कपिला नदीतून काढला 23.105 मे. टन कचरा

‘उन्नत नाशिक अभियान’अंतर्गत स्वच्छता मोहीम

पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेच्या ‘उन्नत नाशिक अभियान’अंतर्गत रविवारी (दि.28) सकाळी कपिला नदी स्वच्छता मोहीम उत्साहात पार पडली. नागरिक, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी, सामाजिक संघटना आणि स्वयंसेवकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे ही मोहीम यशस्वी ठरली. मोहिमेदरम्यान 23.105 मेट्रिक टन कचरा संकलित करण्यात आला. तर आयुक्तांच्या निर्देशानंतर शहरात विशेष दंडात्मक कारवाई करून 10 प्रकरणांत एकूण 53 हजार 380 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेचे उद्घाटन कुंभमेळा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, पंचवटी विभाग प्रभाग सभापती रोहिणी पिंगळे, नगरसेवक गौरव गोवर्धने, प्रियंका माने, जुई शिंदे, अदिती पांडे, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी तसेच महानगरपालिकेचे विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी
उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या कृती आराखड्यानुसार के. के. वाघ कृषी महाविद्यालय, सरस्वतीनगर, साईनगर आणि जनार्दन स्वामी मठ परिसर येथे एकाच वेळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

दंडात्मक कारवाई
स्वच्छता मोहिमेदरम्यान आयुक्त मनीषा खत्री यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध तात्काळ दंडात्मक कारवाई करण्याचे त्यांनी निर्देश दिले. विशेष आणि नियमित कारवाई मिळून 10 प्रकरणांत एकूण 53 हजार 380 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

23.105 metric tonnes of waste removed from the Kapila River.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *