नाही, पावती नाही फक्त रोख व्यवहार.
आज प्रत्येक शहरात हीच परिस्थिती आहे. शाळांमध्ये फॉर्म मिळण्याआधीच 50 हजार ते पाच लाख डोनेशन मागितलं जातं. दरवर्षी फी 15% ने वाढते. इंजिनिअरिंगच्या जागा 20 ते 40 लाखांत विकल्या जातात.. हे शिक्षण आहे की सरळसरळ धंदा? फी भरा नाहीतर प्रवेश नाही. मध्यमवर्गीय पालक तुटत चालले आहेत. मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं जातं, सोनं विकलं जातं, जमीन गहाण ठेवली जाते.
22 वर्षांचा तरुण नोकरी सुरू होण्याआधीच 30 लाखांच्या शिक्षण कर्जाखाली दबला जातो. पहिल्या पगारापूर्वीच EMI सुरू होते. घर, लग्न, स्वप्नं सगळं पुढे ढकललं जातं. आणि एवढं करून मिळतं तरी काय? एका वर्गात दर महिन्याला शिक्षक बदलतात. आज फिजिक्स शिकवणार्‍या मॅडम उद्या गायब कारण पगार मिळाला नाही. पुढच्या आठवड्यात नवीन सर येतात आणि  YouTube  वरून धडा वाचून दाखवतात.
पालक विचारतात- आम्ही शिक्षणासाठी पैसे भरतोय की फक्त मोठ्या इमारतीसाठी? शाळा प्रत्येक विद्यार्थ्याकडून 15 हजार फी घेतात पण शिक्षकांना 12-15 हजार पगार देतात. मग उरलेला पैसा जातो कुठे? लायब्ररीत? प्रयोगशाळेत? शिक्षक प्रशिक्षणात?
नाही.
तो पैसा जातो नवीन एसी बसमध्ये, मार्बल फ्लोअरिंगमध्ये आणि मालकाच्या नव्या गाडीत.
समाजाचं खरं नुकसान आज गुणवत्ता मरत चालली आहे. हुशार मुलगा डॉक्टर होऊ शकत नाही कारण त्याच्याकडे पैसे नाहीत. उद्या कमी गुणवत्तेचा, पण श्रीमंत विद्यार्थी आपला उपचार करणार आहे. त्याचा फटका अख्ख्या समाजाला बसणार आहे. प्रामाणिकपणा हास्यास्पद वाटू लागला आहे.
पाच वर्षांचं मूल पाहतं – बाबा नर्सरी प्रवेशासाठी लिफाफ्यात पैसे देत आहेत.
18 वर्षांचं होताना त्याला एक गोष्ट समजते- नियम गरिबांसाठी असतात. पैसा सर्वकाही विकत घेतो. भ्रष्टाचाराची पहिली शिकवण शाळेतच सुरू होते.
स्वप्नांची हत्या
महाराष्ट्रातील एखाद्या शेतकर्‍याची मुलगी 98% गुण मिळवते, पण मेडिकलसाठी 70 लाखांचे डोनेशन परवडत नाही आणि पुढे घरातच बसते. आपण एक चांगली डॉक्टर गमावतो आणि ती तिचं आयुष्य.
जीवन म्हणजे EMI आणि संघर्ष
लहान मुलं घरात फीच्या तणावात वाढतात. त्यांना वाटू लागतं – जीवन म्हणजे फक्त संघर्ष आणि ईएमआय.
आज अनेक विद्यार्थी आणि पालक शिक्षणाच्या तणावामुळे आत्महत्या करत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश मिळाला नाही म्हणून लोक स्वतःला संपवत आहेत. मराठी शाळा आणि सरकारी शाळा बंद पडत आहेत. प्रत्येक जण इंग्रजीच्या मागे धावत आहे.
पण प्रश्न असा आहे-
ज्या मराठी शिक्षणातून पिढ्या घडल्या त्याच शिक्षणाला आपण कमी का समजू लागलो?
वाढती फी घसरता दर्जा
दरवर्षी फी वाढते.
पण शिक्षण सुधारतं का?
शिक्षकांना प्रशिक्षण मिळतं का?
अभ्यासक्रम आधुनिक होतो का?
नाही.
फक्त भिंतींवर नवीन रंग चढतो
100% निकाल अशी जाहिरात केली जाते. पण तो निकाल विद्यार्थ्यांनी बाहेर घेतलेल्या तीन-तीन ट्युशन्समुळे आलेला असतो. श्रेय मात्र शाळा घेते.
आणि हे डोनेशन?
हा तर उघड काळा पैसा आहे.
ना हिशेब ना कर.
ही लूट आहे आणि आपण तिला स्वेच्छा देणगी म्हणतो. आता काय करायचं? सर्वप्रथम डोनेशन हा शब्द वापरणं बंद करा. ते सरळसरळ लाच आहे. कायद्यानुसार प्रवेशासाठी पैसे घेणं बेकायदेशीर आहे.
पावती मागा. पुरावे जमा करा. एक पालक तक्रार करेल तर काही होणार नाही पण 50 पालकांनी एकत्र शिक्षणाधिकार्‍यांकडे तक्रार केली तर व्यवस्थापन हादरेल.
ब्रँडेड कॉलेजच्या मागे धावणं थांबवा.
दोन लाखांचं सरकारी कॉलेज + YouTube/Coursera वरून शिकलेलं कौशल्य हे 40 लाखांच्या अशा कॉलेजपेक्षा चांगलं आहे, जिथे शिक्षक दर दोन महिन्यांनी बदलतात.
2026 मध्ये कंपन्या तुमचं कॉलेज नाही तर तुमचं कौशल्य पाहतात. आणि सर्वांत महत्त्वाचं- बोला.
एकत्र या. शाळा फी वाढवतात कारण आपण शांत राहतो. पालक एकत्र आले की व्यवस्थापनालाही भीती वाटते.
आपण कोणाच्या विचारांना विसरलो?
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी लढा दिला जेणेकरून सामान्य माणूस सन्मानाने जगू शकेल.
डॉ. आंबेडकर यांनी शिक्षणाचा अधिकार दिला जेणेकरून गरीब घरातील मुलगाही वकील, डॉक्टर, राष्ट्रपती होऊ शकेल आणि आज आपण तो अधिकार पैशाच्या काउंटरमध्ये बंदिस्त केला आहे.
जर गुण, जिद्द आणि स्वप्नं असलेलं मूल शिक्षणासाठी हात जोडत असेल तर अपयश विद्यार्थ्यांचं नाही तर संपूर्ण समाजाचं आहे.
शिक्षण हा व्यवसाय नाही.
शाळा हे दुकान नाही.
आणि मुलांचं भविष्य विक्रीसाठी ठेवलेली वस्तू नाही.
जोपर्यंत आपण हे समजत नाही तोपर्यंत लूट माजली आहे हेच आपल्या शिक्षण व्यवस्थेचं राष्ट्रगीत राहील.

When Education Becomes a Business

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

4 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago