नाशिक

गुजरातचे माजी मुख्यमंत्री रुपाणींसह 241 प्रवासी ठार

उड्डाणानंतर सात मिनिटांत मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले विमान

                               सीट 11 ए वरील एकमेव प्रवासी वाचला


या अपघातात बहुतांश प्रवाशांचा मृत्यू झाला असला, तरी सीट क्रमांक 11 ए वर बसलेले रमेश विश्वासकुमार (वय 40) हे एकमेव प्रवासी वाचले. रमेश यांनी सांगितले की, टेकऑफनंतर अवघ्या 30 सेकंदांत मोठा आवाज झाला आणि विमान कोसळले. डोळे उघडले तेव्हा आजूबाजूला मृतदेह होते, मी घाबरलो, उठलो आणि धावत सुटलो. कुणीतरी मला उचलून रुग्णवाहिकेत टाकले आणि रुग्णालयात आणले. छाती, डोळे आणि पायांवर गंभीर दुखापत झाली असली तरी रमेश सुरक्षित आहेत. ते सध्या अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सामान्य वॉर्डमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी सांगितलं की, त्यांचा भाऊ अजय कुमार रमेश (45) हेही त्याच विमानात होते, पण ते वेगळ्या सीटवर बसले होते. आम्ही दोघं काही दिवस भारतात होतो. दिव येथे गेलो होतो.

एअर इंडियाच्या या दुर्घटनाग्रस्त विमानातील एकूण 242 प्रवाशांमध्ये 169 भारतीय प्रवासी, 53 ब्रिटिश नागरिक, पोर्तुगालचे 7 आणि कॅनडाचा एक नागरिक प्रवास करत होते. या दुर्घटनेनं अवघा देश शोकसागरात बुडाला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून शोक व्यक्त केला. तर, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. विमानाचा अपघात इतका भयंकर होता की, अहमदाबादच्या बी. जे. मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर हे विमान कोसळले असून, 15 डॉक्टर जखमी झाले आहेत. हे विमान खाली कोसळण्यापूर्वी हवेत तब्बल 625 फुटांवरून उड्डाण करत होते. त्यानंतर विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा. या विमानाचे वैमानिक सुमीत सभरवाल यांनी हवाई नियंत्रण कक्षाला आपत्कालीन कॉल केला होता. मात्र, मदत करण्यापूर्वीच हे विमान मेघानीनगरमध्ये कोसळले. मेघानीनगरमध्ये अनेक इमारती आहेत. त्यापैकी एका रुग्णालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळले. यामध्ये रुग्णालयाचा टीबी विभाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. तसेच रुग्णालयातील 15 डॉक्टर आणि काही रुग्ण जखमी झाले आहेत. सध्या मेघानीनगरचा संपूर्ण भाग सील करण्यात आला आहे. या ठिकाणी केवळ अग्निशामन दल, एनडीआरएफ आणि बचावकार्य करणार्‍या पथकांना प्रवेश आहे. विमान पडलेल्या भागातून इमारतींमध्ये असलेल्या नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलवले जात आहे. विमान कोसळल्यानंतर प्रचंड मोठा स्फोट झाला होता. या हादर्‍यांनी मेघानीनगरमधील इमारतींना तडे गेले आहेत. अहमदाबादहून लंडनला म्हणजेच दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानात इंधनदेखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आले होते, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटनास्थळी मोठा स्फोट झाला.

बोईंगची टीम तपासासाठी भारतात येणार
एअर इंडियाचे हे अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचे असल्याने, आता बोईंग कंपनीतील तज्ज्ञांची टीम भारतात पाठवण्यात येणार आहे. एअर इंडिया दुर्घटनेसंदर्भात तपासासाठी बोईंगकडून टीम येणार असल्याची माहिती टाटाकडून देण्यात आली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी बोईंगच्या सीईओंसोबत चर्चा केली. दुर्घटनेचे नेमके कारण काय आहे? याच्या तपासासाठी जीई एरोस्पेसदेखील तपासात मदत करण्यासाठी टीम पाठवणार असल्याची माहिती आहे.

टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना कोटींची मदत
एअर इंडिया ही कंपनी टाटा ग्रुपने घेतल्याने या विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपकडूनही दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेवून टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात केली आहे. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्चदेखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून, आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे. विमान अपघातात कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासनही टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आले आहे.

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 day ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 day ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

1 day ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 day ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

1 day ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 day ago