नाशिक

येवला तालुक्यात 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा

विहिरींनी गाठला तळ; जनावरे, हरणांची पाण्यासाठी वणवण

येवला ः प्रतिनिधी
येवला तालुक्यात यंदाच्या वर्षी उन्हाने मोठा कहर केला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे. विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. हातपंपांना पाणी नाही. तालुक्यातील अनेक गावांत असणार्‍या तलावातील पाणी आटले आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी येवला पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीच्या वतीने येवला तालुक्यातील 31 गावे, 41 वाड्यांंना 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. ज्या गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल अशा गावांनादेखील प्रस्ताव आल्यानंतर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. असे असले, तरी ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी पाणीपुरवठा करणार्‍या टँकरच्या संख्येत अधिक प्रमाणात वाढ करण्यात यावी.
गावातील वस्त्यांवरदेखील पिण्याच्या पाण्याचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामीण
भागातील ग्रामस्थांनी केली आहे.
येवला तालुक्यातील अनेक खेड्यांत हातपंपांना पाणी आहे. मात्र, हातपंप नादुरुस्त आहेत. अशा नादुरुस्त हातपंपांची पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती करावी. त्यामुळे पाणीचेे स्रोत निर्माण होऊन पाणीटंचाईला आळा बसेल. दुरुस्त केलेल्या हातपंपांचे पाणी ग्रामस्थांना मिळेल, यासाठी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाने यासंदर्भात तालुक्यातील कोणत्या भागात नादुरुस्त हातपंप आहे, याचा सर्व्हे करून सर्व हातपंप दुरुस्त करणे आवश्यक आहे. तालुक्यातील बर्‍याच गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे, तर काही विहिरींना जेमतेम पाणी शिल्लक असल्याने सर्वत्र पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांना चारापाणी नसल्याने शेतकर्‍यांची पंचायत झाली आहे. गवत वाळले आहे आणि जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आणि त्यातच उन्हाची तीव्रता अधिक असल्याने जनावरांचेदेखील मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील काही जनावरे पाळणार्‍या ग्रामस्थांनी
आपली जनावरे इतर ठिकाणी आपल्या नातेवाइकांकडे पोहोच केली आहे.
हरणांचीदेखील अन्न व पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. तालुक्यातील राजापूर, ममदापूर, खिर्डीसाठे, नगरसूल शिवार, तसेच इतर ठिकाणी हरणांची कळप कायमस्वरूपी वास्तव्याला आहेत. मात्र, उन्हाच्या तीव्रतेमुळे असंख्य हरणे वाड्या-वस्त्यांवर पाण्यासाठी तसेच अन्नाच्या शोधासाठी वणवण भटकंती करीत असतात. अशा परिस्थितीत विहिरीत पडून अनेक हरणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक हरणे गंभीर जखमी झाली आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी वन विभागाने हरणांसाठी पाण्याची आणि अन्नाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
तालुक्यातील राजापूर, ममदापूर या भागात हरणांची संख्या अधिक प्रमाणात आहे. या ठिकाणी वन विभागाने हरणांसाठी पिण्याच्या पाण्याचे पाणवठे बांधले असले, तरी या बांधलेल्या पाणवठ्यात पुरेसे पाणी नसल्याने हरणांची पाण्यासाठी वणवण होत असते. हा प्रकार नेहमीच दरवर्षी उन्हाळ्यात पाहावयास मिळतो.
काही सामाजिक बांधिलकी असलेल्या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने हरणांसाठी याठिकाणी पाणी उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे हरणांना पाणी मिळते. याठिकाणी हरणांचे कळप मोठ्या प्रमाणावर आहेत. येथे वन विभागाने अधिक प्रमाणात पाणवठे निर्माण करणे, ही काळाची गरज आहे.

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago