भगवान विश्वकर्मा एक वैदिक देवता असून, ऋग्वेदाच्या एका सूक्तात यांना पृथ्वी, जल व सर्व प्राणी यांचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ देव म्हटले आहे. सर्व देवांचे नामकरणही भगवान विश्वकर्मा यांनीच केले आहे. भगवान विश्वकर्मा यांना असंख्य मुख, नेत्र, भुजा, पाय, अवयव आणि पंखेही आहेत. सष्टीच्या प्रारंभी केवळ विश्वकर्माच अस्तित्वात होते. प्रारंभी विश्वकर्मा हे सौरदेवतेची उपाधी म्हणून मानले जात होते. पण, नंतरच्या काळात समस्त प्राणिसष्टीचा जनक
मानले गेले.
पुराणे व महाभारत यांत विश्वकर्मा यांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले गेले आहे. भगवान विश्वकर्मा हे प्रभास वसू व बहस्पृतीची भगिनी योगसिद्धा यांचा पुत्र होते. ब्राह्मदेवाच्या दक्षिण वक्षभागातून हे उत्पन्न झाले, असे महाभारतात म्हटले आहे.
भगवान विश्वकर्मा यांनी देवांसाठी शस्त्रास्त्रे, आभूषणे, विमाने इत्यादी अनेक वस्तू निर्माण केल्या. विष्णूंचे सुदर्शन चक्र, शिवाचा त्रिशूल आणि इंद्रांचे वज्र्र व विजयनामक धनुष्य ही शस्रास्त्रे भगवान विश्वकर्मा यांनी निर्माण केली व त्रिपुर दहनाच्यावेळी भगवान शिवासाठी रथ विश्वकर्मा यांनीच बनविला. पद्यपुराणात भगवान विश्वकर्मा यांच्याविषयी एक कथा सांगितली आहे. त्यांना संज्ञानामक कन्या होती. तिचा विवाह विवस्वान म्हणजे सूर्याशी झाला. पण सूर्याचे तेज तिला सहन करता येईना म्हणून ती पित्याकडे आली. तिला नेण्यासाठी पती विवस्वानही भगवान विश्वकर्मा यांच्याकडे आला. तेव्हा भगवान विश्वकर्मांनी त्याचे बरेच तेज काढून त्या तेजापासून देवांसाठी अनेक शस्त्रास्त्रे निर्माण केली.
इंद्रासाठी इंद्रलोक निर्माण केला. सुतल नामक पाताळलोक निर्माण केला. श्रीकष्णांसाठी द्वारकानगरी, वृंदावननगरी, राक्षसांसाठी लंका तसेच हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ हे नगरे भगवान विश्वकर्मा यांनीच निर्माण केली. हेच गरुडभवनाचा निर्माता होय. भगवान विश्वकर्मांची पाच पुत्रे असून, मनुमयत्यष्टातक्ष आणि शिल्पी असून, ते ब्रह्मर्षी होते. मनू ब्रह्मर्षीपासून लोखंडावर कलाकारी करणार्या लोहारांची वंशावळ सुरू झाली. मय ब्रह्मर्षीपासून लाकडावर कलाकारी करणार्या सुतारांची वंशावळ सुरू झाली. त्वष्टा ब्रह्मर्षीपासून तांबे पितळ यावर कलाकारी करणार्या ताम्रकारांची वंशावळ सुरू झाली. तक्ष दैवेज्ञ ब्रह्मर्षीपासून सोन्या-चांदीवर कलाकारी करणार्या सोनारांची वंशावळ सुरू झाली. शिल्पी ब्रह्मर्षीपासून दगडावर कलाकारी करणार्या शिल्पकारांची (पाथरवट) वंशावळ सुरू झाली. ही मुलेच शिल्पशास्त्राचे प्रवर्तक आहेत. या पाच मुलांनीच पाच वेगवेगळ्या शिल्पकारी व्यवसायाला सुरुवात केली. भगवान विश्वकर्मा यांच्या पाच पुत्रांच्या वंशजांनाच पांचाल असे म्हणतात. पांचाल नावासोबतच दक्षिणेत हा समाज विश्वब्राह्मण म्हणून ओळखला जातो. भगवान विश्वकर्मा यांच्या बर्हिष्मतीसंज्ञाछाया व तिलोत्तमा या कन्या होत. हिंदू धर्माचा इतिहास मानल्या जाणार्या वेद, पुराणे, उपनिषदे, अन्य संस्कृत ग्रंथांचा धांडोळा घेतला असता असे लक्षात येते की, भगवान विश्वकर्मा हे देवतांचा कारागीरच नसून, तेच सष्टीनिर्मितीचे बीजे निर्माण करणारे व जड चेतन सष्टी निर्माण करणारे विश्वनिर्माता आहे, अशी माहिती मिळते.
शिवपुराणातील उल्लेखानुसार भगवान श्री शंकराने देवी पार्वतीला सांगितले की, पंचवदन (पाच मुख असलेला) भगवान विश्वकर्मा हाच परमात्मा आदिपुरुष आहे.सष्टीनिर्माताही तोच आहे. विश्वकर्माने आपल्या संकल्पानुसार सुरुवातीलाच सष्टी निर्माण करण्यासाठी जे जे उत्पन्न करावेसे वाटले होते, ते ते सर्वच निर्माण करून ठेवले. शब्दस्पर्शरूप, रसगंध तसेच पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते, तप, सत्य या लोकांचीही निर्मिती केली.
भगवान विश्वकर्मांच्या पाच मुखांपासूनच चौदा भुवने, पंचमहाभूते, पंच, तन्मत्रा, पंचवेद व पंचपुत्र निर्माण झाले. विश्वकर्मांच्या पूर्व मुखाचे नाव ‘सद्योजात’, दक्षिण मुखाचे नाव वामदेव, पश्चिमेकडील मुखाचे नाव अगोर, उत्तरेकडील मुख ईशान या नावाने ओळखले जाते. तर उर्ध्वमुखाला तत्पुरुष हे नाव आहे. स्कंदपुराणतील एका श्लोकात म्हटले आहे की, सर्वदष्टीधारक असलेला भगवान विश्वकर्मा हंसावर आरूढ व शुभमुकुट धारण केलेला आहे. हा परमात्मा वृद्धकाया असून, हातात कम्बासूत्र, जलपात्र, पुस्तक व ज्ञानसूत्र आहे. भगवान विश्वकर्मा यांनी विविध अवतार घेतले आहेत, असा उल्लेख श्रीमद्भागवत, महापुराण, वायुपुराण, ब्रह्मांडपुराण, भविष्यपुराण, हरिवंशपुराण, स्कंदपुराण, महाभारत आदी ग्रंथांत आहे. विश्वकर्मात्मज समाजालाच विश्वब्राह्मण, पांचाल ब्राह्मण, कामलार, जांगीड ब्राह्मण, रथाकार, तरखान, रथपती, नारांशस अशा विविध नावांनी अन्य राज्यांत ओळखला जातो.
महाराष्ट्रात हा समाज पांचाल म्हणून ओळखला जातो. विश्वकर्मा समाज गळ्यात जानवे घालतो म्हणून काही ठिकाणी जानवे समाज असेही म्हणतात. विश्वकर्मा समाज हा उज्ज्वल पौराणिक इतिहासाचा वारसा असलेला समाज आहे. पौराणिक काळात विश्वकर्मा समाज सामाजिकद़ृष्ट्या पुढारलेला होता. विद्यमान ब्राह्मण समाजासोबत वावरत होता.
दक्षिण भारत, बिहार, गुजरात, राजस्थान या राज्यांतील या समाजामध्ये आपल्या पौराणिक इतिहासाची जाणीव आहे. वेगवेगळ्या राज्यांत त्या त्या भगवान विश्वकर्मा अवतारांचे जन्मदिन साजरे होतात. महाराष्ट्र, दक्षिण भारत व उत्तर भारतातील काही राज्यांतील पांचाल समाज माघ शुद्ध त्रयोदशी या दिवशी विश्वकर्मा जयंती साजरी करतात. आजच्या भगवान विश्वकर्मा जयंतीनिमित्त भगवान विश्वकर्मांना कोटी कोटी वंदन. (संदर्भ : विश्वकोश खंड व संस्कृतीकोश)
The original architect of creation – Lord Vishwakarma