घरकाम करणार्‍या महिलांसाठी निवडणूक ठरतेय कमाईची संधी

नाशिक : वैशाली लिलके
निवडणुका जवळ आल्या की राजकीय वातावरण तापते. शहरातील रस्ते, गल्लीबोळ, चौक आणि गावोगाव प्रचाराचा जोर वाढतो. झेंडे, बॅनर, पोस्टर, प्रचारपत्रके, बैठका, पदयात्रा यामुळे सर्वत्र गडबड दिसून येते. मात्र, या गडबडीत घरकाम करणार्‍या महिलांसाठी निवडणूक हा केवळ मतदानाचा विषय न राहता कमाईची संधी ठरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
घरकाम करणार्‍या अनेक महिला या नियमितपणे दुसर्‍यांच्या घरी काम करतात. काही महिलांचे उत्पन्न अत्यंत मर्यादित असते. महागाईच्या काळात घर चालवणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत निवडणूक काळात मिळणार्‍या तात्पुरत्या कामामुळे महिलांना आर्थिक दिलासा मिळत आहे. अनेक महिला सकाळी नेहमीप्रमाणे घरकाम करून दुपारनंतर किंवा संध्याकाळी प्रचारकामासाठी वेळ देत आहेत. त्यामुळे त्यांचे मूळ कामही चालू राहते आणि अतिरिक्त उत्पन्नही मिळते. काही महिलांनी सांगितले की, घरकामातून जेवढे पैसे मिळतात, तेवढेच पैसे निवडणूक प्रचारातून काही दिवसांत मिळत आहेत.

प्रचारकामातून रोजगार
निवडणूक प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज असते. प्रचारपत्रके वाटणे, मतदारयाद्या तपासणे, प्रचार साहित्य तयार करणे, बैठकांसाठी स्वयंपाक व व्यवस्था पाहणे, कार्यालयात साफसफाई करणे, फोन कॉल करणे, अशा अनेक कामांसाठी महिलांना प्राधान्य दिले जात आहे. घरकाम करणार्‍या महिलांना ही कामे सहज करता येतात.

दिवसाला मिळतेय मजुरी
प्रचाराच्या कामासाठी महिलांना दिवसाला ठराविक मजुरी दिली जाते. काही ठिकाणी 300 ते 500 रुपये, तर काही ठिकाणी त्याहून अधिक मजुरी मिळत असल्याचे महिलांनी सांगितले. काही राजकीय कार्यकर्ते महिलांना आठवड्याचा पगार देतात. त्यामुळे महिलांना घरखर्च भागवण्यासाठी अतिरिक्त उत्पन्न मिळत आहे.

Elections are becoming an income opportunity for women who work as housewives.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *