कश्यपी धरण परिसरातील अतिक्रमणावर जलसंपदाची कारवाई

इतर धरण परिसरातील अतिक्रमणांवरही लवकरच कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
कश्यपी धरण परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज जलसंपदा विभागाने मोठी मोहीम राबवत अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (गोदावरी व कृष्णा खोरे) यांच्या थेट सूचनेनुसार धरण व कालव्यांवरील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू असून, त्याचा पहिला टप्पा कश्यपी धरणापासून करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान खालील अतिक्रमणे हटविण्यात आली. कैलास बेंडकुळे यांच्या कश्यपी हॉटेलचे शासकीय जलसंपदा विभागाच्या मालकीतील अंदाजे दीड एकर क्षेत्रातील सर्व अतिक्रमण हटविले. गिरणारे-हरसूल रोडलगत धरणाच्या बुडीत क्षेत्रालगत असलेल्या हॉटेल क्रूजचे अतिक्रमण काढून परिसर मुक्त करण्यात आला. हॉटेल कश्यपी पिकनिक पॉईंट येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई तसेच धोंडेगाव शिवारातील शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेली इतर हॉटेल्स व व्यावसायिक अतिक्रमणेदेखील हटविण्यात आली.
मंत्री महोदयांच्या सूचनेनंतर नाशिक पाटबंधारे विभागाने विशेष पथक तयार करून तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. या पथकाच्या सहकार्याने कश्यपी धरण परिसरातील मोठ्या प्रमाणातील शासकीय जागा मोकळी करण्यात आली. धरण परिसरातील कारवाईचा पुढील टप्पा याच धर्तीवर गंगापूर, मुकणे, भावली, दारणा, वाकी आदी धरण परिसरांमध्येही अतिक्रमण हटविण्याची मोहीम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती विभागाने दिली.

अतिक्रमणधारकांना आवाहन…
जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे की, शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामे त्वरित स्वतःहून हटवावीत. अन्यथा पुढील कारवाईदरम्यान होणार्‍या नुकसानीस विभाग जबाबदार राहणार नाही, असेही विभागाने नमूद केले आहे.
– सोनल शहाणे
कार्यकारी अभियंता
पाटबंधारे विभाग नाशिक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *