गोदावरीला जसा महापूर यावा, तद्वत सध्या भाजपामध्येे आयारामांचा पूर आला आहे. या आयारामांमुळे आपल्या गडाला हादरे बसतात की काय? या भीतीतून वा इतके दिवस पक्षाची प्रामाणिकपणे सेवा केल्यानंतरही आता पुन्हा आयारामांमुळे सतरंज्याच उचलाव्या लागतात की काय? या मानसिकतेतून भाजपामध्ये महाभारत घडू लागले आहे. मंत्री गिरीश महाजनांनी शिवसेना उबाठा, काँग्रेस, शरद पवार गटातील अनेकांना गळाला लावल्याने आमदार प्रा. देवयानी फरांंदे यांनी विरोध केला. गेली अनेक वर्षे नगरसेवक बनण्याचे स्वप्न पाहणारे भाजपाचे कार्यकर्तेही या पक्षप्रवेशाला विरोध करीत रडल्यानंतरही महाजनांनी विरोधाला फाट्यावर मारत हा प्रवेश सोहळा घडवून आणला. महाजनांना संकटमोचक अशी उपमा दिली जाते, पण नाशिकमध्ये झालेल्या राड्याच्या वेळी ते स्वत:च संकटात सापडले होते. पक्षाचा वटवृक्ष होत असताना विरोधकांना पक्षात घेऊन निष्ठावंतांनाच पर्याय निर्माण करण्याच्या कृतीमुळे पक्षप्रवेशाच्या वेळी राडा झाला. आयारामांच्या प्रवेशाच्या निर्णयाला स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध असण्याचे मुख्य कारण म्हणजे, हे सर्व मतदारसंघ या आमदारांचे गड झाले आहेत. त्या गडाला धक्के बसू नयेत, यासाठी या आमदारांचा आटापिटा सुरू आहे. विरोधी पक्षांतील नेते आले की, या गडाच्या भिंती हलू लागतात. मग नाराजीच्या तोफा धडधडायला सुरुवात होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे गड काबीज करण्यासाठी इनकमिंगचे अस्त्र वापरले आहे, पण हेच अस्त्र भाजपाच्या नेत्यांचे गड अस्थिर करायला लागले आहे. पक्ष बळकटीकरणाच्या नावाखाली हा उद्रेक थंड होणार की भाजपाच्या गडाला आतून तडे देणार, हे आगामी घडामोडींवरून दिसून येणार आहे.
चाळीस वर्षांपूर्वी भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेनंतर 1980 मध्ये मुंबईत झालेल्या पहिल्या अधिवेशनात अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा, असे म्हटले होते. वाजपेयी यांचे हे शब्द आज शत-प्रतिशत खरे झाले आहेत, पण हे म्हणतानाच अटलबिहारी वाजपेयी यांचे 13 दिवसांचे सरकार जेव्हा अवघ्या एका मताने कोसळले होेते त्यावेळी संसदेत केलेल्या भाषणात वाजपेयी म्हणाले होते, पार्टी तोड के सत्ता के लिए नया गठबंधन कर के अगर सत्ता हाथ में आती हैं तो मैं ऐसे सत्ता को चिमटे से भी छुना पसंद नही करुंगा।
वाजपेयी यांनी सांगितलेले हे सत्तेचे तत्त्व आज त्यांच्याच पक्षाच्या मंडळींनी बासनात गुंडाळून ठेवले आहे. त्यांच्याच जयंतीच्या दिवशी नाशिकमध्ये कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर निष्ठावंतांनी राडा केला. त्याला कारणही तसेच घडले. ज्यांनी भाजपाला नेहमी दूषणे दिली, ज्यांच्या विरोधात लढाया लढल्या, अशा मंडळींना पक्षात घेऊ नका म्हणून निष्ठावंतांंनी मंत्री महाजनांची वाट अडवली. अटलबिहारी वाजपेयींचे स्वप्न आज साकार झाले. पार्टीचा वटवृक्ष झाला, पण ज्यांच्यामुळे आज भाजपाला हे दिवस आले त्या निष्ठावंतांच्या फांद्या बाहेरचा आयाराम येऊन जर तोडत असेल, तर भाजपाने कार्यकर्त्यांच्या भावनांचा आतला आवाज ऐकला पाहिजे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. सत्तेचा भस्म्या झालेल्या भाजपाला आता पार्टी वुईथ डिफरन्सचा विसर पडला आहे.
दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भाजपामध्ये ज्या मोठ्या घडामोडी झाल्या त्यामुळे नाशिकच्या अंतर्गत राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते केवळ पक्षांतर्गत मतभेद नाहीत, तर ते थेट महाभारत ठरावे असे चित्र आहे. भाजपाचा इतिहास हा कायम शांत, संयमी, शिस्तबद्ध असा असला तरी पक्षशिस्त, वरिष्ठांचा आदेश प्रमाण मानत वाटचाल करणारा आहे. असे असले तरी गेल्या काही वर्षांत भाजपाचा मूळ चेहरा कुठे हरवत चालला, असे दिसून येत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक असो वा काल-परवा झालेली नगरपरिषद, नगरपंचायतीची निवडणूक असो, आकडा गाठण्यात भाजपा यशस्वी झाला असला, तरी अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याशिवाय राहत नाहीत. सर्वच काही आलबेल असल्याचे या घडीला तरी चित्र नाही.
बाहेरून सर्वकाही शांत, संघटित आणि शिस्तबद्ध दिसत असले, तरी पक्षात अंतर्गत कुरुक्षेत्राचे वातावरण तयार होत आहे. दोन दिवसांपूर्वी भाजपामध्ये शहरामधील काँग्रेस, शिवसेना उबाठा आणि मनसे नेत्यांच्या प्रवेशामुळे विरोधकांसह पक्षातील कार्यकर्तेही दुखावले गेले होते. महापालिका निवडणुकीसाठी विरोधक कोणी शिल्लक ठेवता की नाही, असे संकटमोचक म्हणून नाशिकसाठी अघोषित पालकमंत्री असलेले महाजन यांनी मनसे, शिवसेना उबाठा, काँगे्रसमधील दिग्गजांना आपल्या तंबूत घेतल्याने विरोधकांसह स्वपक्षातील कार्यकर्तेही दुखावले गेले आहेत.
आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी एकट्याने विरोध करण्याचे धाडस दाखविले; परंतु त्यांना कार्यकर्त्यांंशिवाय कोणाचीही साथ मिळाली नाही. निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी दिली त्यांनाच विश्वासात न घेता पक्षप्रवेश केल्याने आ. फरांदे यांच्या विरोधाला साथ देण्याचे कष्टही इतर दोन आमदारांनी घेतले नाहीत. फरांदे यांनी, पक्षातील पदाधिकार्यांनीही विरोध केला असता तर कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश गेला असता, अशी खंत बोलून दाखवली. पण आ. फरांदे यांनी ज्या भावना प्रभाग 13 मधील काही मंडळींच्या प्रवेशाच्या वेळी व्यक्त केल्या हेच यापूर्वी त्यांच्याच पक्षातील दोन आमदार बोलत असताना फरांदेंनी चकार शब्दही काढला नव्हता, हेपण लक्षात घेणे गरजेचे आहे. सध्या नाशिकमध्ये सबकुछ गिरीश महाजन असे वातावरण तयार झाले असल्याने पक्षाचे तिन्ही आमदार नामधारी झाले आहेत. एक प्रकारची हतबलता दिसून येत आहे. या तिन्ही आमदारांनी कधी कोणत्या प्रश्नावर एकी दाखवली नसल्याने दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ, या उक्तीप्रमाणे भाजपामधील पदाधिकारी, आमदारांंचा एकमेकांशी ताळमेळ नसल्याने अशा गोष्टी घडल्याची कुजबुज आता कार्यकर्ते करीत आहेत.
सुधाकर बडगुजर यांना विधानसभेवेळी पक्षात घेण्यासाठी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला, तेव्हा आमदार अॅड. राहुल ढिकले आणि प्रा. देवयानी फरांदे यांनी अळीमिळी गुपचिळी साधली. दिनकर पाटील यांनी सीमा हिरे यांना उमेदवारी मिळू नये यासाठी वरिष्ठांकडे जोर लावला होता, पण त्याचा काही उपयोग न झाल्याने नाराजीत भाजपा सोडून मनसेमध्ये प्रवेश केला होता. अॅड. राहुल ढिकले यांच्या विरोधात गणेश गिते यांनी निवडणूक लढवली. दुर्दैवाने गितेंचा पराभव झाला, पण त्यानंतर दोनच महिन्यांत गितेंनी पुन्हा भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे, त्यावेळी गितेंना प्रवेश देऊ नये म्हणून राहुल ढिकले यांनी विरोध केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मधल्या काळात शहरातील ठेक्यावरून देवयानी फरांदे यांनी केलेल्या विरोधामुळे महाजन दुखावले गेल्याने फरांदेंना स्वत:च्या विधानसभेच्या तिकिटासाठीदेखील मोठा संघर्ष करावा लागला होता. अगदी शेवटच्या क्षणी तिकीट मिळाले होते.
पक्षप्रवेशाला विरोध, तिकिटाला विरोध या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर विरोध, नाराजी झाली, दबाव टाकण्यात आला. तरीही प्रवेश झाले. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी या तिन्ही आमदारांना चेकमेट केले आहे. आमदार असूनही निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवले जात असल्याची खदखद आता उघडपणे जाणवू लागली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासारख्या अतिशय महत्त्वाच्या विषयातही तीनही आमदारांना विचारात घेतले जात नाही. ही खदखद कधी ना कधी बाहेर पडणारच आहे. आताही प्रभाग 13 मधील काही मंडळींच्या प्रवेशामुळे फरांदे या दुखावल्या गेल्या आहेत. पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरदहस्त महाजनांना लाभलेला आहे. त्यामुळे महाजन सांगतील तसेच होणार, यात तीळमात्र शंका नाही. सत्ता समीकरणे बदलण्यासाठी नियंत्रण हवे असते. सध्या असे नियंत्रण महाजनांकडे असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे.
या सर्व महाभारतात महाजन हे खलनायक ठरण्याची भावना पक्ष, सोशल मीडिया, तसेच नागरिकांमध्ये रुजत चालली असताना शहरातील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवनातील वृक्षतोडीवरून पेटलेला वाद, पर्यावरण, नागरिकांचा रोष आणि राजकीय आरोपांच्या कचाट्यात ते सापडले; परंतु प्रत्यक्ष झाडे लावून हा प्रश्न लीलया हाताळला. टीका झाली, विरोध झाला; परंतु राजकीय नुकसान टाळले, हे त्यांचे राजकीय कसबच
म्हणावे लागेल.
दोन दिवसांपूर्वी घडलेले महाभारत केवळ पहिला अध्याय असावा. पुढे उमेदवारी, संघटनात्मक फेरबदल, सिंहस्थ कुंभमेळा नियोजन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात ही मोठी ठिणगी मोठी आग बनू शकते. आमदारांची अस्वस्थता, कार्यकर्त्यांचा संभ्रम आणि नेत्यांची वाढती ताकद या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर राजकारण गंभीर वळण घेते. प्रत्येक पक्ष आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करतच असतो. पण, हे करताना विरोधकांना आपल्या पक्षात घेताना स्वपक्षातील निष्ठावान दुखावले जाणार नाहीत, त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजीही नेतृत्वाने घेणे गरजेचे आहे. तसे झाले नाही तर अंतर्गत खदखद निर्माण होऊन काट्याचा नायटाही होऊ शकतो. ‘वसंतस्मृती’मध्ये जे महाभारत झाले त्याचे कारण हेच आहे. सत्तेच्या लालसेपोटी परपक्षातील मंडळी येत असताना निष्ठावंतांनी नेहमी सतरंज्याच उचलायच्या का? दुसर्याच्या पालखीचेच भोई व्हायचे का? ही भीती या कार्यकर्त्यांना सतावत आहे. भाजपाच्या या अंतर्गत संघर्षात एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ही लढाई अजून संपलेली नाही. कोण कोणत्या भूमिकेत असतील हे आगामी काळच सांगू शकेल. नाशिकच्या राजकारणात विशेषत: भाजपात आता महाभारत सुरू झाले आहे. पुढील पर्व अधिक धक्कादायक ठरेल का? याचे उत्तर आगामी काळात मिळेलच. तोपर्यंत वेट अॅण्ड वॉच!
– देवयानी सोनार
The darkness will fade, the sun will rise, the lotus will bloom...Mahabharat will happen!