शहरातील रस्ते बनले अनधिकृत बाजारपेठ
नाशिक : तेजस खैरे
शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाढत्या अतिक्रमणांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून होत असलेल्या दुर्लक्षावर नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
फुटपाथ आणि रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत दुकाने, कपड्यांचे स्टॉल, हातगाड्या उभारण्यात आल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने थाटण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांसह पादचार्यांनाही कसरत करावी लागत आहे.
शहरातील प्रमुख वर्दळीच्या चौकांपैकी एक असलेल्या उंटवाडी सिग्नलवर दोन्ही बाजूस काही अंतरावरच हातगाडीवरील फळविक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. उंटवाडी ते संभाजी चौकादरम्यानच्या रस्त्यावरच या विक्रेत्यांनी मोठे अतिक्रमण केल्याने रहदारीला वारंवार अडथळा होऊन स्कूलबस, व्हॅन, सिटी लिंक बससह रुग्णवाहिका व अन्य वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या समस्येकडे
महापालिकेकडून सोयीस्कर डोळेझाक होत असल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
या रस्त्यावरूनच इंदिरानगर, पाथर्डी, वडाळा, नाशिकरोड भागातील नागरिक शहरात येतात. त्यामुळे उंटवाडी सिग्नलवरही दिवसभर वाहतुकीची वर्दळ सुरू असते. अशा स्थितीत या सिग्नलच्या दोन्ही बाजूंकडील रस्त्यांवर अतिक्रमण असल्याने वाहतुकीची कोंडी होते. ती नववर्षात दूर व्हावी, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
आडगाव नाका भागात कपडे, खेळण्या व अन्य वस्तू विक्रेत्यांचे अतिक्रमण वाढल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही समस्या आहे. गणेशोत्सवात वाहनांची संख्या वाढणार असल्याने अतिक्रमणधारकांची संख्या अधिक सतावेल. ठिकठिकाणी विक्रेत्यांनी महामार्गालगतच व्यवसाय थाटले आहेत. त्यांच्याकडे येणारे ग्राहक महामार्गावरच वाहने उभी करत असल्याने अन्य भरधाव वाहनांना अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. संबंधित रस्ते विभागासह महामार्ग पोलिसांकडूनही या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष होत असल्याने महामार्गालगत विक्रेत्यांचे जाळे पसरत आहे. दरम्यान, म्हसरूळपासून दिंडोरीरोडवरही पुढे जकात नाक्यापर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा विक्रेत्यांनी ठाण मांडल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. नागरिकांना अनेकदा जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
गर्दीमुळे अपघातांचा धोका वाढला असून, दुचाकीस्वारांना मार्ग काढण्यास अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, अतिक्रमण नियमित होत असतानाही महानगरपालिकेच्या अधिकार्यांकडून कारवाई केवळ कागदोपत्रीच होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. काही दिवस कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण उभे राहत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी तत्काळ अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करण्याची मागणी केली आहे. महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे.
Municipal Corporation’s indifference to encroachments