णत्याही देशाची जडणघडण आणि देशाचा विविध क्षेत्रांतील विकास हा त्या देशाच्या राज्यव्यवस्थेवर अवलंबून असतो.ज्या देशात मजबूत, आदर्श आणि पारदर्शक अशी लोकशाही राज्यव्यवस्था असते त्या देशाची घोडदौड कायम सुरू असते. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात लोकशाही राज्यव्यवस्था लागू झाली आणि भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनले तेव्हापासून भारताची जगात एक वेगळी ओळख निर्माण झाली. आज या घडीला भारताच्या लोकशाहीचे संपूर्ण जगात कौतुक होत आहे. भौगोलिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक, कृषी व जैविक विविधतेने नटलेल्या भारताला एकसंघ आणि एका सूत्रात गुंफून ठेवण्यात भारतीय संविधानाचे फार मोठे योगदान आहे. भारतीय संविधान भारताला लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मानवता वादी मूल्ये प्रदान करते.हे वैभव टिकवून ठेवण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करणे आपल्या सर्वांचे परमकर्तव्य आहे.
भारतीय संविधान निर्मितीमध्ये घटना मसुदा समितीचे मोलाचे योगदान होते. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र अभ्यास करून भारतीय संविधान लिहिले. यावेळी त्यांनी काही देशांच्या आदर्श अशा लोकशाहीचा आदर्श घेतला आणि भारताच्या सामाजिक व राजकीय व्यवस्थेचा सूक्ष्म अभ्यास करून आदर्श असे भारतीय संविधान लिहिले. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत भारतीय संविधानाचा गाभा ठळकपणे दिसतो. हे आदर्श संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला अर्पण केले. आणि संविधान सभेने ते स्वीकारले.संविधानावर सांगोपांग चर्चा झाली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाच्या शंकेचे आणि प्रश्नांचे योग्य उत्तर देऊन निरसन केले आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतात भारतीय संविधान लागू करण्यात आले. भारत खर्या अर्थाने प्रजासत्ताक देश बनला.
विविधतेने नटलेल्या भारतातील प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधान अनेक मानवतावादी मूलभूत अधिकार व हक्क प्रदान करते. यामध्ये समानतेचा अधिकार सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. धर्म, वंश, जात, लिंग, भाषा या आधारे कसलाही भेदभाव करता येणार नाही. सर्व भारतीय नागरिक एकसमान आहेत. त्याचबरोबर भारतीय संविधान भाषण स्वातंत्र्य, संचारस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, विचारस्वातंत्र्य व आर्थिक स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकाला बहाल करते आणि कोणत्याही निवडणुकीत प्रत्येक भारतीय नागरिकाला एक मतदान करण्याचा अधिकार देते. आणि सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे, शिक्षणाचा अधिकार. हा फार महत्त्वाचा अधिकार आहे. त्यामुळेच भारतीय संविधानाला जगात आदराचे स्थान मिळाले आहे.
भारतीय संविधानामुळे भारतीय लोकशाही दिवसेंदिवस प्रगल्भ आणि मजबूत होत आहे. भारतीय संविधानामुळे भारताची सर्व क्षेत्रांत घोडदौड सुरू आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही. आदर्श अशा भारतीय संविधानाचे व लोकशाहीचे जतन व संवर्धन करणे प्रत्येक भारतीयांचे आद्यकर्तव्य आहे.
भारतीय संविधानामुळे भारताची संपूर्ण जगात एक वेगळी ओळख निर्माण झाली असली तरीही भारतीय संविधानाबाबत किती भारतीय नागरिक सजग व जागरूक आहेत? किती भारतीय लोक संविधानाचा आदर करतात? राजकीय स्वार्थापोटी काही राजकीय लोक संविधानाचा गौरव करतात आणि संविधानिक पदावर विराजमान होऊन देशाचे संविधान बदलण्याची भाषा बोलतात हे कशाचे द्योतक आहे? असे हे लोक भारतीय संविधानाचा पुरेपूर फायदा करून घेतात आणि दुसरीकडे मनुस्मृतीचे गोडवे गातात, हा दुटप्पीपणा घातक ठरत आहे.
अशा बेजबाबदार नागरिकांना व राजकीय पक्षांना हे मुद्दाम सांगावे वाटते की, भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये घटना मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मोलाचे योगदान होते. भारतीय संविधान लिखित असून, त्याच्या निर्मितीसाठी 2 वर्षे 11 महिने व 18 दिवस इतका कालावधी लागला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने भारतीय संविधान साकारले गेले आहे. त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते. 14 एप्रिल 2015 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 वी जयंती होती. हे औचित्य साधून व त्यांना विशेष आदरांजली म्हणून 2015 पासून 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी संविधान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
भारतीय संविधानाने जातिभेद व धर्मभेद करण्यास कायद्याने प्रतिबंध केला आहे. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकचे अनेक शाळा- महाविद्यालयांत दररोज सामूहिक वाचन केले जाते. भारतीय संविधानाचे महत्त्व ओळखून प्रत्येक भारतीय नागरिकाने भारतीय संविधानाचे प्राणपणाने वाचन करून त्याचे पावित्र्य जपावे आणि भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात मोलाचे योगदान द्यावे. 26 नोव्हेंबरला भारतीय संविधान दिवस मोठ्या अभिमानाने व उत्साहाने साजरा करणे आपल्या सर्वांचे परमकर्तव्य आहे.