मोबाइल चित्रीकरणाच्या वादातून घटना
सिडको : प्रतिनिधी
विल्होळी येथील संघर्षनगर परिसरात जुन्या वादातून 30 वर्षीय तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला दुमजली इमारतीच्या गच्चीवरून खाली ढकलून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 18 ऑगस्ट) पहाटे उघडकीस आली. राहुल संजय सरकटे (वय 30, रा. संघर्षनगर, विल्होळी) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, दीपक एकनाथ पारधी याला ताब्यात घेतले आहे. अन्य दोन संशयित आरोपी फरार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
नाशिक तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी शांताराम गाडेकर यांनी दीपक पारधी आणि ज्योती बोंबले यांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून दीपक पारधी याने अजय गांगुर्डे आणि वैभव मेंगाळ यांना विल्होळी येथे बोलावून घेतले. त्यानंतर आरोपींनी रमेश खरे आणि राहुल सरकटे यांची पिकअप गाडी मच्छीमार्केट परिसरात अडवली. त्यांना शांताराम गाडेकर यांच्या घराकडे नेण्यात आले. मारहाणीच्या भीतीने शांताराम गाडेकर, रमेश खरे आणि राहुल सरकटे हे घराच्या जिन्याने दुमजली इमारतीच्या गच्चीवर गेले. यावेळी अजय गांगुर्डे याने राहुल सरकटे याला, तू मध्ये आला, आधी तुलाच मारतो, असे म्हणत त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केला. त्यानंतर वैभव मेंगाळ याने राहुलला गच्चीवरून खाली ढकलून दिले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुलचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय रामदास गांगुर्डे, वैभव गोविंद मेंगाळ आणि दीपक एकनाथ पारधी अशी संशयित आरोपींची नावे आहेत.या पैकी दीपक पारधी याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, अजय गांगुर्डे आणि वैभव मेंगाळ यांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील रोहकले आणि नाशिक तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक मृदुला नाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळाची तपासणी करून पुरावे संकलित केले. घटनेनंतर परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
Youth murdered by being pushed off the terrace in Vilholi.