परिणाम माहीत असूनही माणूस व्यसन का करतो?

हल्ली सगळीकडेच व्यसनांचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी नुकतेच नव्याने मिसरूड फुटलेली लहान मुलेसुद्धा व्यसन करण्यात पटाईत बनले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेचजण कोणतेना कोणते तरी व्यसन करतात. आणि लहान मुलांपासून ते वृद्ध माणसांपर्यंत सर्वांनाच व्यसनाचे दुष्परिणाम माहीत आहेत. तरीसुद्धा माणसे व्यसन का करतात? व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःचे जीवन बरबाद का करून घेतात? शरीर संपत्ती हीच खरी संपत्ती असते, हे सर्व लहानथोर माणसांना माहीत असूनही माणसे व्यसनाच्या आहारी जाऊन स्वतःच्या शरीराची हानी का करून घेतात? कळायला मार्ग नाही.
दारू, गांजा, सिगारेट, तंबाखू व गुटखे हे माणसाच्या विनाशाचे कारण ठरू शकतात. दारू व गांजा हे माणसांच्या शरीराची प्रचंड हानी करतात. दारू व गांजा यांच्या अति सेवनामुळे कित्येक माणसांचे जीवन बरबाद झाले आहे आणि कित्येक माणसे मृत्युमुखी पडले आहेत. ज्या घरातील पुरुष दारुडे असतात, त्या घरात कधीच सुखशांती नांदत नाही. नेहमी घरात धुसफूस व कलह सुरू असतात. दारूच्या व्यसनामुळे कित्येक जणांचे संसार उघड्यावर आले आहेत. दारुड्या व्यक्तीच्या बायका त्यांच्याजवळ जास्त काळ टिकत नाहीत. एकतर घटस्फोट घेऊन मोकळ्या होतात, नाहीतर आपल्या मुलाबाळांना घेऊन माहेरी राहतात. कोर्टात सर्वांत जास्त पती-पत्नीच्या वादाचे खटले रोज दाखल होत असतात. दारूमुळे लिव्हर निकामी होते, गुटखा व तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो. सिगारेट व गांजा पिल्याने फुफ्फुस निकामी होते. आणि सगळ्यांच्या सेवनाने माणसाचे जीवन नष्ट होऊन जाते. माणसाला एकदा लागलेले व्यसन हे सहजासहजी सुटण्याची शक्यता कमी असते.
एकदा व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस मरेपर्यंत व्यसन करण्याचा छंद सोडत नाही. एकदा त्याच्या शरीरात दारू भिनली की, मग मात्र माणूस त्या व्यसनाचा गुलाम होतो. आणि एकदा व्यसनाचा गुलाम झालेला माणूस मरेपर्यंत व्यसनाचा गुलामच राहतो. दारू हेच त्याचे जीवन होते. दारू पिली तर बरे वाटते, नाहीतर माणूस मनोरुग्ण होतो. दारू वेळेवर भेटत नसल्यामुळे कित्येक माणसे मनोरुग्ण झाले आहेत. आणि मनोरुग्ण होऊन स्वतःचे जीवन स्वतःच्या हाताने संपवून घेत आहेत. एखाद्या माणसाकडे कितीही पैसा असू द्या किंवा तो माणूस करोडपती वा अब्जाधीश असू द्या आणि त्या माणसाला जर दारूचे व्यसन लागले तर तो माणूस कधी रावाचा रंक होईल हे सांगता येत नाही. दारूमुळे आतापर्यंत कित्येक करोडपती भिकारी झाले आहेत. दारूची हवा पैशाची नशा एका झटक्यात उतरवते. म्हणून दारूचे व्यसन हे माणसासाठी खूप घातक व विनाशकारी आहे. आज आपल्या देशात जवळपास 90 टक्के लोक दारू पितात. यात नव्याने मिसरूड फुटलेल्या नवयुवकांचा सहभाग अधिक आहे.
प्रत्येक क्षेत्रातील बहुतांश नोकरदार लोक दारू पिल्याशिवाय आपले काम करत नाहीत. हल्लीची तरुणाई व्यसनाच्या अति आहारी गेल्यामुळे शिक्षण क्षेत्राच्या बाहेर फेकली जात आहे. खरे तर आपल्या देशाची खरी ताकद ही या देशातील तरुण असतात. आणि हेच तरुण जर शालेय जीवनापासूनच व्यसन करत असतील तर भविष्यात आपला देश विनाशाच्या उंबरठ्यावर उभा असेल, हे कोणालाही मान्य करावेच लागेल. देशाची प्रगती होण्याऐवजी देशाची अधोगती होत असेल तर मग आपला देश जगाची महासत्ता कधी होईल? देशाच्या विकासाचा आलेख न उंचावता खाली खाली येत असेल तर मग मात्र याला कारणीभूत आपल्या देशातील तरुण आहेत, असेच म्हणावे लागेल. त्यासाठी शासनाने माणसाच्या शरीराला नुकसान करणार्‍या व देशाच्या विकासाला बाधा आणणार्‍या सर्व प्रकारच्या विखारी नशा तयार करणार्‍या विनाशकारी दुकानांवर बंदी घालून भारताला नशामुक्त केले पाहिजे. त्यासाठी शासनाने सर्व प्रकारच्या नशा बनवणार्‍या कारखान्यांवर तत्काळ बंदी घालून देशाच्या विकासाचा आलेख उंचावला तर देशाची मानसुद्धा उंचावेल. कारण हल्ली दहा वर्षांच्या मुलापासून सगळ्याच जणांना व्यसनाचे दुष्परिणाम माहीत आहेत. आपला देश विकासाच्या दिशेने न जाता विनाशाच्या मार्गाने वाटचाल का करत आहे? याचे मुख्य कारण म्हणजे दारू हेच आहे, हे माहीत असूनसुद्धा लोक व्यसन करतात आणि स्वतःचे शरीर मृत्यूच्या खाईत लोटतात. म्हणून दारू बनवणार्‍या व दारू विकणार्‍या सर्व दुकानांवर कठोर कारवाई करून त्यांना कायमचे हे विनाशकारी धंदे बंद करायला भाग पाडावे. जोपर्यंत शासन स्वतःहून दारू व गुटखा बंद करणार नाही, तोपर्यंत देशात दारू व गुटखा अवैध मार्गाने चालूच राहणार आहे. त्यासाठी गरज आहे, ती शासनाने वेळीच दारू विकणार्‍या दारूविक्रेत्यांवर बंदी न घालता, अगोदर दारू तयार करणार्‍या कारखान्यांवर बंदी घालावी आणि देशाला नशामुक्त करावे, असे मला वाटते. दारूमुळे माणसांचे काय हाल होतात? हे शासनाला माहीत आहे. दारूमुळे लोकांची घरे कसे बरबाद होतात आणि त्यांचे संसार कसे उद्ध्वस्त होतात? हे सरकारसहित सर्वांनाच माहीत आहे. जर देशात दारू व गुटखे तयार करणारे कारखाने अस्तित्वात असतील तर दारू पिणारे हे पितच राहतील व विकणारे महाभाग विकतच राहतील आणि दारू पिणार्‍यांची संख्या कमी न होता वाढत जाईल आणि एक दिवस देश अधोगतीला जाऊन देशाचा विनाश नक्की होईल.
आपला भारत देश जगाच्या नकाशावरून कायमचा पुसला जाईल, असे मला वाटते. माणसाने शरीराला हानी पोहोचवणारे व्यसन न करता आपला शारीरिक व मानसिक विकास घडवणारे व्यसन केले तर ते सर्वोत्तम राहील. त्यासाठी माणसाने वाईट व्यसन सोडून चांगल्या व्यसनांना आत्मसात करावे. जसे की पुस्तकांचे वाचन व लेखन हे छंद माणसाचे जीवन घडवतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ज्या दिवशी दारूच्या दुकानाकडे व देवाच्या मंदिराकडे जाणार्‍या रांगा ग्रंथालयाकडे वळतील त्या दिवशी आपल्या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. तरुणांना विनंती आहे की, व्यसनाच्या आहारी जाऊन जीवनभर अविवाहित राहण्यापेक्षा चांगल्या व्यसनाचे छंद जोपासून विवाहित झालेले कधीही चांगले. कारण आजकाल व्यसनी मुलाला मुली भेटणे दुरापास्त झाले आहे.
देशात असे कित्येक युवक अविवाहित आहेत, जेणेकरून त्यांना दारूच्या व्यसनामुळे कोणीच मुलगी द्यायला तयार नाही. निर्व्यसनी मुलांना मात्र कोणीही मुलगी द्यायला तयार आहे. भलेही त्यांना नोकरी असो अथवा नसो. फक्त मुलगा निर्व्यसनी हवा, असे प्रत्येक मुलीचे पालक म्हणत आहेत. त्यासाठी जास्त न सांगता सगळ्यांनाच वाईट व्यसनाचे दुष्परिणाम माहीत आहेत… जीवनात कोणते व्यसन लावून घ्यायचे हे प्रत्येकाच्या मनावर आहे…चांगले व्यसन लावून घेतले तर त्याचे परिणाम चांगले होतील आणि वाईट व्यसनाच्या आहारी गेलात तर त्याचे परिणाम खूपच वाईट होतील म्हणून प्रत्येकाने जीवनात कोणते व्यसन करायला हवे? याचा विचार करून जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला तर ते उचित ठरेल, असे मला वाटते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *