निफाडला महिलेचा खून; कारण गुलदस्त्यात

तब्बल 28 दिवसांनंतर प्रकरण उघडकीस; गुन्हा दाखल

निफाड : तालुका प्रतिनिधी
तब्बल 24 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह निफाड येथील जुना देवपूर रस्त्याजवळील एका विहिरीमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. पैशांच्या देवाणघेवाणीतून हा खून झाल्याचा संशय निफाड पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की, निफाड येथील एका खासगी दवाखान्यात काम करणारी महिला रंभाबाई आनंदा काळे (वय 60, रा. मामलेदार चौक, निफाड) या बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचा भाचा प्रवीण घायाळ यांनी निफाड पोलीस स्टेशनला 24 फेब्रुवारी रोजी दाखल केली होती. परिणामी, निफाड पोलिसांनी मिसिंग केसचा तपास करताना तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने मोबाइलमधील सीडीआर तपासला असता त्यात संशयित क्रमांक आणि मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे निफाड येथील अरुण बाजीराव ढेपले (वय 40) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता, पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्याने संबंधित महिलेला निफाडजवळ जुना देवपूर रस्त्यालगत असलेल्या विहिरीलगत मारून तिचा मृतदेह सदर विहिरीत टाकल्याची
कबुली दिली.
संशयित अरुण बाजीराव ढेपले याने पोलिसांना माहिती देण्यापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून, त्याच्यावर निफाड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निफाड येथील संशयित अरुण बाजीराव ढेपले हा दूध विक्रीचा व्यवसाय करीत असल्याने दूध देण्याच्या निमित्ताने त्याचे व मृत महिला यांची ओळख वाढली. नंतर मृत महिलेकडून पैशाच्या देवाणघेवाणीवरून रंभाबाई यांना संशयित अरुण ढेपले याने जीवे मारले, असा मृत महिलेच्या नातेवाइकांचा आरोप आहे.
पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी पोलीस आणि विहिरीत पोहणार्‍या तरुणांसह शनिवारी रात्री दोन वाजेपासून मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत होते. अखेर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता खोल विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. रात्री उशिरापर्यंत याबाबत फिर्याद नोंदवण्याचे काम निफाड पोलीस स्टेशनमध्ये सुरू होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश गुरव करत आहेत.निफाड पोलिस स्टेशनच्या दामिनी पथकामुळे या गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाल्याचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी
म्हटले आहे.

Woman murdered in Niphad; reason lies in bouquet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *