नियोजनबाह्य खर्चामुळे मध्यमवर्गीय व शेतकरी कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले
निफाड : विशेष प्रतिनिधी
फेब्रुवारीपासून ग्रामीण भागात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. मंगल कार्यालये, बँडपथक, केटरिंग आणि डेकोरेशन व्यवसायांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. मात्र, दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे लग्न सोहळ्यांचा खर्च प्रचंड वाढल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत असल्याचे वास्तव समोर येत आहे. ‘लग्न सोहळा थाटात व्हावा’ या सामाजिक अपेक्षेमुळे खर्चाला उधाण आले आहे. विशेषतः मध्यमवर्गीय व शेतकरी कुटुंबांवर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे.
गेल्या काही वर्षांत साध्या पद्धतीने होणारी ग्रामीण भागातील लग्ने आता अधिक खर्चिक बनली आहेत. जेवणावळीचे वाढलेले दर, बँड पथकांचे मानधन, मंगल कार्यालयांचे वाढते भाडे तसेच सजावटीच्या वस्तूंच्या वाढलेल्या किमती यामुळे लग्नासाठी लागणारा खर्च दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. चार ते आठ लाखांपर्यंत मर्यादित असलेला लग्नाचा खर्च आता अनेक ठिकाणी दहा लाखांच्या घरात पोहोचत आहे, अशी माहिती पालकांकडून दिली जात आहे.
स्थानिक स्तरावरील मंगल कार्यालयांचे भाडे 50 हजार ते दीड लाखांपर्यंत गेले आहे. बँड पथकासाठी 40 हजार ते एक लाख रुपये मोजावे लागत आहेत. केटरिंगचे दर प्रतिताट 300 ते 500 रुपयांपर्यंत वाढले आहेत. डेकोरेशनसाठी 30 ते 80 हजार रुपयांचा खर्च होत असून, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीसाठी 25 ते 70 हजारांंपर्यंत पॅकेज आकारले जात आहे. वधू-वरांच्या कपड्यांसाठी 50 ते 90 हजारांंपर्यंत खर्च होत आहे. मेकअप व हेअर स्टाइलसाठी 10 ते 25 हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. याशिवाय निमंत्रणपत्रिका, डिजिटल कार्ड, सोशल मीडिया व्हिडिओ निमंत्रण यांसाठीही स्वतंत्र खर्च वाढला आहे. आधुनिक पद्धतीच्या लग्न सोहळ्यांची वाढती क्रेझ आणि सोशल मीडियावर आकर्षक सोहळे दाखवण्याची स्पर्धा यामुळे खर्चात आणखी भर पडत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबे शेतीवर अवलंबून असल्याने त्यांचे उत्पन्न हंगामी स्वरूपाचे असते. त्यामुळे लग्नासाठी खासगी पतसंस्था, सोने तारण कर्ज किंवा उसनवारीचा पर्याय स्वीकारावा लागत आहे. सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्याच्या दबावामुळे अनेक कुटुंबे आवश्यकतेपेक्षा अधिक खर्च करत असून, त्यामुळे कर्जाचा भार वाढत असल्याची कबुली अनेक पालक देत आहेत. दरम्यान, काही सामाजिक संस्था व ग्रामपंचायतींकडून सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सामूहिक विवाहामुळे हॉल, जेवण, सजावट आणि इतर व्यवस्थांवरील खर्च मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत आहे. तसेच तरुण पिढीतही साध्या पद्धतीने लग्न करण्याचा कल हळूहळू वाढताना दिसत असला, तरी त्याचे प्रमाण अद्याप मर्यादित असल्याचे चित्र आहे.
बदलत्या काळात परंपरा जपत आर्थिक शिस्त राखावी
नियोजनबाह्य खर्चामुळे मध्यमवर्गीय व शेतकरी कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. मर्यादित पाहुण्यांमध्ये लग्न, डिजिटल निमंत्रण, स्थानिक साहित्याचा वापर व सामूहिक विवाह यांसारखे पर्याय स्वीकारल्यास खर्च मोठ्या प्रमाणात आटोक्यात राहू शकतो. बदलत्या काळात परंपरा जपत आर्थिक शिस्त राखणे गरजेचे आहे. लग्न साधेपणाने करून होणारा खर्च टाळून तो कुटुंबातील इतर गोष्टींसाठी वापरला, तर सर्वसामान्य माणूस सध्याच्या महागाईत जगेल.
– योगेशकाका बोरगुडे, नैताळेगरीब असो की श्रीमंत, कोरोना आला तेव्हा अत्यंत साधेपणाने लग्ने उरकली. त्यात आर्थिक बचत झाली. त्यामुळे अनेक कुटुंबांचा फायदादेखील झाला. तोच पैसा इतर मुला-मुर्तीच्या शिक्षणासाठी लावता आला. त्यामुळे आतादेखील सर्वसामान्य माणसाने कोरोना काळ आठवला पाहिजे.
– देवीदास बोरगुडे, नैताळेParents of the bride and groom are hit by rising inflation during the wedding season.