केकाळी पृथ्वीतलावर प्रत्येक माणूस माणसासारखा वागायचा, माणसासारखे वर्तन करायचा, एकमेकांच्या संकटात व सुखदुःखात वार्याच्या वेगाने धावून जायचा. समाजकार्यात, लग्नकार्यात व इतर सामाजिक कार्यक्रमात माणूस निःस्वार्थ भावनेने काम करायचा. गावातील कोणता व्यक्ती मरण पावला तर अख्खा गाव त्याच्या अंत्यविधीला जमायचा आणि ढसाढसा रडायचा. तेव्हा आपले आणि परके असा भेदभाव केला जात नव्हता.
समाजबांधव व समस्त गावकरी आपलेच वाटायचे. एखाद्या स्त्रीवर वा महिलेवर जाणीवपूर्वक अन्याय होत असेल तर अख्खा गाव त्या पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी तिच्या बाजूने खंबीरपणे उभा राहायचा आणि त्या महिलेला न्याय मिळवून द्यायचा आणि माणुसकीची शोभा वाढवायचा. प्रत्येक माणूस आपल्याकडून माणुसकी कलंकित होणार नाही, याची खबरदारी घ्यायचा. भलेही तेव्हाचा माणूस तेवढा सुशिक्षित नव्हता, पण आजच्या सुशिक्षित माणसाला लाजवेल असे वागायचा. हल्ली माणूस खूप शिकला आहे, भरपूर पुस्तके वाचला आहे, पदवीधर होऊनसुद्धा माणसाला माणसासारखे वागता येत नाही, हीच शोकांतिका आहे. एवढे शिकून सवरून जर माणूस माणसासारखे वर्तन करत नसेल, परस्त्रीकडे वासनांध व वखवखलेल्या दृष्टिकोनातून बघत असेल तर मला वाटते माणूस शिक्षण शिकूनही न शिकल्यासारखा आहे. म्हणजे आजच्या सुशिक्षित माणसांपेक्षा पूर्वीची अडाणी माणसेच लाखपटीने बरी होती. हल्ली माणूस एवढा शिकला आहे, अनेक पदव्या घेऊन बसला आहे.
पण त्याच्यातली माणुसकी अजूनही जिवंत झाली नाही. पूर्वी माणसातील माणुसकी बावन्न कशी सोन्यासारखी चकाकत होती. माणूस माणुसकीला जिवापाड जपायचा. आपल्या वर्तनातून माणुसकी ओशाळणार नाही व आपल्या हातून अमानुष कृत्य घडणार नाही, याची जीवापाड काळजी माणूस घ्यायचा. त्याकाळी माणूस स्त्रियांकडे व महिलांकडे स्वच्छ व नितळ नजरेने बघायचा. परस्त्रीला मातेसमान मानायचा व दुसर्याच्या मुलीला आपली बहीण समजायचा. तेव्हा बलात्कार, व्याभिचार, अनाचार आणि अत्याचाराचे प्रमाण खूप कमी होते. तेव्हा घरोघरी एकत्र कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. एका घरातील सर्व भाऊ एकत्र येऊन शेती करायचे, तेव्हा प्रत्येकाला भावाचा मुलगा आपलाच वाटायचा आणि भावाची मुलगीसुद्धा आपलीच वाटायची. तेव्हा आई-वडिलांना दैवत मानणारे सुपुत्र अस्तित्वात होते. त्या काळी आई-वडिलांना आपल्याकडे ठेवण्यासाठी सख्खे भाऊ एकमेकांना भांडायचे आणि आता आई-वडिलांना माझ्याकडे नको तर तुझ्याकडे ठेव म्हणून भाऊ एकमेकांना भांडत आहेत. अशी विदारक परिस्थिती सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. पूर्वी आताच्या एवढे भांडणतंटे घरोघरी होत नव्हते.
पूर्वीची माणसे खूप मायाळू व समजदार होती. नोकरदार भाऊ आपल्या शेतकरी भावाला शेतीचा व घराचा हिस्सा मागत नव्हता. उलट शेतकरी भावाच्या मुलाचा व मुलीचा शिक्षणाचा व लग्नाचा सारा खर्च सारायचा. म्हणून तेव्हा सगळीकडे मानवता आनंदाने नांदायची. माणूस माणसासारखा वागायचा. आपल्या शिलाला व चारित्र्याला जिवापाड जपायचा. परंतु हल्ली माणूस माणसासारखा का वागत नाही? माणसासारखे वर्तन व माणसासारखे कृत्य का करत नाही? आई-वडिलांना म्हातारपणात न सांभाळता वृद्धाश्रमात का पाठवत आहे? माणूस एवढा हैवान व नराधम कसा काय बनलाय? शाळेत शिकायला असताना माणूस प्रार्थना करायचा की, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, अशी प्रतिज्ञा प्रत्येक जण शालेय जीवनात असताना करायचा. परंतु, एकीकडे सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, अशी प्रतिज्ञा घ्यायची आणि दुसरीकडे आपल्याच देशातील मुलींवर बलात्कार करायचे, त्यांच्याकडे वासनांध नजरेने बघायचे आणि इकडे म्हणायचे सारे भारतीय माझे बांधव आहेत. हे असे कसे चालेल हो? तीन वर्षांच्या चिमुरडीपासून ते 80 वर्षांच्या वृद्ध म्हातारीपर्यंत बलात्कार करण्यासाठी हल्ली माणूस लिंगपिसाट झाला आहे. देशात बलात्काराचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. कोणत्या नात्यासोबत कसा व्यवहार करायचा असतो याचे आजकालच्या लिंगपिसाट युवकांना भान राहिले नाही. माणूस बहीण बघत नाही, भावाची बायको बघत नाही, पोटची मुलगी बघत नाही, वासनेच्या भरात तो लिंगपिसाट होऊन बलात्कार करून नात्यातील पावित्र्य कलंकित करत आहे. शाळेतील शिक्षक आपल्याच विद्यार्थिनीवर अमानुष अत्याचार करून गुरू-शिष्याचे नाते कलुषित करत आहे. आई-वडील शेती नावावर करत नाहीत म्हणून आई-वडिलांना जीवे मारणारे महाभाग या देशात खूप आहेत. थोड्याफार जागेसाठी सख्खे भाऊ एकमेकांचे पक्के वैरी बनून रोज हाणामारी करून घेत आहेत. कोर्टकचेरी व पोलीस स्टेशनला खेटे मारत आहेत आणि अमानुषतेचा कळस गाठत आहेत. माणूस एवढा अमानुषपणे का वागतोय? माणूस माणसासारखे वागायचे सोडून रानटी जनावरासारखे का वागत आहे? कळायला मार्ग नाही, पण माझ्या मते आजकालच्या मुलांना आई-वडिलांचा जराही धाक राहिला नाही. त्यांच्यावर संस्काराची रुजवण करण्याच्या वयात त्यांचा अतिलाड केला जात आहे. आजकाल हम दो, हमारे दो या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. आणि प्रत्येकजण एकुलता एक वंशाचा दिवा म्हणून त्याचा अतिलाड करून त्याला कसेही मोकाट कुत्र्यासारखे मोकळे फिरू देत आहे. त्याला मनमानी व वाट्टेल तसे जीवन जगू देत आहेत. म्हणून आजकालची मुले बिघडून जात आहेत. शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांना मारायला अधिकार नसल्यामुळे विद्यार्थी शिक्षकांना जराही घाबरत नाहीत. बरेच विद्यार्थी शिक्षकांना घाण घाण शिव्या देऊन त्यांची मानहानी करत आहेत. जोपर्यंत आई-वडील आपल्या मुलांना धाकात ठेवणार नाहीत, त्यांच्यावर संस्काराची योग्य पेरणी करणार नाहीत आणि शाळेतील शिक्षक जोपर्यंत विद्यार्थ्यांना
छडीचा धाक दाखवणार नाहीत तोपर्यंत मुले असे वाईट कृत्य करणारच आहेत.
देशात बलात्कार आणि व्याभिचार वाढत जाणार आहे. माणूस माणसासारखे न वागण्याचे एकमेव कारण हेच आहे. आई-वडिलांच्या धाकाला संस्कार म्हणतात, तो संस्कार जोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये जागा होणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होणार नाही. उलट मुले बिघडत जाणार आहेत. त्यासाठी गरज आहे पालकांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना धाक दाखवून त्यांच्यावर संस्काराची छाप पाडण्याची.आणि माणूस बनून माणसासारखे वागायला शिकवण्याची.
राज्यभरात शिक्षकांचे आंदोलन; अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा पुणे : टीईटी परीक्षेच्या विरोधात शुक्रवारी (दि. 5)…
नाशिक गारठले : गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात घट होत असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोटीचा…
चार महिन्यांत सातशे कोटी वसुलीचे मनपाला आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील करदात्यांकडील थकबाकीचा आकडा तब्बल…
भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; प्रतीकात्मक करवत, कुर्हाड जाळून निषेध नाशिक : प्रतिनिधी तपोवनातील वृक्षतोडीवरून महायुतीतच…
घोटी-त्र्यंबकेश्वर वाढीव रस्त्याचा प्रश्न; पोलिसांनी शेतकर्यांना घेतले ताब्यात घोटी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील घोटी- त्र्यंबकेश्वर…
मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. जो कधी चुकतच नाही तो माणूसच नाही, असे म्हटले तर…