सिडको : प्रतिनिधी
सिडकोतील स्टेट बँक चौक परिसरातील लिकर कट्टा वाइन शॉपमध्ये काम करणार्या कर्मचार्याचा प्रेशर गनमधील खिळा छातीत घुसल्याने मृत्यू झाला. सुनील अनिल तायडे (वय 39, रा. कामटवाडे) असे मृत कर्मचार्याचे नाव आहे. सोमवारी (दि. 2) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने सुविधा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेमुळे सिडको परिसरात खळबळ उडाली असून, तायडे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाइन शॉपमधील घटनेचे सीसीटीव्ही चित्रण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले आहे. त्यामध्ये एका व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाल्याने हा प्रकार अपघात आहे की घातपात, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, अंबड पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेण्यासह त्याची तपासणी सुरू केली आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. प्रेशर गनमधील खिळा तायडे यांच्या छातीत नेमका कोणत्या परिस्थितीत घुसला, याचा तपास पोलीस करीत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. मृत तायडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कामटवाडे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सीसीटीव्ही चित्रणातून उलगडणार मृत्यूचे गूढ?
सुनील तायडे यांच्या मृत्यूनंतर वाइन शॉपमधील सीसीटीव्ही चित्रण चर्चेचा विषय ठरले आहे. चित्रणातील एका व्यक्तीच्या हालचालींवरून संशय व्यक्त केला जात असला, तरी त्यातून घातपाताचा निष्कर्ष काढता येणार नाही. प्रेशर गनमधील खिळा हृदयापर्यंत कसा पोहोचला, त्यावेळी नेमके काय घडले आणि या घटनेला कोण जबाबदार आहे, या प्रश्नांची उत्तरे पोलिसांच्या तपासातून मिळणार आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही चित्रण आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब महत्त्वाचे ठरणार आहेत. अपघात की घातपात, याबाबत अद्याप पोलिसांनी अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेला नाही.
Wine shop employee dies after a nail from a pressure gun pierces his chest