सोनोशी येथील आठ गाळ्यांच्या वीजतारा लंपास
वासाळी : वार्ताहर
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात अनेक ठिकाणी नवीन गावठाण विद्युत वाहिन्यांची कामे झाली आहेत. त्यात वीजप्रवाह नसल्याने चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात वीजतारांची चोरी केली आहे. चोरट्यांनी सोनोशी गावठाणमधील सुमारे आठ गाळ्यांच्या वीजतारा लंपास केल्या आहेत.
शासनाच्या नवीन धोरणानुसार (स्कीम) शेती व गावठाण ही दोन स्वंतत्र्य फिडर निर्माण करून शेतीसाठी ठराविक वेळेत थ्रीफेज व गावांसाठी चोविस तास थ्रीफेज विद्युत पुरवठा पुरविण्यासाठी विद्युत कंपनीने परदेशवाडी उपकेंद्रातून ठेकेदारामार्फत वीजवाहिन्यांची कामे पूर्ण केली जात आहेत;परंतु ठेकेदारांना केलेल्या कामाची रक्कम न मिळाल्याने सदर वाहिन्या विद्युत कंपनीच्या ताब्यात दिलेल्या नाहीत. यामुळे या वाहिन्यांमध्ये विद्युत प्रवाह नसल्याने याच संधीचा फायदा घेऊन हजारो रुपयांची अॅल्युमिनियम तारांची चोरी केली आहे. एक ते दोन वर्षांपासून सदरची कामे रेंगाळली होती. मात्र टाकेद बांबळेवाडी, सोनाशी, अधरवड अशी अनेक ठिकाणची कामे पूर्णत्वास गेली आहेत.चोरट्यांनी सोनोशी येथे सुमारे आठ गाळ्यांच्या विद्युत तारा लंपास केल्या आहेत. सोनोशी येथे जुनी लाइन व नवीन लाइन क्रॉसिंग असलेल्या ठिकाणी चोरट्यांनी तारा लंपास केल्याने सुमारे पाच ते सहा तास बाराशिंगवे फिडर बंद होते. परिसरात प्रत्येक गावांत आठ तास थ्रीफेज असल्याने अनेक व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. चोवीस तास थ्रीफेज लाइन असल्या, राईस मिल, पिठाची गिरणी, कांडप यंत्र, वेल्डिंग असे अनेक धंदे व्यवस्थित चालू होतील.पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मिटेल. याबाबत विद्युत कंपनी व ठेकेदारांनी योग्य तो समन्वय साधून गावठाण फीडर चालू करावेत, अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे.
लवकरच वरिष्ठ अधिकारी ठेकेदारांशी चर्चा करून एका आठवड्यात नवीन विद्युत वाहिन्यांतून वीजपुरवठा सुरू करण्यात येईल. प्रथमतः टाकेद फीडर चालू करून गावाला चोवीस तास थ्रीफेज वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.
– निखिल शेलार, कनिष्ठ अभियंता, घोटी ग्रामीण
Cable theft due to lack of electricity