सिंहस्थात 4,500 बसेसवर राहणार सॅटेलाइट वॉच

मोबाइलवर अलर्ट, एका क्लिकवर समजणार गर्दीची माहिती

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून येणार्‍या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुखकर व सुरक्षित करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने तंत्रज्ञानाचा मास्टरस्ट्रोक तयार केला आहे. सिंहस्थात दररोज 4,500 बसेस भाविकांच्या सेवेसाठी धावणार आहेत. या संपूर्ण बस वाहतुकीवर व गर्दीच्या नियोजनावर आता थेट उपग्रह आधारित यंत्रणेद्वारे बारीक लक्ष ठेवले जाणार आहे. ही अत्याधुनिक यंत्रणा एका विशेष कंट्रोल रूमशी जोडण्यात आली आहे. यामुळे हा कुंभमेळा ‘हायटेक’ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात 4,500 बसेसचे जाळे आणि त्याला मिळालेली उपग्रहाची जोड यामुळे भाविकांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही.
अशी असेल उपग्रह आधारित स्मार्ट यंत्रणा
कुंभमेळ्याच्या काळात धावणार्‍या प्रत्येक बसमध्ये अत्याधुनिक जीपीएस आणि उपग्रहाशी जोडलेली ट्रॅकिंग सिस्टिम बसवण्यात आली आहे. या यंत्रणेचा थेट संपर्क मुख्य नियंत्रण कक्षाशी असेल. कंट्रोल रूममधील डिजिटल स्क्रीनवर प्रत्येक बसचे अचूक लोकेशन, तिचा वेग आणि ती कोणत्या मार्गावर आहे, याचा रिअल-टाइम माहिती उपलब्ध
होईल.
कंट्रोल रूममधून होणार नियोजन
1) बसची उपलब्धता आणि फेर्‍या : एखाद्या मार्गावर प्रवाशांची संख्या अचानक वाढल्यास नियंत्रण कक्षाला त्याची तत्काळ माहिती मिळेल. तिथून लगेचच अतिरिक्त बस त्या मार्गावर वळवल्या जातील.
2) प्रतीक्षा वेळ होणार कमी : बसस्थानकावर भाविकांना किती वेळ थांबावे लागेल, याचे अचूक गणित या यंत्रणेमुळे मांडता येईल. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होणार नाही.
3) घाटांवरील गर्दीचे व्यवस्थापन आणि सॅटेलाइटचा वापर : अमृत स्नानाच्या दिवशी कोणत्या घाटावर किती गर्दी आहे, याचे थेट चित्रण आणि डेटा उपग्रहाच्या व सॅटेलाइट कॅमेर्‍यांच्या मदतीने कंट्रोल रूमला मिळत राहील.
4) डायव्हर्शन प्लॅनिंग : जर रामकुंड किंवा त्र्यंबकेश्वरच्या मुख्य घाटांवर मर्यादेपेक्षा जास्त गर्दी झाली, तर उपग्रह यंत्रणेकडून तसा रेड अलर्ट कंट्रोल रूमला जाईल.
5) बस रोखणे किंवा वळवणे : घाटांवर गर्दी वाढल्यास, त्या दिशेने येणार्‍या 4,500 बसेसपैकी काही बसेसना बाहेरील पार्किंग झोनमध्येच थांबवण्याचे किंवा इतर कमी गर्दीच्या घाटांकडे वळवण्याचे आदेश तत्काळ चालकांना दिले जातील. यामुळे चेंगराचेंगरी किंवा वाहतूक कोंडीचा धोका पूर्णपणे टळेल.

भाविकांना असा मिळणार ‘अलर्ट’
प्रशासनाने या उपग्रह यंत्रणेला एका विशेष मोबाइल अ‍ॅप आणि घाट परिसरातील डिजिटल डिस्प्ले बोर्डशी जोडले आहे.
मोबाइल नोटिफिकेशन : भाविक नाशिक हद्दीत प्रवेश करताच त्यांच्या मोबाइलवर सॅटेलाइट डेटावर आधारित मॅसेज मिळतील.
पुढची बस कधी? : भाविकांना बस स्टॉपवर लावलेल्या डिजिटल स्क्रीनवर पुढची बस किती मिनिटांत येणार, याची अचूक वेळ पाहता येईल.

4,500 buses to be under satellite surveillance during Simhastha.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *