नाशिकरोड : प्रतिनिधी
वडनेर गेट येथे आर्मी सेंटरमध्ये बिबट्याने अंगणात खेळणार्या दोन वर्षांच्या बालकावर हल्ला करत त्याला घेऊन बिबट्याने पलायन केले. ही घटना रात्री 10 वाजता घडली. या घटनेने पुन्हा एखादा मागील घटनेची पुनरावृत्ती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
दीड महिन्यापूर्वी वडनेर दुमाला येथे आयुष भगत या तीन वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून शेतात ओढून नेले होते. त्यानंतर या हल्ल्यात आयुषचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या नेतृत्वाखाली वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा याच परिसरात असलेल्या वडनेर गेट परिसरातील कारगिल गेटच्या बाजूला असलेल्या क्वार्टरजवळ बिबट्याने दोन वर्षांच्या श्रुतीक गंगाधर या बालकावर हल्ला करून त्याला ओढत नेले.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिक व माजी नगरसेवक केशव पोरजे, जगदीश पवार व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. संबंधित बालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या घटनेची माहिती वन विभागाच्या अधिकार्यांना दूरध्वनीवरून तातडीने देण्यात आली आहे.