अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने पवार परिवाराला धक्का बसला. अचानक बसलेल्या धक्क्यातून पवार परिवार सावरला आहे. सुनेत्रा पवार सरकारमध्ये सहभागी झाल्या. शरद पवारही सावरले आहेत. सुप्रिया सुळे संसद अधिवेशनासाठी दिल्लीला गेल्या. अजितदादांचा दशक्रिया विधी, तेरावा, असे काही विधी व्हायचे आहेत. असे असले, तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण होणार काय? पवार परिवार पुन्हा एक होणार काय? असे काही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. एकत्र येण्याची अजितदादांची इच्छा होती, असाही दावा केला जात आहे. अजितदादांंचे काही निष्ठावंत एकत्र येण्याविषयीच्या गोष्टीला दुजोरा देत आहेत. शरद पवार व पार्थ पवार यांच्यात तासभर सकारात्मक चर्चा झाल्याचे बोलले जाते. अजितदादांनी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे दावे केले जात असले, तरी आता अजितदादा हयात नसल्याने त्यांच्या इच्छेची पुष्टी करता येत नाही. किंबहुना त्यांनी तसे म्हटले होते, याला सबळ पुरावे नाहीत. कोण काय म्हणतंय, याला काही महत्त्व नाही. शरद पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची एकत्र येण्याची इच्छा असली, तरी अजितदादांचे समर्थक मात्र एकत्र येण्यास तयार नसल्याचे सध्या तरी दिसत आहे. सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीविषयी आपल्याला काहीही माहिती नाही, असे शरद पवार म्हणाले होते. यानंतर पार्थ पवार यांनी थेट गोविंदबागेत शरद पवार यांची भेट घेतली. सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन पार्थ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. या भेटीत एक तास चर्चा झाली. यावेळी रोहित पवार, सुप्रिया सुळे हेदेखील उपस्थित होते. नंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार यांनी फोनवर चर्चा केली, असेही बोलले जाते. दोन्ही पक्ष एकत्र येणार किंवा पवार परिवाराचे मनोमिलन होणार याविषयी केवळ चर्चा आहे. बारामतीच्या पवार घराण्याविषयी नेहमीच सस्पेन्स असतो. तोच सस्पेन्स एकत्रीकरण व मनोमिलन याविषयी आहेच. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार की नाही याकडे लक्ष वेधले गेले आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर महाराष्ट्रातील जनतेलाही उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एकत्र आले होते, तेव्हा काका-पुतणे एकत्र येणार, असे बोलले जात होते. अजितदादांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता, असे शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजितदादांच्या निधनानंतर दोन दिवसांतच म्हटले होते. शरद पवार यांनीही तसा दावा केला होता. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर एकत्र येण्याची चर्चा अजितदादा गटाच्या बाजूने थांबली आहे. अजितदादांच्या काही निष्ठावंतांचा शरद पवार यांच्याबरोबर परत जाण्यास विरोध असल्याचे दिसते. अजितदादा गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ आदींनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री होण्याची विनंती केली होती. त्यांनी नेत्यांच्या विनंतीला मान दिला. सुनेत्रा पवार शपथ घेणार असल्याची माहिती शरद पवार येईपर्यंत पोहोचू दिली गेली नाही. दुसरीकडे, पार्थ यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याने सस्पेन्स वाढला. पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहेत. सुनेत्रा पवार लगेच काही निर्णय घेतील, असे काही दृष्टिपथात नाही. प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ यांच्यासह आमदारांना विचारात घेतल्याशिवाय सुनेत्रा पवार काही निर्णय घेणार नाहीत. शरद पवारांनी पार्थ यांना काय सांगितले, हे काही कळायला मार्ग नाही. तसे ते बाहेर येणार नाही. मात्र, एकत्रीकरण व मनोमिलन होणार असल्याची केवळ चर्चा आहे. दोन्ही पक्ष एकत्र आलेच, तर भाजपाबरोबर सत्तेत राहायचे की नाही, हाच कळीचा मुद्दा आहे. अजितदादा गटाचे मंत्री व आमदार सत्तेची वळचण सोडतील, असे काही वाटत नाही. प्रफुल्ल पटेल यांना केंद्रात मंत्री होण्याचीही संधी आहे. शरद पवार यांचा भाजपाला तीव्र विरोध आहे. याचा विचार करता, अजितदादा गटाची मंडळी सत्ता सोडतील, असे वाटत नाही. सुनेत्रा पवार यांनी शपथविधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे घेतली. यावरून त्यांचा कल कुठे आहे, हे दिसत आहे. भविष्यात मोदी, शहा व फडणवीस यांच्यासमोर सुनेत्रा पवार कशी मुत्सद्देगिरी करतात, हा मोठा प्रश्न आहे. अजितदादा यांच्यात बेधडक निर्णय घेण्याची क्षमता होती, बंड करण्याची तयारी होती याविषयी वाद नाही. अजितदादांच्या पावलावर पाऊल ठेवून सुनेत्रा पवार पुढे चालतील, असे बोलले जात आहे. दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण व परिवाराचे मनोमिलन याविषयी अजितदादा हे सुनेत्रा पवार यांच्याशी काही बोलले असतील तर काही माहिती नाही. दु:खदप्रसंगी गप्प बसण्याचे त्यांनी ठरविले आहे. पण मागेपुढे त्यांना पक्षाविषयी काही निर्णय घ्यावे लागतील. परिवार म्हणून पवार कंपनी वेगवेगळ्या प्रसंगी एकत्र येतील. काका-पुतणे एकत्र येतच होते. पवार परिवाराविषयी तसा सस्पेन्स असतो. नजीकच्या काळात तो अधिक प्रकर्षाने जाणवेल.
Suspense