संपादकीय

ये तो होना ही था!

– देवयानी सोनार
पार्टी वुईथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अलीकडच्या काळात पक्षशिस्तीचे पूर्णपणे धिंडवडे उडाले असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. महानगरपालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म वाटपावेळी या बेशिस्तीचे जरा जास्तच प्रदर्शन झाले होते. अगदी पक्षाच्या शहराध्यक्षांना गाजरं भेट देण्यापर्यंतचा प्रमाद घडला होता. अर्थात, त्यामागे कारणही तसेच होते. पक्षाचे काम करूनही काही मंडळींमुळे तिकीट न मिळाल्याने ती खदखद बाहेर आली होती. तेव्हापासूनच सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या सुनील केदार यांची स्वीकृत नगरसेवक निवडीनंतर विकेट पडल्याचे बोलले जात आहे. अजून त्याला अधिकृत दुजोरा भलेही मिळाला नसला, तरी आग लागल्याशिवाय धूर निघत नाही. त्यामुळे आज ना उद्या या राजीनाम्याबाबतचा सोक्षमोक्ष लागणारच आहे.

भारतीय जनता पार्टी हा संघटनात्मक शिस्तीसाठी ओळखला जाणारा पक्ष असला, तरी गेल्या दीड वर्षात नाशिक महापालिकेच्या राजकारणात भाजपामधील विसंवाद, गटबाजी सातत्याने उफाळून आल्याचे दिसले आहे. महापालिका निवडणुका होऊन जवळपास एक वर्ष उलटून गेले, तरी पक्षातील हे अंतर्गत मतभेद अद्याप पूर्णपणे शमलेले नाहीत. ज्या पक्षाची सत्ता तेथे गर्दी ओघाने आलीच. भाजपा तर केंद्र आणि राज्यात सत्तेतील पक्ष. त्यामुळे येथे मोठीच भाऊगर्दी झाली आहे. त्यातपण स्वपक्षाबरोबरच इतर पक्षांतील मंडळींना कधी प्रेमाने, तर कधी वेगवेगळ्या यंत्रणांचा धाक दाखवत पक्षात आणले गेले. त्याचा जो काही परिणाम अपेक्षित होता तो गेल्या काही दिवसांत सर्वच जण पाहत आहेत. त्यामुळे स्वीकृतच्या निवडीसाठी तब्बल सहाशे जण इच्छुक होते. नाराजी नको म्हणून स्वीकृतचा पाळणा लांबविण्याचा कार्यक्रम सुरू होताच, पण कोर्टाने कान टोचल्यावर अखेर मुहूर्त गवसला. तथापि, या निवडीतही पक्षशिस्त पाळली न गेल्याचा ठपका केदारांवर आलाच आणि त्यांनाच त्याचा फटका बसला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. काहींच्या मते हकालपट्टी केली नसून, राजीनामा यापूर्वीच घेतल्याचे बोलले जात आहे. स्वतः केदार यांनी माझ्यापर्यंत अधिृकत काही पत्र आले नसल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
केदार यांची ओळख भाजपाचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते, अशी राहिली आहे. 1990 पासून ते पक्षात सक्रिय असून, संघटनेत तळागाळातून काम करत 2009 ते 2013 या काळात त्यांंनी पंचवटी मंडल अध्यक्ष, तर 2013 ते 2016 आणि 2019 नंतर शहर चिटणीस म्हणून जबाबदारी सांभाळली. नाशिक भाजपामध्ये शहराध्यक्षपदासाठी सुरू असलेल्या चढाओढीत मधला मार्ग म्हूणन 31 मे 2025 रोजी (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौर्‍याच्या पूर्वसंध्येला) प्रशांत जाधव यांच्या जागी त्यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पदभार स्वीकारल्यापासून पक्षाची एकजूट बांधण्यापेक्षा त्यांची कारकीर्द विविध वादांमुळे अधिक
चर्चेत रहिली.
भाजपामधील अंतर्गत मतभेद केवळ शहराध्यक्षांपुरते मर्यादित राहिले नाहीत, तर गेल्या दीड वर्षात शहरातील आमदारांमधील नाराजीही उघडपणे समोर आली आहे. जून 2025 मध्ये विधानसभा निवडणुकीतील कट्टर विरोधक राहिलेल्या सुधाकर बडगुजर आणि गणेश गिते यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाच्या हालचालींमुळे शहरातील तीनही आमदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध केला, तर नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले यांनी गिते यांच्या प्रवेशावर नाराजी व्यक्त केली होती. या मुद्यावर आमदार देवयानी फरांदे यांनीही सीमा हिरे यांना उघड पाठिंबा दिला होता. ऑगस्ट 2025 मध्ये शहराची नवी कार्यकारिणी जाहीर होताच जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याचा आणि घराणेशाहीचा आरोप करत पक्षात धुसफूस सुरू झाली होती.
डिसेंबर 2025 मध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा संघषर्र् अधिक तीव्र झाला. 19 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक प्रमुखपदावरून आमदार राहुल ढिकले यांना हटवून ती जबाबदारी आमदार देवयानी फरांदे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. मात्र, 25 डिसेंबर 2025 रोजी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने इतर पक्षांतील नेत्यांचे भाजपामध्ये प्रवेश घडवून आणले गेले. यामुळे निवडणूक प्रमुख असूनही आपल्याला विश्वासात घेतले नाही आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत आ. फरांदे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आणि पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला अनुपस्थिती दर्शवत आपला राग व्यक्त केला. यामुळे आमदार-पालकमंत्र्यांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. मात्र, अलीकडे हे नेते पुन्हा एकत्र दिसू लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दि. 30 डिसेंबर 2025 रोजी मनपा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपमधील तिकीट वाटपाचा गोंधळ विकोपाला गेला. बाहेरून आणलेल्या तब्बल 33 जणांना उमेदवारी दिल्याने निष्ठावंताचा संताप अनावर झाला होता. परिणामी तिकिटांच्या वाटपाचे आरोप करत इच्छुकांनी थेट एबी फॉर्मची पळवापळवी केली. एवढ्यावरच न थांबता सुनील केदार यांच्या वाहनाचे पाठलागनाट्य आणि एका फार्महाउसचे प्रवेशद्वार तोडण्यापर्यंतचे प्रकार घडल्याने अखेर पोलिस बंदोबस्तात फॉॅर्म वाटण्याची वेळ पक्षावर आली होती. महापलिका निवडणुकीत भाजपने स्वबळावर 72 जागा जिंकत बहुमत मिळविले.
4 फेब्रुवारी 2026 रोजी महापौर हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांच्या निवडीच्या प्रक्रियेतून पूर्णपणे दूर ठेवण्यात आल्याने नाराज झालेल्या केदार यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता. नंतर वरिष्ठांनी समजूत काढल्यावर तो मागे घेण्यात आला होता.
नुकतीच दि. 20 नोव्हेंबर रोजी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेत दहा स्वीकृत नगरसेवकांची घोषणा झाली. त्यात भाजपाचे सहा (अजित चव्हाण, हेमंत धात्रक, संदीप लेनकर, रोहिणी नायडू, रामहरी संभेराव, चंद्रशेखर पंचाक्षरी) जण निवडले गेले. ही यादी ठरवताना मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व केदार यांच्यात मतभेद झाले. प्रदेश नेतृत्वाला विश्वासात न घेता परस्पर नावे निश्चित केल्याचा ठपका ठेवत चव्हाण यांनी केदार यांचा राजीनामा घेतल्याचे बोलले जात आहे. पक्षाकडून या कारवाईबाबत अजून कोणतेही अधिकृत पत्र प्रसिद्ध झाले नसल्याची सूत्रांची माहिती आहे.
आपल्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे किंवा राजीनामा मागितल्याचे फेटाळून लावल्याचे, तसेच आपण भाजपा कार्यालयात पक्षाच्या बैठकीला उपस्थित असून, काम नियमित सुरू असल्याचे स्पष्टीकरण केदार यांनी दिले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीत कोअर कमिटीचे निर्णय आणि प्रदेश नेेतृत्वाचे आदेश पाळणे प्रत्येक पदाधिकार्‍याला बंधनकारक मानले जाते. वारंवार परस्परनिर्णय घेतल्यास पक्षशिस्तीच्या चौकटीत कारवाई केली जाते.त्यामुळे प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक यांनी नाशिकमध्ये कोअर कमिटीची बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे तत्काळ पद काढून घेण्याऐवजी येत्या काही दिवसांत नवीन शहराध्यक्षांची नियुक्ती करून बदल केला जाण्याची शक्यता आहे. अनिल भालेराव, शहर सरचिटणीस सुनील देसाई आणि पंचवटी मंडल अध्यक्ष राहुल कुलकर्णी यांच्यासह अजून काही नावे शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत.
सध्या जरी मोठ्या निवडणुका नसल्या तरी या अंतर्गत गटबाजीचा थेट परिणाम आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीवर होऊ शकतो. शहरातील या राजकीय घडामोडीचे पडसाद ग्रामीण भागातील मतदारांवरही उमटण्याची शक्यता आहे. पुढील दोन-तीन वर्षांत विशेषतः 2029 मधील लोकसभा, विधानसभा आणि 2030-31 मधील महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता भाजपासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षांतर्गत ही धुसफूस थांबवून, गटबाजी शमवून भाजपा ही परिस्थिती कशी सावरणार आणि आपला शिस्तीचा पक्ष ही प्रतिमा पुन्हा टिकवून ठेवण्यात यशस्वी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ye to hona hi tha!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कांद्याचा का होतो नेहमीच वांधा?

- आनंदा जाधव भल्याभल्यांना घाम फोडणारा आणि प्रसंगी केंद्रातील सत्तासमीकरणेही बदलणारा कांदा नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी…

26 seconds ago

1972 ते 2026 : दुष्काळ बदलला, पण प्रश्न तेच

- किशोर जाधव ज्या पिढीने 1972 चा दुष्काळ अनुभवला, ती पिढी आता साठीच्या पुढे आहे.…

12 minutes ago

मदतीची शिक्षा!

- अशोक थोरात समाजात प्रामाणिकपणा उरला आहे की नाही, अशी शंका येणार्‍या अनेक घटना सातत्याने…

19 minutes ago

गुरू नानक : समता, सेवा आणि मानवतेचा प्रकाश

नवी संस्कृतीच्या इतिहासात काही महापुरुषांनी आपल्या विचारांनी, कार्याने आणि जीवनमूल्यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यांनी…

25 minutes ago

धर्मनिरपेक्ष भगवी वाट

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी तयारीला वेग…

29 minutes ago

बडदेनगरमध्ये गवताच्या गंजीला आग

मोठे नुकसान, अग्निशामककडून आग आटोक्यात सिडको : प्रतिनिधी जुने सिडको परिसरातील बडदेनगर येथे रविवारी (दि.…

39 minutes ago