पालखी मिरवणुकीत ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या नादात भक्तीची लय
सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील मर्हळ मध्यरात्रीचे तीन वाजले होते आणि ‘येळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषाने संपूर्ण गाव जागे झाले होते. पांगरीहून आलेल्या मानाच्या रथासोबत सजवलेली पालखी महाल बागेकडे निघाली. तीन क्विंटल भंडार्याच्या उधळणीने गाव पिवळ्या श्रद्धेने न्हालं होतं. शेतकरी, कामगार, लहान, थोर खंडोबाच्या भक्तीत तल्लीन झाले होते.
मर्हळची ही चार दिवसांची यात्रा फक्त उत्सव नाही, तर गावाची ओळख आहे. परिसरातील आठ ते दहा गावांचे कुलदैवत असलेला खंडोबा महाराज येथे दरवर्षी लाखो भाविकांचे दर्शन घेतो. सोमवारी (दि.2) रात्री 12 वाजता मानाचा रथ मंदिरात दाखल झाला आणि मध्यरात्री देवाला पालखीत विराजमान करून भव्य मिरवणूक सुरू झाली. रात्री 3 वाजता पालखी महाल बागेत पोहोचली. मुंबई येथील जय मल्हार मित्रमंडळाच्या आतषबाजीने उत्सवाला वैभव वाढवला.
मंगळवार(दि.3)पासून गुरुवारपर्यंत यात्रोत्सव रंगणार आहे. मंगळवारी दुपारी बैलगाडा शर्यतींनी शेतकर्यांच्या ताकदीचा जल्लोष पाहायला मिळाला, तर रात्री पांडुरंग मुळे आणि तमाशा पार्टीने पारंपरिक लोककलेचा ठेका धरला. बुधवारी कुस्तीची दंगल होणार आहे आणि रात्री पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या तमाशा मंडळाने भाविकांना मंत्रमुग्ध केले जाणार आहे. चार दिवसांची ही यात्रा संपेल. भंडार्याचा रंग हळूहळू फिका होईल, पण ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा नाद, खंडोबावरची श्रद्धा आणि मर्हळकरांची भक्ती वर्षभर मनात घर करून राहणार आहे.
यात्रेत भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य
लोकवर्गणीतून 20 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यापैकी 12 गावात, तर 8 यात्रा स्थळ परिसरात कायमस्वरूपी कार्यरत राहणार आहेत. यात्रेनंतर हे कॅमेरे खंडोबा मंदिरात बसवले जातील.
Marhal’s Khandoba Yatra: A village bathed in yellow