– देवयानी सोनार
‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिसांच्या ब्रीदवाक्याला साजेसी कामगिरी सध्या नाशिक पोलिसांकडून होत आहे. लोंढे गँग, पाटणकर टोळी यांसारख्या नामचिन गुन्हेगारी जगतातील मंडळींबरोबरच व्हाइट कॉलर राजकीय गुन्हेगार, कॅप्टन अशोक खरातसारख्या भोंदू आणि टीसीएस प्रकरणातील जिहादींना कायद्याचा बालेकिल्ला दाखविल्यानंतर पोलिसांनी आता आपला मोर्चा शहरातील टवाळखोरांकडे वळविला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या ऑपरेशन कोम्बिंगमुळे टवाळखोरांमध्ये दहशतीचा माहौल दिसून येत आहे. टवाळखोरी ही क्षुल्लक गोष्ट नसते, अनेक गंभीर गुन्ह्यांची सुरुवातच अशा टवाळखोरीतून होत असते.
स्मार्ट शहराकडे वाटचाल करणार्या नाशिक शहर आयुक्तालयाची सूत्रे संदीप कर्णिक यांनी हाती घेऊन दोन वर्षांचा काळ उलटून गेला आहे. शहरातील एकूणच गुन्हेगारी कारवाया, राजकीय गुन्हेगार यांचा नीट अभ्यास केल्यानंतर कर्णिक हे अॅक्शन मोडवर आले आणि प्रारंभीच्या काळात संयमी वाटणारे कर्णिक यांनी कायद्याच्या बाबतीत असलेली कर्तव्य कठोरता दाखवून दिली. सातपूरच्या ऑरा गोळीबार प्रकरणात लोंढे गँगचा सहभाग उघड होताच, त्यांनी या गँगच्या मुसक्या आवळत त्यांना कायद्याचा बालेकिल्ला दाखविला. त्यानंतर शहरातील अनेक व्हाइट कॉलर राजकीय मंडळींना प्रसाद देत कायद्यापेक्षा कुणीही मोठा नाही हे दाखवून दिले. कर्णिक यांच्या या कृतीमुळे सरकारमधील मंडळींकडूनही त्यांचे वेळोवेळी कौतुक झाले. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही सरकारमधीलच मंडळींनी दिली. सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनातदेखील कर्णिक पॅटर्नची चर्चा झाली.
स्मार्ट शहराची ओळख केवळ चांगले रस्ते, चांगली दळणवळण व्यवस्था, चांगल्या इमारती एवढ्यावरच ठरत नाही, तर ज्या शहरात आपण राहतो, तेथे महिला, नागरिक, ज्येष्ठ यांना निर्भयपणे वावरता येते का? हेदेखील महत्त्वाचे आहे. स्ट्रीट क्राइमची सुरुवातच टवाळखोरीतून होत असल्याचे नाशिक पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आता या टवाळखोरांना अद्दल घडविण्याचा जणू काही विडाच उचलला आहे. सन 2023 पासून आजपर्यंत तब्बल 89 हजार 196 टवाळखोरांवर, तर गेल्या सहा महिन्यांतच 11 हजार 247 जणांवर कायद्याचा बडगा उगारला. अलीकडच्या काळात तपोवनातील सुटकेसमध्ये आढळलेला महिलेचा मृतदेह, देवळालीगावात किरकोळ वादातून झालेला खून असो वा अवघ्या नऊ हजार रुपयांच्या उसनवार पैशांतून 22 वर्षीय युवकाचा सातपूरच्या कामगारनगरात गोणीमध्ये आढळून आलेला मृतदेह, या घटना घडून 24 तासदेखील उलटत नाही तोच पोलिसांनी ज्या तत्परतेने या गुन्ह्यातील संशयितांना जेरबंद केले, ते पाहता पोलिस किती कार्यतत्पर झाले आहेत याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. रोजच्या जीवनात अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा जशा गरजेच्या आहे तसे आता आपल्या स्वतःपासून ते आपल्या मुलाबाळांची, घरातील ज्येष्ठांची सुरक्षा महत्त्वाची ठरत आहे. कधी कुठे क्षुल्लक कारणाहून वचपा काढला जाईल, कधी टवाळखोरांचा उपद्रव घरापर्यंत पोहोचेल सांगता येत नाही. त्यामुळे नाशिक पोलिसांनी टवाळखोरांवर करण्यात आलेली कारवाई चांगलीच चर्चेत आली आहे. गल्लीतील भाईपासून ते मोठ्या गुन्ह्यातील सराईतावर वचक बसवण्यासाठी नाशिक पोलिसांनी कायद्याचा बालेकिल्ला मोहीम राबवत हे नाशिक आहे…इथे फक्त कायदा चालतो हे नागरिकांनी कायद्याचा बालेकिल्ला हॅशटॅगसह व्हायरल संदेशामधून पोलिसांच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. नाशिकसारख्या वेगाने वाढणार्या शहरात शाळा, महाविद्यालये, उद्याने, चौक, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी रस्त्याच्या कोपर्यावर तासन्तास घुटमळणे, रस्त्याने जाणार्या-येणार्या मुली, महिलांवर कमेंट पास करणे, वाहनांसोबत स्टंटबाजी, सार्वजनिक ठिकाणी व्यसन करणे किंवा गल्लीबोळापासून ते आसपासच्या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणे, कोयते नाचविणे, वाढदिवसाचे सेलिब्रेशन भररस्त्यात करणे, वाढदिवस वा सार्वजनिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी साजरी करताना भाईगिरी, दहशत निर्माण करून सामान्य जनतेला त्रास देणार्या घटनांमधून वरवर पाहता किरकोळ टवाळखोरी वाटणार्या घटनांमधून गंभीर गुन्हेगारीची सुरुवात होण्याच्या आतच पोलिस आता इलाज करीत आहेत. विशेष म्हणजे, ही मोहीम केवळ दंडात्मक कारवाईपुरतीच मर्यादित नाही. तर शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रम, विद्यार्थी-पालक संवाद, महिला सुरक्षाविषयक मार्गदर्शन, कायद्याविषयी माहिती आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमदेखील राबविले जात आहेत. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हा घडूच नये, हा या मोहिमेचा खरा उद्देश आहे. संशयास्पद किंवा त्रासदायक प्रकारांची माहिती नागरिकांनी तत्काळ संबंधित पोलिस ठाणे, आपत्कालीन सेवा क्रमांक 112 किंवा नाशिक शहर पोलिसांच्या सीपी व्हॉट्सअॅप क्रमांक 9923323311 यावर देण्यासाठी पोलिसांकडून वेळोवेळी आवाहनदेखील केले जात आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत तर होतच आहेत; शिवाय टवाळखोरांमध्ये नाशिक पोलिसांबद्दल एकप्रकारचा धाक निर्माण होणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत बस सुरक्षितता समितीअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात आयोजित बैठक घेत, वाहनचालक, वाहक तसेच इतर सर्व कर्मचार्यांची चारित्र्य पडताळणी पूर्ण करण्याच्या सूचना देत कडक मोहीम राबविली.
कर्णिक टीमचे यश
कोणतेही काम एकट्याने शक्य होत नसते. सोबतीला टीमही चांगली लागते. पोलिस आयुक्तालयात सध्या संदीप कर्णिक यांच्या साथीला जे अधिकारी आहेत, त्यांच्यामुळे गुन्हेगारी कारवाया रोखणे, गुन्ह्यांचा तपास वेळेत होणे या गोष्टी शक्य होत आहेत. उपायुक्त प्रशांत काळे,किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत यांसारखे उपायुक्त दर्जाचे अधिकारी आणि सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, पोलिस निरीक्षक आंचल मुदगल यांसारख्या टीममुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. या अधिकार्यांच्या एकूणच कार्यपद्धतीमुळेच अनेक प्रकरणांचा तपास वेळेत लागला. मग ते खरात प्रकरण असो वा राज्यभर गाजलेले निदा खान प्रकरण. हे सर्व कमी म्हणून की काय, शालार्थ आयडीसारख्या प्रकरणाचा तपासही आता या पथकाकडे आला. त्यामुळेच मिटके, चव्हाण यांना आणखी एक वर्षभराची मुदतवाढ शासनाने दिली. ही त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीची बक्षिसीच म्हणावी लागेल.
वाहतुकीचे तेवढे बघाच
टवाळखोरांविरुद्ध सुरू केलेल्या कारवाईमुळे टवाळखोर आणि गल्लीबोळातील भाईंना कापरं भरले आहे. ही बाब पोलिसांबद्दलचा धाक निर्माण करणारी असली, तरी शहरातील वाहतुकीच्या बाबतीत आता पोलिसांनी आपला तिसरा डोळा अधिक सक्रिय करण्याची गरज आहे. शहरात पुढील वर्षी होऊ घातलेल्या सिंहस्थामुळे 28 ठिकाणच्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. या कामांमुळे शहरातील वाहतुकीची पूर्णपणे वाट लागली आहे. अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत तर काही रस्त्यांवरील वाहतूक वळविण्यात आलेली आहे.
द्वारका चौकातील भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यासाठी ठिकठिकाणी वॉर्डन नियुक्त केलेले आहेत. तथापि, वाहनधारक या वॉर्डनना फारसे गांभीर्याने घेत नाही. त्याचा परिणाम सर्वत्र वाहनांच्या रांगा लागतात. वाहतूक कोंडीचा फटका अगदी रुग्णवाहिकांनाही बसतो. त्यामुळेच पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आता शहरातील वाहतूक व्यवस्थेची घडी नीट बसण्यासाठी लक्ष केंद्रित करायला हवे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मध्यंतरी सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय करून ऑनलाइन चलान पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली. तथापि, शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे ही प्रणाली राबविणे शक्य नाही. हे पोलिस खात्याच्या लक्षात आले अन् तूर्तास ऑनलाइन चलानला ब्रेक लागला. शहरातील रस्ते, दळणवळण व्यवस्था नीट झाल्यानंतर कदाचित हा ऑनलाइन चलानचा पॅटर्न पुन्हा राबविला जाऊ शकतो. पण, सध्याच नाशिक शहरातील वाहतुकीमुळे नागरिकांचा जो जीव गुदमरत आहे, त्यावर काही तरी उपाययोजना करून गुन्हेगारांना जशी शिस्त लावली तशीच वाहतुकीलाही शिस्त लावावी, अशी अपेक्षा नाशिककर
करीत आहेत.
Yeh Dar Achcha Hai!