पालघर : प्रतिनिधी
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी वर्हाड्यांना घेऊन जाणार्या एका आयशर ट्रकला भरधाव कंटेनरने भीषण धडक दिली. या हृदयद्रावक अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली आणि वर्हाड्यांचा ट्रक पूर्णपणे चेंदामेंदा झाला, ज्यामुळे अनेक प्रवासी गाडीच्या अवशेषांमध्ये अडकून पडले होते. पालघर जवळील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धानिवरी गावाजवळ हा अपघात झाला. बालाराम दांडेकर नावाच्या तरुणाच्या साखरपुड्याच्या समारंभासाठी हे सर्व वर्हाडी ट्रकमधून प्रवास करत होते आणि या ट्रकमध्ये महिला व लहान मुलांसह जवळपास 100 प्रवासी होते. वर्हाडाचा हा ट्रक नवरीच्या घराच्या काही अंतरावर पोहोचला असतानाच समोरून येणार्या एका वेगवान कंटेनरचा मागील भाग अचानक निसटला. हा कंटेनर बॉक्स थेट या वर्हाडाच्या ट्रकवर जाऊन आदळला.
Horrific truck accident in Varhada; 12 people killed