पंतप्रधान मोदींचा गुजरातमधील भाजप मेळाव्यात दावा
नवी दिल्ली :
गेल्या बारा-तेरा वर्षांत भारतातील सुमारे 50 कोटी नागरिक गरिबीरेषेबाहेर आले असून, याचे श्रेय सरकारी योजनांसोबतच या योजना तळागाळातील गरजूंपर्यंत पोहोचवणार्या भाजप कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनतीला जाते, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
पंतप्रधान मोदी यांनी रविवारी (दि. 22 नोव्हेंबर) दिवाळी स्नेहमिलन समारंभाच्या निमित्ताने गुजरातच्या भाजप कार्यकर्त्यांना व्हर्च्युअली संबोधित केले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना दिवाळी आणि गुजराती नववर्षाच्या शुभेच्छा देत सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या यशाचा पाढा वाचला. गेल्या 1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच देशातील पन्नास कोटी लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत, असे मोठे वक्तव्य पंतप्रधान मोदी यांनी केले.
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या समर्पण आणि सेवाभावाचे कौतुक करत त्यांना महत्त्वाचा संदेश दिला. भाजपसाठी नेहमीच पक्षापेक्षा देश प्रथम राहिला आहे. भाजपमध्ये पदांपेक्षा कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनतीला जास्त महत्त्व दिले जाते, असे मोदी म्हणाले.
कार्यकर्त्यांनी समाजात सामाजिक सलोखा अधिक मजबूत करावा आणि ’विकसित भारता’साठी ’विकसित गुजरात’च्या निर्मितीसाठी जोमाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळेच आज आपण गुजरातसह संपूर्ण देश आणि अनेक राज्यांची सेवा करू शकलो, असेही ते म्हणाले.
मोदींनी मांडला गुजरातचा कायापालट
गुजरातमध्ये झालेल्या ऐतिहासिक बदलांवर भाष्य करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, एक काळ असा होता जेव्हा गुजरातची ओळख फक्त व्यापारापुरती मर्यादित होती. एका ठिकाणाहून माल खरेदी करायचा आणि दुसर्या ठिकाणी विकायचा, इतकेच चालायचे. आमच्याकडे खाणी किंवा खनिजे नव्हती, मिठाशिवाय आमच्याकडे काहीही नव्हते. मात्र, आज गुजरात आपल्या पारंपरिक व्यापार आणि उद्योगांच्या पलीकडे जाऊन खूप पुढे निघून गेला आहे. आज गुजरात कृषी, डेअरी, सेमीकंडक्टर, ऑटोमोबाइल, ग्रीन एनर्जी आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातही देशात अग्रणी राज्य म्हणून उदयास आले आहे.
500 million people lifted out of poverty