– किशोर जाधव
ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे. त्यांच्या तोंडून 1972 च्या दुष्काळाची तीव्रता ऐकताना प्रामुख्याने खाण्यापिण्याच्या झालेल्या आबाळाचे चित्र समोर येते. भूकबळी महोऊ नये म्हणून सरकारकडून वाटल्या जाणार्या सुकडी, आलूमालू आणि आयात केलेल्या लाल गव्हाबाबत अनेक मजेशीर आठवणी सांगितल्या जातात. लोकांनी झाडपाला आणि रानभाज्या खाऊन दिवस काढले. या दुष्काळाचे विशेष म्हणजे गरिबांसोबतच श्रीमंतांनाही त्याची झळ सोसावी लागली. याच काळात रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली. या योजनेमुळे दोन महत्त्वाचे उद्देश साध्य झाले. पहिला म्हणजे दुष्काळात लोकांच्या हाताला काम मिळाले आणि दुसरा म्हणजे पाणलोट क्षेत्र वाढविणारी जलसंधारणाची कामे करता आली. अशा प्रकारे रोजगार हमी योजना ही महाराष्ट्राने देशाला दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी ठरली. कालांतराने या योजनेचे राष्ट्रीय स्तरावर विस्तारीकरण झाले. सध्या मनरेगा या योजनेचे नाव बदलून ’विकसित भारत- गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन (ग्रामीण)’ असे करण्यात आले आहे.
साधारणतः दर दहा ते बारा वर्षांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होताना दिसते. एल निनोचा प्रभाव साधारणतः 9 ते 12 महिने राहतो. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी जून ते सप्टेंबर 2026 या मान्सून हंगामात भारतात सरासरीच्या तुलनेत 13 टक्के कमी पाऊस पडला आहे. महाराष्ट्रात ट्रिगर एक आणि दोनच्या निकषांनुसार 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ’मागेल त्याला काम’ देण्याचे धोरण सरकारने हाती घेतले आहे. सध्या 12 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दोन लाख 62 हजारांहून अधिक मजूर काम करू लागले आहेत. केंद्र सरकारकडून 4,420 कोटी रुपये, तर राज्य शासनाकडून 2,947 कोटी रुपये इतका निधी रोजगार हमी योजनेच्या कामांसाठी उपलब्ध झाल्यामुळे मजुरांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
1972 च्या दुष्काळात सुरू झालेली ही योजना आजच्या दुष्काळातही लोकांच्या हाताला काम आणि श्रमाला दाम देत आहे. मात्र, योजना सुरू झाल्यापासून आजपर्यंत तिच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी कायम आहेत. विशेष म्हणजे, 1972 च्या दुष्काळात होणार्या या भ्रष्टाचाराकडे त्या काळातील काही लोक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत असत. अवैध मार्गाने पैसा मिळवणारे लोक तो तमाशा, ढाबे आणि दारूच्या दुकानांमध्ये खर्च करतात. त्यामुळे या व्यवसायांमध्ये काम करणार्या लोकांची उपासमार होत नाही, असा त्यांचा युक्तिवाद असे. मात्र, आज परिस्थिती बदलली आहे. लोकांची अशी शोषक आणि हतबल मानसिकता राहिलेली नाही. भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवण्याची आणि जाब विचारण्याची जागरूकता समाजात वाढत आहे.
1972 च्या दुष्काळात पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर यांसारख्या शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले होते. आज या शहरांमध्ये स्थायिक झालेल्या अनेक कुटुंबांची मुळे 1972 च्या दुष्काळातील स्थलांतराशी जोडलेली आहेत. त्यावेळी उपासमार टाळण्यासाठी शहरांकडे आलेल्या कुटुंबांची आजची पिढी 2026 च्या दुष्काळात मात्र तुलनेने निर्धास्त आहे. 1972 आणि 2026 च्या दुष्काळातील सर्वांत महत्त्वाचा फरक म्हणजे यावर्षी अन्नधान्याअभावी उपासमारीची वेळ येण्याची शक्यता तुलनेने कमी आहे. 1972 ते 2026 या 54 वर्षांच्या कालावधीत भारताच्या अन्नधान्य उत्पादनात झालेली भरीव वाढ, सक्षम झालेली सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे अन्नसुरक्षेचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला, तरी त्याचे रूपांतर मोठ्या प्रमाणावर भूकबळींमध्ये होण्याची शक्यता कमी आहे.परंतु याचा अर्थ दुष्काळाचे संकट कमी झाले आहे, असा अजिबात नाही. यावर्षीही मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. मात्र, या स्थलांतराचे प्रमुख कारण उपासमार नसून रोजगाराचा अभाव आहे.
मराठवाड्यातील अनेक मजूर कुटुंबांसह छत्रपती संभाजीनगर, पुणे, आळंदी आणि नाशिक यांसारख्या शहरांकडे स्थलांतरित होत आहेत. आगामी काळात हे स्थलांतर आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत या स्थलांतरित कामगारांच्या रोजगाराची, सुरक्षिततेची, मूलभूत सुविधांच्या उपलब्धतेची आणि सामाजिक संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार, हा कळीचा प्रश्न आहे.
यावर्षी खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चार्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामासाठी आवश्यक असलेली जमिनीतील ओलाव्याची परिस्थितीही अनुकूल नाही. त्यातच एल निनोचा प्रभाव 1972 च्या दुष्काळाच्या तुलनेत यावर्षी अधिक असल्याचे सांगितले जात आहे.यावर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात सरासरी केवळ 40 दिवस पाऊस पडला. हवामान विभागाच्या निकषांनुसार एका दिवसात किमान 2.5 मिलिमीटर पाऊस झाल्यास तो पावसाचा दिवस मानला जातो. याउलट 1972 मध्ये तब्बल 78 पावसाचे दिवस होते. पावसाच्या दिवसांतील ही मोठी तफावत यंदाच्या दुष्काळाची तीव्रता अधोरेखित करते.
थोडक्यात सांगायचे तर, 1972 च्या दुष्काळात लोकांनी एकमेकांच्या सहकार्याने, सामूहिक शक्तीने आणि माणुसकीच्या बळावर संकटाचा सामना केला होता. 2026 च्या दुष्काळात मात्र प्रत्येकाला आपापल्या संकटाशी एकट्याने लढावे लागत असल्याचे चित्र दिसते.1972 मध्ये माणसांसमोर अन्नाचा प्रश्न होता; 2026 मध्ये अन्नासोबत रोजगार, कर्जमुक्ती, सुरक्षितता आणि सन्मानाने जगण्याचा प्रश्न उभा आहे.
काळ बदलला, शेतीची पद्धत बदलली, सरकारच्या योजना बदलल्या, अन्नधान्याचे उत्पादन वाढले आणि दुष्काळाशी लढण्याची साधनेही बदलली. मात्र, दुष्काळाच्या मुळाशी असलेले प्रश्न आजही कायम आहेत.
1972 to 2026: The nature of drought has changed, but the questions remain the same.
- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…
- देवयानी सोनार पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे…
- अशोक थोरात समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्या अनेक घटना सातत्याने…
नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…
मोठे नुकसान, अग्निशामककडून आग आटोक्यात सिडको : प्रतिनिधी जुने सिडको परिसरातील बडदेनगर येथे रविवारी (दि.…