देवाचा नगारा…

भारतरत्न लता मंगेशकर यांचा चौथा स्मृतिदिन झाला. 6 फेब्रुवारी 2022 रोजी वसंत पंचमीच्या पवित्र मुहूर्तावर या जगातून त्यांचे महानिर्वाण झाले. हृदयनाथजी त्यांच्या भगिनी लतादीदींच्या आठवणींचा जो स्मृतिपट लेखांच्या शृंखलेतून स्वतःच्या शब्दांत मांडत आहेत, त्यांचे लेखन म्हणजे एक प्रकारच्या समिधाच आहेत. त्या वाचकांच्या अंतरात अनंत काळ मंगेशकर घराण्याच्या अग्निशिखा शिलगावत ठेवतील.
समिधा रुक्ष भासल्या तरी कधीकाळी त्या हिरव्यागार, रसरशीत, मृदुल असतात, पण त्यात अग्नी ज्वलंत करण्याचे तेज त्या सुकून रुक्ष झाल्यावरच येते. एकदा का कोवळ्या शाखेस समिधा स्वरूप प्राप्त झाले की, त्यानंतर त्या अंतरअग्नी फुलवण्याची क्षमता अंगी बाणवतात. कोणतेही सामान्य गवत समिधा बनत नाही. समिधा बनण्यासाठीची पवित्रता, श्रेष्ठत्व, भव्यत्व जन्मजात असणे आवश्यक असते. एका खानदानी डेरेदार वृक्षाचीच ती शाखा असावी लागते. अग्निकुंडात ज्याप्रमाणे समिधा स्वाहा केल्या जातात त्याप्रमाणे लतादीदींनी स्वतःच समिधास्वरूप साक्षी होऊन लहानपणापासून हृदयनाथांच्या मनात बाबांच्या दुःखाचे अग्निहोत्र ज्वलंत ठेवलेले होते.
लतादीदी स्वतःच तेजस्विता द्रष्ट्या ईश्वरीय आत्मा होत्या, त्यांच्या तेजस्वी अमृत स्वरांनी संपूर्ण भारतीय समाज गेली नऊ दशके प्रभावित झालेला आहे.
असे म्हणतात, जातिवंत, प्रतिभावंत कलाकार प्रतिभा जन्मजात घेऊन जन्मास येतो, तरी सद्गुरूंच्या सहवासात त्याच्या कलेस पैलू पाडून कला बहुगुणी खुलते, हे लतादीदींनी स्वतः अनुभवले होते. त्यांचे वडील प्रत्यक्षात मास्टर दीनानाथांची तालीम त्यांना मिळाली होती. तशी तालीम हृदयनाथजींना वडिलांकडून प्रत्यक्षात मिळाली नव्हती. कारण ते साडेचार वर्षांचे असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे वयात येणार्‍या हृदयनाथांशी लतादीदी दररोज संवाद साधत असायच्या. ज्येेष्ठ भगिनी, गुरुत्व व ममत्वाने ओतप्रोत असलेल्या दीदी त्यांचे लहान बंधू हृदयनाथ यांच्याशी जाणीवपूर्वक संवाद साधायच्या, हे लक्षात येते. दीदींचे बाळशी (हृदयनाथांचे बालपणीचे नाव) झालेले त्या काळातील हितगुज म्हणजे बाळच्या मनात संस्कारांची, मंगेशकर घराण्याची बीजपेरणीच होती, असे हृदयनाथजींच्या लेखनातून जाणवते. या संवादातून त्या युवा हृदयनाथाला घडवत आहेत, असे लक्षात येते. जसे माता जिजाऊंनी बाल शिवबास घडविताना सनातनी पुराणातल्या कथा तर ऐकवल्या होत्याच, पण त्यासोबत शहाजीराजांच्या आगतिकतेची जाणीवही करून दिली होती. अगदी तसेच लतादीदींनी बाळासाहेब मंगेशकरांना आईच्या ममतेने व दूर दृष्टिकोन ठेवून घडविले होते.
लतादीदी बाळ हृदयनाथशी बोलताना त्यांचे बाबा मास्टर दीनानाथ यांची गोव्याच्या मंगेशी मंदिरातील एक आठवण सांगतात…
लता इथेच थांब. पुढे जाऊ नकोस. ही जागा म्हणजे आपला गाभारा. हा नगारा बघतेस ना! तोच आपला मंगेश. – बाबा म्हणतात.
पण बाबा….. मंगेशापासून आपण खूप लांब उभे आहोत.
– लता
बाबांनी म्हणजे मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी छोट्या लताला ही जाणीव करून दिली होती की, मंगेशीच्या मंदिरातील नगार्‍याची जागा हीच आपली हद्द आहे. त्यापुढे आपण जाऊ शकत नाही. याचे शल्य त्यांच्या मनात असावे. त्याच मंगेशाची सेवा त्यांनी आयुष्यभर केली आणि मंगेशाच्या आशीर्वादाने पुढे बाबांचे मंगेशकर हे आडनाव केवळ आडनाव म्हणून परिचित नाही तर भारतीय स्वरांचा पंचाक्षरी मंत्र म्हणून जगप्रसिद्ध झाले.
हृदयनाथजी लिहितात, दीदींच्या मनात बाबा कसे होते? दिव्य सौंदर्याने नटलेले बाबा उभे होते. ते दिव्य सौंदर्य कसे होते? बाबांच्या दिव्यत्वाची प्रचिती लतादीदींना लहानपणीच आली होती. यासाठी हृदयनाथजींनी ज्ञानेश्वरीतील विविध अद्वितीय ओव्यांचे संकलन करून फार सुंदर काव्य निर्माण केले आहे. ही खास हृदयनाथी शैली आहे.
विद्युतल्लेेची विडी । वन्हि ज्वाळांची घडी । पंथ रेयाची चोखडी । घोटीव जैसी ॥
केसराच्या स्वयमेव रंगा सारखी । रत्नरूप बीजाच्या नव
अंकुशसारखी ॥
त्यात अवयवकांतीची झांक दिसते तसे बाबा होते…
मंगेशी मंदिरातील नगार्‍याबद्दल हृदयनाथजींनी त्यांच्या मूळ लेखात भरपूर लिहिले आहे. त्यावरून प्रश्न पडतो की, मास्टर दीनानाथांच्या बालपणातील मंगेशीच्या मंदिरातील ’नगारा’ हा त्यांच्या आयुष्यातील शत्रू समजावा की मित्र? की नियतीचं खेळणं? छोट्या बालकास चार पैसे मिळतात म्हणून नगारा वाजवायला लावणारे भटजी, वडील, आई कोणास दोष द्यावा? नगारा वाजवल्यामुळे बालकास तालाचे अंग कळले व नैसर्गिकच बाल दीनानाथ यांची लय अतिशय पक्की आहे, हे जाणवून अंगभूत कलेची जाणीव झाली याबद्दल ऋणी राहावे? आयुष्यात घडणार्‍या घटना परस्परसापेक्ष असतात. त्यातून मुक्त अर्थ प्रतीत होत राहतात, लहरी वार्‍याप्रमाणे अर्थ वाहत राहतात. कोणी बोटांतून रक्त येईपर्यंत रियाज करून स्वतःस घडवितात. कोणास नियती तशी परिस्थिती निर्माण करून घडविते. शेवटी रसिकांना सगळा चमत्कारच वाटतो.
मास्टर दीनानाथ छोट्या लतास सांगतात, लता, या नगार्‍याचा नाद म्हणजे आपला देव, खरंय बालपणी ज्या नगार्‍याने अक्षरशः दीनानाथांचे रक्त शोषून घेतले होते, त्याचे फलित म्हणजे नभाकाराचे स्वर बाल दीनानाथांना प्राप्त झाले आणि पुढे ते मास्टर दीनानाथ झाले.
दीनानाथांची जीवनकथा फार अद्भुत आहे. दीनानाथांची ही कथा वाचताना कित्येकदा गळा दाटून येतो, डोळ्यात अश्रूंचा पूर दाटतो… त्यांच्या जखमी हृदयातील रक्ताचे शिंतोडे मंगेशीच्या मंदिरातील गाभार्‍यात पसरलेले दिसू लागतात. स्वतःचेच रक्त स्वतःच पुसणारा बाल दीनानाथ दिसू लागतो.
कठीण हृदयाचे रागीट काळेकुट्ट भटजी नजरेत आग निर्माण करतात…. पण दिव्य आत्म्यांची कुंपणे आजवर अशी काटेरीच आढळलीयत… नाही का? मीराबाई, ज्ञानेश्वर, कान्होपात्रा, येशू अपवाद होते का? नाही ना? सोनं जाळल्यानंतरच कळते की ते बावनखणी आहे की खोटं आहे. नियतीची ती योजनाच असते असे म्हणावे का? अद्वितीय कलाकाराच्या बाबतीतही तसेच होते. लतादीदींच्या स्मृती गंगाजलाप्रमाणे आहेत. मनात पाझरल्या की मन पवित्र होते.
कमल यूंही कमल नही होता
काटों की दिवार चुभती होगी
मिट्टी की दलदल डुबाती होगी
किचड अंदर खिंचता होगा
पर फिर भी कमल हसकर
मुस्कुराता फिर खिलता हैं
तभी ऐसा कमल विष्णूपद पर
विराजित पद्माकर बनता हैं
खुबसूरती बरकरार रखकर
कमलाकर कहलाता हैं !
– लक्ष्मीमंगेश (कवी)

God’s drum…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *