सात संशयितांवर गुन्हा; सरपंचावरही गुन्हा दाखल करा
घोटी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथे किरकोळ वादातून गंभीर स्वरूपाची घटना घडली. शरद शिंदे, बाळासाहेब शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांवर विद्यमान सरपंच व उपसरपंच यांच्या वतीने जमावाने हल्ला केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सात संशयितांवर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून, सरपंच, उपसरपंचांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिंदे कुटुंबांनी केला आहे.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी शरद राजाराम शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उंबरकोण येथे 5 फेब्रुवारीला रात्री साडेनऊच्या सुमारास संशयित संदीप पंडित सारुक्ते, संजय किसन सारुक्ते, शिवाजी अनुराम सारुक्ते, रतन कचरू सारुक्ते, विनोद रतन सारुक्ते व समाधान दामू जगताप (सर्व रा. उंबरकोण) यांनी किरकोळ कारणावरून ‘शिवीगाळ का करतो’ असे म्हणत शरद शिंदे यांना शिवीगाळ करून मारहाण केली. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, उंबरकोण गावाच्या विद्यमान सरपंचांनी फसवणूक करून मला उंबरकोण फाटा येथे बोलावले. त्यानंतर त्या ठिकाणी आधीच जमलेल्या सरपंच, उपसरपंच व पाच ते सहा जणांनी संगनमत करून लाकडी दांडे, लोखंडी रॉड व धारदार वस्तूंनी जबर मारहाण केली. या हल्ल्यात शरद शिंदे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर जखमी व्यक्तीच्या कुटुंबीयांनी संबंधित विद्यमान सरपंचांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, याच दिवशी बाळासाहेब शिंदे यांच्या कुटुंबावरदेखील हल्ला करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. विद्यमान सरपंच, उपसरपंच व जमावाने बाळासाहेब शिंदे यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. या घटनेत शिंदे यांच्या पत्नीच्या अंगावरील मंगळसूत्र जबरदस्तीने काढून घेतले असून, महिलेलाही मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हा प्रकार गंभीर व कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारा असल्याचे ग्रामस्थांतून बोलले
जात आहे.
याप्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात फिर्यादी शरद शिंदे यांना झालेल्या मारहाणीत घोटी पोलिसांनी गुन्हा दाखल आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. बी. देवरे यांच्यासह हवालदार पंकज दराडे, गुरुदेव मोरे, गौरव सोनवणे, पोलीस शिपाई सनी भवर व अनिकेत मोरे तपास करीत आहेत.
Mob attacks Shinde family in Umbarkon