दुगाव शिवारात भीषण अपघात; दोन ठार

 

पंचवटी : प्रतिनिधी
नाशिक-गिरणारे रस्त्यावरील दुगाव शिवारात मंगळवारी (दि. 9) रात्री सुमारे 9.45 वाजता झालेल्या भीषण अपघातात मखमलाबाद परिसरातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव पिकअपने मोटारसायकलला समोरासमोर धडक दिल्यानंतर चालक वाहनासह फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन संदीप पवार (वय 28, रा. मातोश्रीनगर, मखमलाबाद रोड) व यश सुभाष शिंदे (रा. विद्यानगर, मखमलाबाद रोड) हे दोघे मित्र मोटारसायकलने (एमएच 15-जीक्यू 4471) गिरणारे येथून मखमलाबादकडे जात होते. दुगाव शिवारातील एचपी पेट्रोल पंपाजवळ समोरून येणार्‍या पिकअप (एमएच 01-सीआर 3802) चालकाने भरधाव वाहन चालवत मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या धडकेची तीव्रता इतकी होती की, दोघेही रस्त्यावर
फेकले गेले. डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पलायन केले.
या घटनेची माहिती मिळताच ग्रेड उपनिरीक्षक कोरडे, हवालदार राजेश पगारे व पोलीस शिपाई अमोल गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी आदित्य सुनील पवार (रा. मातोश्रीनगर) यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालकाचा शोध सुरू आहे.

मखमलाबाद परिसरावर पुन्हा शोककळा

काही दिवसांपूर्वी काश्यपी धरण परिसरात चौघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच या अपघाताने मखमलाबाद परिसराला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. मृत रोहन पवार एका खासगी कंपनीत सेल्स अँड मार्केटिंग विभागात कार्यरत होता. त्याच्या पश्चात आई-वडील व लहान बहीण असा परिवार आहे. तो अविवाहित होता. यश शिंदे दिंडोरी पंचायत समिती रुग्णालयात अनुकंपा तत्त्वावर नोकरी करत होता. रोहन व यश जिवलग मित्र असून, सामाजिक कार्यातही सक्रिय होते. त्यांच्या अकाली निधनामुळे विद्यानगर व मातोश्रीनगर परिसरात शोककळा पसरली आहे.

 

Horrific accident in Dugaon area; two killed.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *