नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न

आनंदरोडवरील काँक्रीट रस्ता पुन्हा वादाच्या भोवर्‍यात

देवळाली कॅम्प : प्रतिनिधी
देवळालीतील बहुचर्चित आनंद रोडवरील काँक्रीट रस्ता पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. माजी खासदार हेमंत गोडसे यांच्या खासदार निधीतून दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला हा रस्ता काही दिवसांतच खराब झाला होता. दर्जाहीन काम आणि संभाव्य भ्रष्टाचाराबाबत दैनिक गावंकरीने वेळोवेळी बातम्या प्रकाशित केल्यानंतर संबंधित यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
अलीकडेच या रस्त्याचे काँक्रिटीकरण पुन्हा नव्याने सुरू झाले असले तरी स्थानिक नागरिकांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. दरम्यान, दि. 23 सप्टेंबर 2024 रोजी अर्जदार भारत राजू वाघमारे यांनी मंत्रालय (मुंबई) येथे दिलेल्या निवेदनानुसार, सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक यांनी या प्रकरणातील कारवाईचा अहवाल शासनाकडे पाठवणे अपेक्षित होते. मंत्रालयानेही तसा निर्देश दिला होता. मात्र, अद्याप कोणताही अहवाल शासनाला पाठवण्यात आलेला नाही, अशी माहिती समोर आली आहे. नवीन काम सुरू असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिकचे अभियंता शरद सोनवणे यांच्याकडे क्वालिटी कंट्रोल रिपोर्टची मागणी केली असता ते याबाबत सातत्याने टाळाटाळ करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. फोनवर संपर्क साधण्याचे प्रयत्नही अनेकदा व्यर्थ ठरत असल्याने लोकांमध्ये नाराजी वाढत आहे. शासन एकीकडे प्रशासनात पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करत असताना, दुसरीकडे संबंधित अधिकार्‍यांचे टाळाटाळ करणारे वर्तन जनतेला केराची टोपली दाखवणारे असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. ठेकेदार उत्कृष्ट दर्जाचे साहित्य वापरत असल्याचा दावा केला जात असताना, क्वालिटी कंट्रोल रिपोर्ट देण्यास होत असलेली टाळाटाळ नागरिकांच्या शंकांना अधिक बळ देत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आनंदरोडवरील काँक्रीट रस्ताकामाचा दर्जा, जबाबदारी आणि प्रशासनाची कार्यपद्धती या तिन्हींबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

जनता उपाशी अभियंता तुपाशी, असे चित्र देवळालीकरांना अनुभवयास मिळत आहे. निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले असून, संबंधित अधिकारी व ठेकेदार जनतेच्या मुळावर उठले आहे.
– भारत वाघमारे, जिल्हाध्यक्ष, सत्यशोधक बहुजन आघाडी, नाशिक

निकृष्ट दर्जेचा मटेरियल वापरून काँक्रिटीकरणाचे काम कसे तरी संपवून आपला मागचा पेंडिंग पेमेंट काढून काम संपवण्याच्या मागे लागला आहे, पण यामुळे जनतेच्या पैशाची नासाडी होताना दिसत आहे.
– राजेश नामदेव माळोदे, ज्येष्ठ समाजसेवक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *