25 टक्क्यांत फ्रिज, वॉशिंग मशिन देण्याचे आमिष; महिलांची 75 लाखांची फसवणूक

सिन्नरमध्ये ‘दिव्य ज्योत’ संस्थेविरोधात गुन्हा दाखल

सिन्नर : प्रतिनिधी
महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली गरजू महिलांना स्वस्त दरात गृहोपयोगी वस्तू देण्याचे आमिष दाखवत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सिन्नरमध्ये समोर आला आहे. लासलगाव येथील ‘दिव्य ज्योत बहुउद्देशीय संस्था’ आणि तिच्या पदाधिकार्‍यांविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 75 लाख 34 हजारांंचा आर्थिक गंडा घातल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत रंजना अनंत वाजे (वय 47, रा. सरदवाडी रोड, सिन्नर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी वावीवेस परिसरात महिलांसाठी विशेष सक्षमीकरण योजना सुरू असल्याचे सांगितले. या योजनेंतर्गत पिठाची गिरणी, कुट्टी मशिन, शिलाई मशिन, फ्रिज, वॉशिंग मशिन आदी वस्तू बाजारभावाच्या केवळ 25 टक्के रक्कम भरून मिळतील, असे सांगण्यात आले. उर्वरित रक्कम संस्था भरणार असल्याचे सांगून महिलांचा विश्वास जिंकण्यात आला.
या आमिषाला बळी पडून फिर्यादींसह अनेक महिलांनी एक हजार 177 वस्तूंचे बुकिंग केले. त्यासाठी वेळोवेळी 75 लाख 34हजार रुपये संस्थेकडे जमा करण्यात आले. मात्र, दीर्घकाळ उलटल्यानंतरही कोणत्याही वस्तूंचा पुरवठा करण्यात आला नाही. तसेच जमा केलेली रक्कम परत देण्यासही आरोपींकडून टाळाटाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पैशांबाबत विचारणा केल्यानंतर संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी शिवीगाळ करत दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी श्रीमती सुनीता कांबळे, संजय अभिमान बोराळे, जयश्री बोराळे, शंकर कमोद, नीलम कमोद, सागर पगारे, विशाल कानू गरुड, राजेंद्र कुणगर, सीमा पगारे आणि संतोष दोंदे, सर्व रा. दिव्य ज्योत बहुउद्देशीय संस्था, लासलगाव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक राऊत या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Women cheated of Rs 75 lakhs by promising to give fridge, washing machine at 25% discount

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *