– गोरख काळे
प्रभागातील समस्या व अडचणी सोडविण्यासाठी नगरसेवक हा प्रशासन व नागरिक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो. लोकप्रतिनिधी नागरिकांच्या समस्यांसाठी प्रसंगी सभागृहात प्रशासनाशी भांडतात. मात्र, हेच लोकप्रतिनिधी पवित्र असलेल्या सभागृहात वाद घालून महिला सदस्यांसमोरच शिवीगाळ करत असतील तर? सभागृहाची प्रतिष्ठा राखणार कोण? असा सर्वसामान्य प्रश्न उपस्थित होणारच. सिडको प्रभाग सभेत असाच प्रकार पाहावयास मिळाला. या राड्यानंतर तर अनेकांच्या तोंडी, ही प्रभाग सभा आहे की, शिव्या देण्याची कार्यशाळा? असे उपहासात्मकपणे बोलले जात आहे. दरम्यान, प्रभाग सभा ही नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी असते; निवडणुकीत झालेल्या वादाची भडास काढण्यासाठी नाही. याचे शुद्ध भान असते तर कदाचित सिडको प्रभाग सभेचा वाद टळला असता. भविष्यात पुन्हा असेे कृत्य सदस्यांनी केल्यास थेट सहा महिने निलंबनाचा निर्णय महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी महासभेत घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे भविष्यात सभागृहाची प्रतिष्ठा राखली जाईल.
सिडकोच्या प्रभाग सभेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा पवार) सहयोगी सदस्य मुकेश शहाणे यांच्यात जोरदार वाद सर्व शहराने पाहिला. या दोघांच्या वादामुळे मात्र शहराची व सभागृहाची पुरती प्रतिष्ठा मलिन झाल्याची तक्रार मंगळवारच्या (दि. 30 जून) महासभेत नगरसेवकांनी महापौर आहेर-आडके यांच्याकडे केली, तसेच याप्रकरणी संबंधितांना योग्य ती समज देण्याची मागणी केली. घडलेल्या प्रकाराबद्दल महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त करत यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला. त्यांच्या या निर्णयाचे महासभेतील सर्व सदस्यांनी स्वागत केले.
नाशिक महापालिकेत चार वर्षांची प्रशासकीय राजवट जानेवारीत संपुष्टात आली. सध्या शहरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे सुरू असल्याने सर्वत्र रस्ते फोडले आहेत. एमएनजीएलने गॅसवाहिनीसाठी मुख्य रस्त्यांसह अगदी कॉलनीअंतर्गत रस्ते फोडले आहेत. नागरिक यास कमालीचे वैतागले आहेत. शहरात रस्त्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत प्रश्न असून, दोन-तीन वर्षांपासून असमान पाणीपुरवठ्यामुळे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ड्रेनेजचीदेखील समस्या आहेच. धक्कादायक म्हणजे, काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी थेट नागरिकांच्या घरांत जात असल्याचे प्रकार घडत आहेत. विशेषत: सिडको विभागातच याबाबत सर्वाधिक समस्या असल्याने यावर उपाय म्हणून सिडकोतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाकडे एकमुखाने मागणी करण्याची आवश्यकता असताना, महापालिका निवडणुकीतील उट्टे काढण्यासाठी सभागृहाचा वापर कसा केला जाऊ शकतो, असा प्रश्न सिडकोतील नागरिकांना पडला असेल. आपल्याकडे एक म्हण आहे, झालं गेलं गंगेला मिळालं. याचा अर्थ असा की, भूतकाळात जे काही झालं असेल ते विसरून वर्तमानावर लक्ष केंद्रित करणे होय. मात्र, राजकारण्यांनी ही म्हण बाजूला केली आहे. याउलट राजकीय प्रतिस्पर्धी किंवा जुन्या वादामुळे संघर्षाला कोणीही पूर्णविराम देताना दिसत नाही. समोरच्याने आपलाला कसा त्रास दिला? हेच डोक्यात ठेवून सध्या आपल्याकडे राजकारण सुरू आहे.
वर्षाच्या सुरवातीलाच नाशिक महापालिकेच्या निवडणुका झाल्या. महाशक्ती असलेल्या भाजपचा एबी फॉर्म मिळविण्यासाठी तर पक्षांतर्गत अभूतपूर्व गोंधळ सर्वार्ंनी पाहिला. अगदी शहराध्यक्षांच्या गाडीचा पाठलाग काही इच्छुकांनी केला. सिडकोतही एबी फॉर्मवरून चांगलेच नाट्य रंगले. ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजरांनी एबी फॉर्म मुलाला दिल्याचा आरोप मुकेश शहाणे यांनी केला होता. त्यावेळी बडगुजर-शहाणे वाद पाहायला मिळाला. मुकेश शहाणे यांनी अपक्ष उमेदवारी करत प्रभाग 29 मधून बडगुजरांचे सुपुत्र दीपक बडगुजर यांचा पराभव केला. त्यानंतर आता निवडणूक होऊन सहा महिने होत आहेत, तरीही बडगुजर-शहाणे यांच्यातील वाद मिटत नसल्याचे चिन्ह आहे. 2024 च्या विधानसभेपासून या वादाला सुरवात होऊन महापालिका निवडणूक व आता थेट प्रभाग सभेपर्यर्ंत हा वाद आला आहे.
दरम्यान, सुधाकर बडगुजर कामगार सेनेचे अध्यक्ष असून, अधिकारी-कर्मचार्यांच्या समस्या सोडविण्यासाठी ते अग्रेसर असतात. कर्मचार्यांचे प्रश्न त्यांनी कामगार सेनेच्या माध्यमातून मार्गी लावले आहेत. महापालिकेत अद्याप सभागृह नेतेपदाची नियुक्ती झालेली नसून बडगुजर यांच्या नावाची चर्चा सुरवातीपासून आहे. मात्र, पक्षांतर्गतच त्यांना सभागृहनेते पद नको म्हणून काही जण पडद्यामागे सक्रिय असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, प्रभाग सभेतील राड्याप्रकरणी दोघांनीही दिलगिरी व्यक्त केली असली, तरी त्याने सभागृहाची जी बदनामी झाली, त्याचे काय? राजकारण करताना एकमेकांमध्ये संघर्ष असेलही मात्र, प्रभाग सभा किंवा महासभेत वैयक्तिक हेवेदावे बाजूला ठेवायला हवेत. महिला सदस्यांसमोर अर्वाच्च शिव्या दिल्या जात असतील, तर हा सभागृहाबरोबरच मतदारांचाही अनादर आहे. सभागृहात प्रभागातील समस्या व विकासावरच चर्चा अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधी झालो म्हणून आपण सभागृहापेक्षा मोठे आहोत. त्यामुळे सभागृहात काहीही बोलू, कसेही बसू, अधिकार्यांनादेखील काहीही बोलू, अशी मानसिकता डोक्यात असेल तर ती वेळीच काढून टाकायला हवी. कारण राजकीय अहंकार झालेल्यांना मतदारांनी याच नाशिकमध्ये घरी बसवले आहे, हे विसरून चालणार नाही. दरम्यान, गैरकृत्य करणार्यांना थेट सहा महिने निलंबित करण्याचा निर्णय महापौरांनी घेतल्याने भविष्यात सभागृहाची मानमर्यादा व प्रतिष्ठा कारवाईच्या भीतीने तरी जपली जाईल.
Who will uphold the dignity of the House?
पाक अंतर्गत अस्थिरतेकडे जम्मू-काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे उल्लंंघन होत असल्याचा आरोप करत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची सातत्याने बदनामी…
- राजेश शिरभाते देशात वरकरणी सारे काही चांगले चांगले दिसत असले, तरी अनेक घटनांमधून राजकारणी…
एकेकाळी मानवाने अंतराळाकडे प्रगती, संशोधन आणि भविष्याच्या आशेने पाहिले होते. आज मात्र त्याच अंतराळात मानवाने…
सिडकोतील अनेक भागांत साचले पाणी सिडको : प्रतिनिधी रात्रभर झालेल्या संततधार पावसामुळे सिडको परिसरातील जनजीवन…
चिखलातील वाहनाचे स्टेअरिंग घेतले हाती नाशिक : प्रतिनिधी भाजपासाठी संकटमोचक असलेले कुंभमेळामंत्री गिरीश महाजन हे…