सातार्यातील आंबेनळी, धुळ्याच्या लळिंग घाटात दुर्घटना
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सोमवारी (दि.25) दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांतील घाटरस्त्यांवर झालेल्या भीषण रस्ते अपघातांमध्ये 14 जणांनी आपला जीव गमावला आहे, तर किमान 16 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.
पहिला मोठा अपघात रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात घडला. दुसरी हृदयद्रावक घटना धुळे शहराजवळील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात तिहेरी अपघाताच्या स्वरूपात समोर आली. या दोन्ही घटनांमुळे राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाट परिसरात रविवारी मध्यरात्रीनंतर (25 मे रोजी पहाटे सुमारे 2:45 वाजता) भीषण अपघात झाला.
कोकणातील दापोली येथून सातारा जिल्ह्याकडे प्रवासी घेऊन जाणारी स्कॉर्पिओ गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्याने 800 ते 1,000 फूट खोल दरीत कोसळली. या कारमधील सर्वच्या सर्व आठ तरुण प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सातारा जिल्ह्यातील आसगाव, मर्डे आणि खटाव येथील सात युवकांचा, तर रत्नागिरी जिल्ह्यातील बोरगाव येथील एकाचा समावेश आहे. एनडीआरएफ, स्थानिक पोलीस आणि स्थानिक ट्रेकर्सच्या मदतीने अतिशय दुर्गम दरीतून हे मृतदेह बाहेर काढण्याचेकठीण बचावकार्य दिवसभर सुरू होते. दुसरीकडे, धुळे येथील मुंबई-आग्रा महामार्गावरील लळिंग घाटात पहाटेच्या सुमारास एक थरारक तिहेरी अपघात घडला, ज्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर 16 ते 20 प्रवासी जखमी झाले. घाटात सुरुवातीला वाळूने भरलेला एक डंपर चुकीच्या बाजूने आल्यामुळे त्याची समोरून येणार्या ट्रकला जोरदार धडक बसली. हा अपघात झाल्यानंतर तिथे पोलीस आणि अवधान टोल नाक्याचे कर्मचारी मदतकार्यासाठी आणि रस्ता रिकामा करण्यासाठी जमले असतानाच, मागून येणारी एक भरधाव लक्झरी ट्रॅव्हल्स बस नियंत्रण सुटून थेट अपघातग्रस्त वाहनांवर आणि तिथल्या लोकांवर आदळली. या भीषण धडकेत बस चालक, दोन पर्यायी चालक, क्लिनर, एक प्रवासी आणि एका टोल कर्मचार्यासह एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
14 people died in two accidents