सिडको : प्रतिनिधी
नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचार्यांना धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिश याच्या जामीन अर्जावर आज (दि. 28 ऑक्टोबर) अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमित खारकर यांच्या न्यायालयात हा अर्ज सुनावणीसाठी येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
दानिशने यापूर्वी जुलै महिन्यात नाशिकरोड येथील न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्या वेळी न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केला होता. त्यानंतर आरोपीच्या वतीने नाशिक येथील सत्र न्यायालयात नव्याने जामीन अर्ज सादर करण्यात आला आहे.
या अर्जावरील सुनावणीत यापूर्वी जामीन नाकारण्यात आल्याची पार्श्वभूमी, आरोपीवरील आरोप आणि तपासात उपलब्ध झालेल्या पुराव्यांचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. तसेच प्रकरणाशी संबंधित कायदेशीर बाबींचाही विचार केला जाणार आहे. पीडित तरुणीवरील कथित अत्याचाराच्या आरोपांच्या अनुषंगाने तपासातील पुरावे न्यायालयासमोर मांडले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी दोन्ही पक्षांकडून मांडण्यात येणारे युक्तिवाद आणि त्यावरील न्यायालयाचे निरीक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. दानिशला जामीन मंजूर होतो की अर्ज
फेटाळला जातो, याबाबतचा निर्णय सुनावणीनंतर स्पष्ट होईल.
Danish’s bail hearing today