राज्यातील छमछम कायमची बंद करणार!

डान्स बार रोखण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणार : मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात डान्स बारवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या विद्यमान कायद्यातील पळवाटा बंद करण्यासाठी राज्य सरकार महाराष्ट्र पोलीस अधिनियमात दुरुस्ती करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. या दुरुस्तीनंतर डान्स बार चालविण्यासाठी महाराष्ट्र डान्स बार कायद्यांतर्गतच परवाना घेणे बंधनकारक राहील. पोलीस कायद्यांतर्गत केवळ सादरीकरण (परफॉर्मिंग लायसन्स) घेऊन डान्स बार चालविण्याची प्रथा यामुळे बंद होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात ऑर्केस्ट्रा बार उशिरापर्यंत सुरू राहत असल्याबाबत सदस्य नानाभाऊ पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात डान्स बारवर अनेक निर्बंध असतानाही काही आस्थापनांकडून पोलीस कायद्यांतर्गत परफॉर्मिंग लायसन्स घेऊन प्रत्यक्षात डान्स बार चालविले जात आहेत. हा गैरप्रकार रोखण्यासाठी पोलीस कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असून, त्यानंतर डान्स बार चालविणार्‍या सर्व आस्थापनांना डान्स बार कायद्यांतील सर्व अटी व निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक राहील.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र हॉटेल, उपाहारगृहे आणि मद्यपान कक्ष (बार रूम) यामध्ये अश्लील नृत्यावर प्रतिबंध घालणे व त्यामध्ये काम करणार्‍या महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम, 2016 अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाही ध्वनिमुद्रित संगीतावरील नृत्य परवान्यास मंजुरी देण्यात आलेली नसल्याचे सांगितले.
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 अंतर्गत सार्वजनिक मनोरंजन नियमावलीनुसार परवानाधारक ऑर्केस्ट्रा बार यांनी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जानेवारी 2026 ते 12 जून 2026 या कालावधीत एकूण 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी नऊ प्रकरणांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, उर्वरित नऊ गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बार विहित वेळेत बंद होतात की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी रात्रगस्त अधिकारी आणि प्रत्येक पोलीस ठाण्याचे बिट मार्शल नियमित तपासणी करतात.

Will put a permanent stop to the ‘Chham-Chham’ (dance bar) culture in the state!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *