स्पेस एक्सने रचला इतिहास
स्टारबेस, टेक्सास (अमेरिका):
जागतिक अंतराळ क्षेत्रात सोमवारी स्पेसएक्सने एक नवा इतिहास रचला. एलॉन मस्क यांच्या कंपनीचे जगातील सर्वांत मोठे आणि शक्तिशाली रॉकेट स्टारशिप आपल्या 14 व्या चाचणी उड्डाणात पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचले. यापूर्वीच्या सर्व 13 चाचण्या या सब-ऑर्बिटल (उपकक्षीय) होत्या, ज्यामुळे संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याची ही स्टारशिपची पहिलीच वेळ आहे.
टेक्सास येथील ’स्टारबेस’ प्रक्षेपण केंद्रावरून या 407 फूट (124 मीटर) उंच महाकाय रॉकेटने झेप घेतली. सुमारे 10 तासांच्या या मोहिमेत स्टारशिप पृथ्वीभोवती सहा फेर्या पूर्ण करेल आणि पृथ्वीपासून साधारण 170-275 किलोमीटर उंचीवर प्रवास करेल. या ऐतिहासिक उड्डाणादरम्यान स्टारशिप आपल्यासोबत घेऊन गेलेले नेक्स्ट-जनरेशन ’स्टारलिंक व्ही 3’ हे 26 उपग्रह अंतराळात यशस्वीपणे तैनात करत आहे.
उड्डाणादरम्यान रॉकेटच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि ते बंद पडले, तरीही उर्वरित इंजिनांच्या मदतीने स्टारशिपने यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश मिळवला. प्रक्षेपणाच्या काही मिनिटांनंतर ’सुपर हेवी बूस्टर’ मेक्सिकोच्या खाडीत उतरले. तर संपूर्ण प्रवास पूर्ण केल्यानंतर मुख्य स्टारशिप यान चिलीजवळील प्रशांत महासागरात सुरक्षितपणे ’स्प्लॅशडाउन’ (पाण्यात लँडिंग) करेल.
मंगळ, चांद्र मोहिमेसाठी महत्त्वाचे पाऊल
स्टारशिप हे पूर्णपणे पुनर्वापर करता येण्याजोगे रॉकेट म्हणून विकसित केले जात आहे. या ऐतिहासिक ऑर्बिटल यशामुळे भविष्यात मानवाला चंद्र आणि मंगळावर पाठवण्याच्या तसेच मोठ्या प्रमाणात मालवाहू वाहतूक करण्याच्या स्पेसएक्सच्या स्वप्नाला मोठी गती मिळाली आहे.
World’s most powerful rocket enters Earth’s orbit for the first time.