‘शिवसेना’ कुणाची? 4 ऑगस्टला पुन्हा सुनावणी

ठाकरेंसाठी कपिल सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षाचे नाव, ’धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह आणि आमदारांच्या अपात्रतेशी संबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण वादावर प्रत्यक्ष सुनावणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर पार पडलेल्या या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. पक्षातील बंडखोरी, आमदारांचे वर्तन आणि घटनेतील 10 व्या अनुसूचीतील (पक्षबदल विरोधी कायदा) तरतुदींवर न्यायालयाने तातडीने निर्णय देणे कसे आवश्यक आहे, यावर त्यांनी भर दिला. न्यायालयाने या प्रकरणातील पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. सुनावणीदरम्यान उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी अत्यंत आक्रमक आणि घटनात्मक युक्तिवाद केला. एक नेता म्हणजे संपूर्ण राजकीय पक्ष असू शकत नाही, असा थेट आणि स्पष्ट शब्दप्रयोग करत सिब्बल यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जर पक्षांतराचा हा पॅटर्न स्वीकारला गेला, तर देशातील कोणत्याही राजकीय पक्षाची मूळ संघटना आणि घटनात्मक चौकट धोक्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाने आधीच निर्णय दिला असता, तर राज्यातील तत्कालीन सत्तांतर घडलेच नसते, याकडेही त्यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
निर्णय महत्त्वाचा- 4 ऑगस्ट 2026 रोजी होणारी पुढील सुनावणी या संपूर्ण प्रकरणाच्या दृष्टीने निर्णायक मानली जात आहे. सर्वोच्च न्यायालय यावर काय निकाल देते, यावर केवळ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचाच नव्हे, तर भविष्यातील भारतीय संसदीय लोकशाही आणि पक्षविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा नवा पायंडा ठरणार आहे. दोन्ही बाजूंचे वकील या दिवशी पुन्हा एकदा आमनेसामने येऊन अंतिम युक्तिवाद पूर्ण करण्याची शक्यता असून, संपूर्ण देशाचे लक्ष आता या ऐतिहासिक सुनावणीकडे लागले आहे.

Whose is the ‘Shiv Sena’? Hearing again on August 4.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *