12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा

मुंबई : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते. सोमवारी (दि. 9) या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. अंतिम निकाल हाती आले आहेत. महानगरपालिकांच्या निकालाप्रमाणेच या निवडणुकीतही महायुतीने बाजी मारली आहे. 12 पैकी 7 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा फडकला आहे. दोन ठिकाणी शिवसेना (शिंदे गट) आणि दोन ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला आहे. एका जिल्हा परिषदेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे.

राज्यातील 12 पैकी 7 जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. यात सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा आणि सोलापूर या जिल्हा परिषदांचा समावेश आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरी या 2 जिल्हा परिषदांवर भगवा फडकवला आहे. तर पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीने शानदार विजय मिळवला आहे. सांगलीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.
सिंधुदुर्ग मध्ये भाजपने 50 पैकी 27 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे, तर शिवसेनेला 14 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला 3 आणि इतरांना 6 जागा मिळाल्या आहेत. सातार्‍यात भाजपला 65 पैकी 24 जागा मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादीला 23 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या आहेत. सोलापूरमध्ये भाजपला 68 पैकी 42 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 9 जागा मिळाल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपला 63 पैकी 23 आणि शिवसेनेला 21 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाला 9 जागा मिळाल्या आहेत. परभणीत 54 पैकी भाजपला 24 आणि राष्ट्रवादीला 15 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. धाराशिवमध्ये भाजपला 55 पैकी 18 आणि शिवसेनेला 15 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळाल्या आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. लातूरमध्ये भाजपला 59 पैकी 18 आणि राष्ट्रवादीला 12 जागा मिळाल्या आहेत. या ठिकाणी काँग्रेसला 23 जागा मिळाल्या आहेत, मात्र काँग्रेसला बहुमत गाठता येणार नसल्याचे समोर आले आहे.

कोणत्या पक्षाने किती जिल्हा परिषदा जिंकल्या?
♦  भाजप (7) – सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, सातारा, सोलापूर.
♦ शिवसेना (2) – रायगड, रत्नागिरी
♦  राष्ट्रवादी (2) – पुणे, कोल्हापूर
♦ राष्ट्रवादी शरद पवार (1) – सांगली

पुण्यात राष्ट्रवादीच नं. 1

पुण्यातील 73 पैकी 51 जागांवर राष्ट्रवादीने (अजित पवार गट) दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला 68 पैकी 20, भाजपला 12 आणि शिवसेनेला 9 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी महायुती सत्ता स्थापन करणार आहे. रायगडमध्ये शिवसेनेने 59 पैकी 21, भाजपने 15 आणि राष्ट्रवादीने 16 जागांवर विजय मिळवला आहे. तर रत्नागिरीत 56 पैकी 40 जागांवर शिवसेनेचा विजय झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *