महाराष्ट्र

आउटलेट कशाला हवा? – भाग ३

डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
इनलेटलाच फिल्टर लावा…!
नितीन देसाईंच्या अकाली जाण्याने काही विषय ऐरणीवर आले, काही प्रश्न उपस्थित झाले. नितीनजींसारख्या हाडाच्या व यशस्वी कलाकाराला आपला जीवनपट संपवण्याचा विचार का करावासा वाटला? अशी परिस्थतीच कशी निर्माण झाली? आर्थिक अडचण माणसाला आत्महत्या करण्यास विवश करू शकते का? त्यापेक्षा दुसरा कुठला मार्ग नव्हता का? परंतु, आता जे झाले ते होऊन गेले आहे, त्यात आता काही बदल होऊ शकत नाही.
आपल्या हाती केवळ त्यातून काहीतरी शिकवण घेऊन, आपल्या जीवनात गरजेनुसार बदल करून आपल्यावर आणि आपल्या परिजनांवर अशी वेळ येऊ नये, हे निश्चत करणे एव्हढंच आहे. याआधीच्या भागात “आउटलेट” असावे व ते कसे असावे, यावर आपण चर्चा केली आहे. प्रत्येकाला “आउटलेट” मिळेलच असे नाही, किव्हा “आउटलेट” निर्माण करता येईल असेही होऊ शकणार नाही. त्यापेक्षा, इनलेटलाच फिल्टर लावता आले, तर पुढील सर्व गोष्टी आपोआपच टाळल्या जातील, नाही का?
याच उद्देशाने ही लेखमालिका लिहितो आहे. या लेखातून जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी, लेखात सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनाशी संबंधित (रिलेट) करावे लागेल. तुमच्या बाबतीतही असे काही झालेले आहे का? होत आहे का? किव्हा होणार आहे का? असा प्रश्न स्वतःला विचारावा. मुळात, आपला जन्म आपल्यामुळे झालेला नाही. आपले आईवडील यासाठी निमित्तमात्र होते, त्यांच्या माध्यमातून आपण या जगी जन्मास आलो आहे.
त्यामागे एक अदृश्य शक्ती कार्य करते. ती दैवी / वैश्विक शक्ती किव्हा ऊर्जा आपल्यात सामावल्याने आपल्यात जीव (प्राण) प्रस्थापित झाला, म्हणून आपण अस्तित्वात आलो. स्त्री बीज आणि शुक्राणूचे संक्रमण झाल्याने एक पेशी तयार झाली, एकाच्या दोन पेशी झाल्या, दोनाच्या चार, मग आठ, सोळा, बत्तीस… असे करत लाखो, करोडो पेशी तयार झाल्याने आपले शरीर तयार झाले. नंतर आपला जन्म झाला आणि नंतर आयुष्यभर नवीन पेशी तयार होणे, जुन्या जीर्ण झालेल्या नष्ट होणे, असे चालूच रहाते. यात आपला सहभाग आणि आपले योगदान आहेच कुठे. हे सर्व त्या दैवी शक्तीने घडवून आणलेले आहे. त्या दैवी शक्तीला तुम्ही आम्ही देव, परमात्मा, परमेश्वर, अल्ला, येशू… वगैरे, असे संबोधतो. त्याला वेगवेगळे नावे दिलेली आहेत.
सांगण्याचे तात्पर्य असे की, आपले हे जीवन, आपला प्राण हा देवाने दिलेला आहे. जसे जन्मास येणे आपल्या हाती नाही, तसेच हे जीवन संपवण्याचा आपल्याला अधिकार नाही. नैतिक अधिकार तर नाहीच नाही, कायद्यानेही अधिकार नाही. आपण दुसऱ्याचा प्राण घेऊ शकत नाही, तसेच आपण आपला स्वतःचाही प्राण घेऊ शकत नाही. तो अधिकार आपल्याला नाहीच मुळी. आत्महत्या करणे कायद्याने गुन्हा आहे.
हा एकमेव असा गुन्हा आहे, जो करण्यात तुम्ही अयशस्वी झालात तर तुम्हाला शिक्षा होते, यशस्वी झालात तर तुमची मुक्तता होते. गंमतीचा भाग सोडा, परंतु स्वतःचा किव्हा दुसऱ्याचा प्राण घेणे हा अक्षम्य गुन्हा आहे. हे महापाप आहे, असे मी समजतो. त्यामुळे, जर आत्महत्येचा विचार आला तर, आपल्याला आपले प्राण घेण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार नाही, ही बाब लक्षात ठेवा. असे केल्याने, तो परमात्मा तुम्हाला कधीही माफ करणार नाही, कारण तो प्राण त्याचा आहे. हे प्रवचन नाही, की तत्वज्ञान ही नाही. हे शास्त्र आहे, तत्व आहे, वैश्विक सत्य आहे. हे समजून घेतले तर तुमच्या इनलेटला फिल्टर लावल्यासारखे होईल.
वरील तत्वानुसार, आपल्या प्रत्येकात त्या दैवी, वैश्विक शक्तीचा अंश आहे. म्हणजेच आपल्यात त्या देवाचा अंश आहे. याद्वारे आपण देव (ज्यावर तुमची श्रद्धा आहे) अशा तत्वाशी जुळलेले आहोत. मग जर तुमच्यातच देव आहे, तर तुम्ही हवं ते करू शकता, देवाप्रमाणे तुम्हीही चमत्कार घडवू शकता. कुठल्याही कठीण आणि बिकट परिस्थितीतून मार्ग काढू शकता. यासाठी, तुमचा जसा देवावर असतो, तसाच विश्वास, आणि तशीच श्रद्धा, भावना, आस्था, आणि सकारात्मकता स्वतःबद्दल असावी.
स्वतःबद्दल असा विचार ठेवला तर नकारात्मक विचार तुमच्या मनाला कधीच शिवणार नाही. तुम्हाला तुमच्यातला देव, तुमच्यातली सुप्त शक्ती बाहेर काढायची आहे. जसे देवाला मानतो, तसे स्वतःतही देव आहे असे मानून जीवन जगा, बघा कशी आतली शक्ती एकवटून बाहेर येते. ही शक्ती वाढवण्यासाठी ध्यानधारणा (मेडिटेशन), वाचन, लिखाण, योगा, व्यायाम करु शकता. तसेच, रोज स्वतःशी, स्वतःबद्दल किमान १० ते १५ सकारात्मक वाक्य (अफरमेशन्स) बोला. वरील शास्त्रावर / तत्वावर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि सांगितल्या प्रमाणे फॉलो करा. एका महिन्यातच तुम्हाला फरक जाणवायला सुरवात होईल.
तुम्ही म्हणाल की, कितीही तत्वज्ञान पाजले तरी, शेवटी प्रत्यक्षात जीवन जगत असतांना अडचणी आल्या की हे सर्व तत्वज्ञान निकामी होते. प्रॅक्टिकली त्याचा उपयोग होत नाही. समस्या आली की डोकं चालणे बंद होते आणि आपण त्यात गुरफटून जातो. बरोबर आहे तुमचं म्हणणं. त्यावरही मी तुम्हाला पर्याय सांगतो. तुम्ही म्हणता तसे होण्याचे कारण असे की, आपण नेहमी अडचणींवर, समस्येवर लक्ष केंद्रित करतो. प्रॉब्लेम वर फोकस करतो.
म्हणून आपल्याला प्रॉब्लेम मोठा वाटतो. खरी मेख अशी की, प्रॉब्लेमवर (समस्येवर) फोकस करण्याच्या ऐवजी, सोल्युशन वर (समाधानावर) लक्ष केंद्रित केले तर सोल्युशन (समाधान) सापडेल. आर्थिक नुकसान होणे, बिजनेस मध्ये अडचण येणे, एखादी व्यक्ती सोडून जाणे, ऍकसिडेंट होणे, घटस्फोट होणे, परीक्षेत नापास होणे यासारख्या समस्यांवर विचार करत बसल्याने, आपल्याला त्या समस्या इतक्या मोठ्या वाटतात की आपल्याला त्यापलीकडे काही दिसतंच नाही, काही सुचतच नाही. म्हणून, सोल्युशनवर लक्ष केंद्रित केले तर तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. समस्येवर तोडगा काढण्यासाठी मदत होईल.
अल्बर्ट आईनस्टाईन म्हणतात, “कोणतीही समस्या ज्या जाणीवेने ती निर्माण केली, त्याच स्तरातून सोडवली जाऊ शकत नाही.” अर्थात, समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला तुमचे विचार, तुमच्या भावना आणि तुमचा दृष्टिकोन बदलावा लागेल. हाच तो बदललेला दृष्टिकोन, समस्येऐवजी समाधानावर विचार करायचा. त्याने तुमच्या मनावरचा ताण कमी होईल, डोके चालेल, विचार सुचतील, मार्ग दिसेल. हे कसं करावं? सर्वप्रथम, प्रॉब्लेम काय आहे, याचे उत्तर लिहा, म्हणजेच तुमचा प्रॉब्लेम कागदावर लिहा.
लिहिल्याने सुस्पष्टता येते. मनातील आणि डोक्यातील गोष्ट मांडता आली, की ती इतरांच्या डोक्यात आणि मनापर्यंत पोहोचू शकते. दुसरा प्रश्न करा की, हा प्रॉब्लेम का निर्माण झाला? कुणाला दुसऱ्याला, एखाद्या घटनेला किव्हा परिस्थितीला, दोष देणे, जबाबदार धरणे, आरोप करणे टाळावे. खूप खोलवर विचार करून प्रामाणिकपणे उत्तर शोधले तर, ९९ टक्के आपलाच दोष असतो असे जाणवेल. स्वतः जबाबदार असू तर, आपण त्यावर काम करून आपली चूक सुधारू शकतो.
दुसऱ्याला दोष दिला किव्हा जबाबदार धरले तर आपण त्यावर फारसे काही करू शकत नाही, लक्षात असू द्या. तिसरे, हे प्रोब्लेम सोडवण्यासाठी मी काय काय करू शकतो? म्हणजे एकेक समाधान सुचेल. १, २, ३, ४, असे अनेक पर्याय असू शकतात. सर्व संभाव्य सोल्युशन लिहा. चौथे, यापैकी कुठल्या पर्यायावर मी कृती करू शकतो. मग तो निवडा आणि कामाला लागा. कदाचित पहिल्या पर्यायावर कृती केल्याने तुम्हाला यश मिळणार नाही, तोडगा निघणार नाही, प्रॉब्लेम सुटणार नाही. मग दुसरा पर्याय निवडा, त्यावर काम करा, गरज पडल्यास तिसरा, किव्हा चौथा. असे एकेक पर्यायांवर काम आणि कृती केली तर निश्चितपणे तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधान मिळेल.
हा प्रयोग आपण आपल्या लहानपणी केलेला आहे. कसा, आठवतं का? तुम्हाला एखादी वस्तू घेण्यासाठी वडिलांकडून पैसे हवे होते. तेव्हा तुम्ही पहिल्यांदा मागितले आणि लगेच मिळाले, असे झाले नसणार. मग काही दिवसांनी तुम्ही पुन्हा मागितले, तरी नाही मिळाले. हा पर्याय काम करत नाही म्हणून तुम्ही तुमच्या आईला सांगून वडिलांकडून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला असेल. कदाचित त्याही मार्गाने पैसे मिळाले नाही म्हणून मोठ्या भावाला, बहिणीला, काकांना, मामांना, मावशीला सांगून वडिलांना मनवण्याचा प्रयत्न केला असणार.
तेही करून पैसे नाही मिळाले तर, हट्ट करून, रुसून, अबोला धरून किव्हा आणखी काहीतरी करून वडिलांना राजी करून पैसे मिळवले असतील. तुम्ही वडील असाल तर कदाचित तुमच्या मुलांनीही असे काही केले असणार आहे. जोपर्यंत, आपल्याला हवा तो निकाल (रिझल्ट) मिळत नाही, तोपर्यंत पिच्छा सोडायचा नाही, असे धोरण ठेऊन समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले तर यश मिळणारच, नाही का? जगातील अशी कुठलीही समस्या नाही की त्यावर तुमच्याकडे उत्तर नाही.
तुमच्यात देव आहे, देवाचा अंश आहे, असे समजून जीवन जगले, आणि जोपर्यंत प्रॉब्लेम सुटत नाही, तोपर्यंत लढत राहिले, तर सगळे प्रोब्लेम सुटतील. लक्षात ठेवा, समस्या आहे, म्हणजे समाधानही आहेच. समाधान शोधा, म्हणजे समाधान मिळेल.(क्रमशः)
*
Devyani Sonar

Recent Posts

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ

नाशिक मध्यच्या मतदार यादीत मोठा घोळ आ. फरांदे यांचे निवडणूक अधिकार्‍यांना निवेदन नाशिक  ः प्रतिनिधी…

26 mins ago

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या

तलवारीचा धाक दाखवून दहशत माजवणाऱ्यास नाशिकरोड पोलिसांनी ठोकल्या बेड्या नाशिकरोड : प्रतिनिधी तलवारीचा धाक दाखवत…

9 hours ago

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज : सुवर्णा चव्हाण मनमाड : आमिन शेख आगामी होणाऱ्या…

9 hours ago

नाशिक जिल्हा परिषदेतील वित्त विभागाच्या दोघा अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले

नाशिक: प्रतिनिधी वेतन पडताळणी करून ती मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात अकरा हजार रुपयांची लाच घेताना …

18 hours ago

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस

राहुल आहेर यांची निवडणूक रिंगणातून माघार केदा आहेर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस काजी सांगवी : वार्ताहर…

1 day ago

बाळ अदलाबदल प्रकरणी मोठी कारवाई, 8 डॉक्टर,1 परिचारिका निलंबित

नाशिक:प्रतिनिधी जिल्हा शासकीय रुग्णालयात काल झालेल्या बाळ अदलाबदल प्रकरणी आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.…

1 day ago