सर्जा-राजाचे पारंपरिक पद्धतीने पूजन

बैलपोळ्याचा ग्रामीण भागात उत्साह

नाशिक : प्रतिनिधी
रंगीत शिंगांवर झुलती बाशिंगे, घुंगरांचा होणारा नाद, अंगावर रंगीबेरंगी झूल…थाटात निघालेला सर्जा-राजा… असे दृश्य काल ग्रामीण भागात पाहावयास मिळाले. शेतीत मशागत करणार्‍या सर्जा-राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण साजरा केला. त्यास वंदन करत पुरणपोळीचा नैवेद्य देण्यात आला.
शेती करण्याच्या पद्धतीमध्ये काळानुरूप बदल झाले असले, तरी आजही अनेक शेतकर्‍यांच्या दारासमोर बैलजोडी हमखास दिसून येते. वर्षभर शेतात राबणार्‍या सर्जा-राजाबद्दलची कृतज्ञता या दिवशी व्यक्त करण्याचे काम शेतकरीवर्ग करत असतो. यंदा समाधानकारक पावसामुळे यंदा शेतकरी बांधवांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण होते.
सकाळपासूनच शेतकर्‍यांनी बैलांना अंघोळ घालून सर्जा – राजाची सजावट केली. रंगीबेरंगी झूल, रुमाल, गळ्यातील मणी व कड्यांमुळे सर्जा-राजाचे सौंदर्य अधिक खुलून दिसले. सायंकाळी गावोगावी बैलांची मिरवणूक काढण्यात आली. मारुती मंदिरात प्रदक्षिणा घातल्यानंतर सुवासिनींनी बैल व मालकांना औक्षण केले. बैलांना पुरणपोळी, बाजरीचे रोट व विविध नैवेद्य अर्पण करण्यात आले. शहरात ज्यांच्याकडे बैल नाहीत अशा कुटुंबांनी मातीच्या बैलजोड्यांची पूजा केली. गतवर्षीच्या तुलनेत सजावटीच्या साहित्याचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढले असले तरी शेतकर्‍यांच्या उत्साहात फरक पडला नाही. गावोगावी ढोल-ताशांच्या गजरात बैलजोड्यांची मिरवणूक काढून पारंपरिक पद्धतीने बैलपोळा साजरा करण्यात आला.

सोशल मीडियावर उत्साह

बोटावर मोजण्या इतपत शेतकर्‍यांकडे बैलजोड्या उरल्या असल्याचे चित्र एकीकडे असले, तरी दुसरीकडे सोशल मीडियावर मात्र बैलपोळ्याचा उत्साह वाहताना दिसून येत होता. अनेकांनी पोळा सणाचे तसेच बैलांबद्दल कृतज्ञतेचे भाव व्यक्त करणारे स्टेटस ठेवल्याचे चित्र होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *