आस्वाद

जेन-झी ऐकत का नाही ?

– राजेश शिरभाते

पेपरफुटीच्या माध्यमातून आपल्या मंत्रिपदाची प्रतिष्ठा डावावर लावलेल्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर आता जेन-झी देशातील कोट्यवधी लोकांची नावे मतदार यादीतून वगळणार्‍या निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करत आहे. देशाच्या निवडणूक प्रक्रियेत अनेक बाबी करून त्याचा फायदा केवळ सत्तारूढ पक्षालाच कशा प्रकारे होईल, यासाठी अनेक नियमांची मोडतोड केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यांच्या राजीनाम्याबरोबरच भारतातील निवडणूक प्रक्रिया ही मूळ संविधानात सांगितल्याप्रमाणे व्हावी, ही जेन-झी तरुणांची महत्त्वाची मागणी आहे. यासाठी त्यांनी शुक्रवारी (दि.9) बेंगळुरू आणि शनिवारी (दि. 10) दिल्लीत आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन होऊ नये असे म्हणून सरकारने जे प्रयत्न सुरू केलेले आहेत, त्यामुळे जगातील सर्वांत मोठी लोकशाही व्यवस्था अशी प्रतिष्ठा असलेल्या आपल्या देशाच्या प्रतिष्ठेला तडे जाणार नाहीत ना, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जेन-झी हा शब्द देशाच्या तरुण पिढीबाबत वापरला जातो, हे आतापर्यंत सर्वांच्याच लक्षात आलेले आहे. ही तरुण पिढी त्यांचे विचार, त्यांची कार्यक्षेत्रे आणि जगाबरोबरचा त्याचा असलेला संपर्क या सार्‍या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. ती मंडळी स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा त्यांच्या काही असंवैधानिक मागण्यांसाठी आंदोलन करत नाहीत, हेही समजून घेतले पाहिजे. ही मंडळी सुशिक्षित आहेत. समाजाचा आणि प्राप्त परिस्थितीचा विचार करणारी आहेत. कावडयात्रा करणारी तरुणाई आणि या तरुणाईमध्ये फरक आहे ही विज्ञाननिष्ठ आहे. तार्किक विचार करणारी आहे. लोकांनी मांडलेले विचार हे तर्कावर घासून पाहणारी आहे. मिळालेल्या माहितीचा इतर माहितीच्या स्त्रोताशी जुळवणूक करणारी आहे. त्यातील नेमके काय आणि किती चांगले आहे ते घेणारी आहे. कोणी काही सांगितले म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून काहीतरी अविचार करणारी नाही. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढणे हे सगळ्यात चांगले पाऊल आहे. त्यांना समजून घेतले पाहिजे. या पिढीचा स्वातंत्र्यावर विश्वास आहे. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याविषयी आणि स्वातंत्र्यलढ्याविषयी त्यांना आदर आहे. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात खरोेखर भाग घेतला असेल अशा विचारसरणीलाच स्वातंत्र्याचे महत्त्व लक्षात येते. ते या मुलांना आले आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांचा घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार हिरावून घेणार्‍या व्यवस्थेविषयी आणि त्यासाठी कारणभूत ठरलेल्या व्यक्तीविरोधात त्यांचा हा लढा आहे. आक्रोश आहे. त्यात द्वेष आणि राग नाही. त्यांची ही मागणी त्यांना लोकशाही मार्गाने मांडायची आहे.
यासाठी सध्याचे भारतातील सरकार जे करत आहे तशा प्रकारचे अवरोध आतापर्यंत कोणीही केलेला कोणालाही आठवत नसेल. हे आंदोलन होऊ नये यासाठी मोठा आटापिटा केला जात आहे. हे आंदोलन का होऊ नये. त्याचे कारण त्यात सरकारची प्रतिष्ठा लपलेली आहे. हे आंदोलन जर यशस्वी झाले तर हे सरकार एसआयआरच्या माध्यमातून ज्ञानेश कुमार यांनी केलेल्या गैरप्रकारांच्या आधारावर निवडून आलेले आहे हे सिद्ध होईल की काय, अशी भीती तर सरकारच्या मनात नाही ना, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे आंदोलन चुकीचे आहे आणि आम्ही बरोबर आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. ज्याची खरोखर प्रतिष्ठा असते त्यांना ती तशी दाखवावी लागत नसते. ती लोकांच्या मनात आपोआप निर्माण होत असते, ही एक सूत्र थोडेसे बाजूला ठेवले जात आहे का, असाही प्रश्न निर्माण होत आहे. सहसा आंदोलनांमुळे सर्वसामान्य जनतेच्या प्रवासावर किंवा त्यांच्या हालचालीवर बंधने येतात. त्यामुळे आंदोलन करणे योग्य नसल्याची आवई अनेकदा उठवण्यात येते. इथे तर सरकारतर्फेच रेल्वे आणि इतर वाहतूक व्यवस्था बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचा मोठा फटका हा सर्वसामान्य जनतेला बसणार आहे. त्या जनतेला जिच्या भल्यासाठी आम्ही सरकार चालवत असल्याचा दावा सत्ताधारी पक्षामार्फत केला जात असतो. याचा फटका कोणालाही बसू शकतो. त्यातही आजारी व्यक्ती. आजारी व्यक्तींना पाहायला जाणारे आपल्या निकटवर्तीयांच्या सुखात किंवा
दुःखात सहभागी व्हायला जाणार्‍या वा येणार्‍या, आपापल्या आर्थिक कामांसाठी किंवा नोकरी वा व्यवसायानिमित्त प्रवास करणार्‍या व्यक्तींना याचा फटका बसू शकणार आहे. वास्तविक दिल्लीचे भौगोलिक क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे जंतर मंतर याठिकाणी होणार्‍या आंदोलनाने संपूर्ण दिल्लीच्या दैनंदिन व्यवहारांवर काहीही फरक पडणारा नसतो. मात्र, सर्वसामान्यांनी या आंदोलनाला जाऊ नये यासाठी हा आटापिटा चालला आहे.
कोणताही देश म्हणजे एक पक्ष नव्हे. लोकशाहीत पक्ष येत-जात असतात. कोणता पक्ष कशा प्रकारे सत्ता चालवतो यावरून त्या त्या पक्षाची विचारसरणी स्पष्ट होत असते. याचेही भान ठेवायला हवे होते. या सार्‍या गोष्टीची आताची जेन-झी पिढी चेष्टा करत आहे. हे आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा मोठा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही गुंडांचाही वापर करण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. पोलिसांचा हा वापर ही देशाच्या शक्तीची हानी आहे. हे नैतिकतेला धरून नाही. बळाच्या वापरावर आपल्या मनाप्रमाणे करण्याची प्रवृत्ती ही गुन्हेगारी प्रवृत्ती समजली जाते. वाटमारी करणारा माणूस हा नेहमी कशाचा तरी धाक दाखवून लोकांना लुबाडत असतो. सभ्य समाजात हे होत नाही. त्यात चर्चा, विरोध, वादविवाद, मनधरणी, समजूत काढणे, समजावणे या सार्‍या गोष्टी गृहीत धरलेल्या असतात. त्यामुळे या आंदोलनाकडे एखाद्या महाविद्यालयातील वादविवाद असे न पाहता हा सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे असे समजून पाहणे व त्यांना मान देऊन त्यांच्याबरोबर चर्चा करणे अधिक योग्य ठरेल, असे अनेकांना वाटते. सन्माननीय व्यक्ती मिळून देशाचा सन्मान वाढवला जात असतो. त्यामुळे देशाचा सन्मान हा मोठा आहे, हे निश्चित!

सरकारचे नुकसान
या आंदोलनाला विरोध करून या सरकारचा फायदा होण्याऐवजी नुकसानच अधिक होणार आहे, हे या पक्षाच्या ज्येष्ठ आणि लोकांसाठी काम केलेल्या नेत्यांनाही माहीत असेल. एकतर त्यामुळे हे दिसून येईल की, लोकांचा या सरकारच्या विरोधात किती आक्रोश आहे. कोट्यवधी लोकांचा या सरकारला विरोध आहे. ते कोणत्याही मार्गाने तो व्यक्त करू शिकतात. त्यामुळे खरेतर लोकशाहीत सरकारचीच नैतिक जबाबदारी दुसरीकडे वळते. तिच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. हे सारे आपल्या सरकारची आंतरराष्ट्रीय प्रतिमा जपण्यासाठी होत आहे का, तर त्याचाही फायदा होणार नाही. ही तरुण पिढी समाजमाध्यमे आणि संचार यंत्रणा यात निष्णात आहे. त्यामुळे त्याच्यावर विविध तांत्रिक मार्ग ते शोधून काढतील. हे सारे जगात जाईल आणि त्याने आपल्या देशाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता आहे.

Why won’t Gen Z listen?

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

8 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

8 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

8 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

8 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

8 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

8 hours ago