विभाजित राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी!

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विलीनीकरणाच्या चर्चेने प्रचंड जोर धरलेला होता. शरद पवार गटाने तर अजित पवार गटाला आणि सत्ताधारी भाजपला पेचातच पकडले होते. अजितदादांच्या आकस्मिक निधन झाल्यामुळे परिस्थिती फार नाजूक होती. अशा वेळी काय प्रतिक्रिया द्यायची हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना अवघड होऊन बसलेले होते.
कारण पक्ष जरी दोन असले तरी पवार कुटुंबीय एक आहेत. त्यामुळे नेमके काय बोलावे हाही प्रश्न होता, कारण पवार कुटुंबीयांच्या याच एकीच्या बळाने अजितदादांना पहाटेचा शपथविधी घेतल्यानंतर पुन्हा मागे स्वगृही आणले होते. त्यामुळे फडणवीसांची मोठी फटफजिती झाली होती. केले काय आणि झाले काय, अशी त्यांची अवस्था झाली होती. कारण काकांनी फडणवीसांचा डाव उधळून लावला होता. त्यामुळे पुढे जेव्हा फडणवीसांना या पहाटेच्या शपथविधीविषयी विचारले जायचे तेव्हा ते म्हणत, ती आपल्या आयुष्यात झालेली मोठी चूक होती. त्यामुळे माझी विश्वासार्हता कमी झाली. त्याची किंमत आपल्याला मोजावी लागत आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या महापालिकांमध्ये पवार कुटुंबीयांचे राजकीय बळ आहे. जेव्हा त्या महापालिकांच्या निवडणुकांचा प्रचार सुरू झाला तेव्हा अजित पवार भाजपविरोधात आक्रमक झाले होते. त्यामुळे जरी राज्यात ते सत्तेत असले तरी भाजपने त्यांची ती टीका गांभीर्याने घेतलेली होती. त्यामुळे या महापालिका निवडणुकांनंतर आपले भाजपशी कसे संबंध राहतील, याविषयी अजितदादांच्या मनात शंका असावी, त्यामुळे पुढील काळात पूर्वीप्रमाणेच पुन्हा काकांसोबत जाऊन सगळी राष्ट्रवादी एक करावी, असा विचार अजितदादांच्या मनात घोळत असावा. कारण अजितदादा जी महत्त्वाकांक्षा घेऊन भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते, ते मुख्यमंत्रिपद त्यांना मिळणेच शक्य नव्हते. त्यामुळे तिथे फार काळ राहण्यापेक्षा पुन्हा मागे येऊन पक्षाची व्यापक बांधणी करून पुढील काळात काकांचे उत्तराधिकारी म्हणून आपल्याला कारभार पाहता येईल. त्याच माध्यमातून मुख्यमंत्री होता येईल, पण आता अजितदादा गेल्यानंतर हे सगळे अंदाज ठरलेले आहेत.
अजितदादा गेल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत पहिल्यांदा शरद पवारांनी आपले मत मांडले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजितदादा माझ्याबरोबर कुठलाही निर्णय घेताना चर्चा करत असत. त्यामुळे जर ते इतका मोठा निर्णय घेणार होते, तर त्यांनी माझ्याबरोबर चर्चा केली असती. त्यावर शरद पवार म्हणाले, की विलीनीकरणाविषयी चर्चा झाली त्या बैठकीत जे होते त्यांना ते माहीत आहे. त्यानंतर शरद पवारांच्या गटातील नेत्यांनी विलीनीकरणाची चर्चा लावून धरली, पण अजितदादांच्या राष्ट्रवादीतील मंडळी विलीनीकरणाबाबत बोलत नव्हती. उलट त्यांनी दुःखात असलेल्या सुनेत्रा पवार यांना अजितदादा गेल्याच्या तिसर्‍या दिवशी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली. त्यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या सादरीकरणाला भावनिक धार होती. कुणालाही कळवले नाही किंवा निमंत्रण दिले नाही. कारण त्यांना सत्तेची पदे आपल्या हातून जाऊ द्यायची नसावी.
शरद पवार गटाची मंडळी कितीही जोर लावत असली तरी खरेतर ज्यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हाच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा प्रश्न संपला होता. तरीही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे विलीनीकरणाबाबत बोलत राहिले. विलीनीकरणानंतर अजितदादा हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते होणार होते, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितले. इतकेच नव्हे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पवारांच्या नव्या पिढीतील नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांचा विमान अपघात कसा झाला, का झाला, त्यामागील कारणे काय असू शकतात, त्यावरून कुणावर कारवाई करायला हवी, याविषयीचे अतिशय सविस्तर असे सचित्र सादरीकरण केले. ते वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आले. अजितदादांच्या अपघाती निधनामागील सत्यता स्पष्ट होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला.
आ. रोहित पवार यांनी अजितदादा गेल्यावर त्यांच्याविषयी भावनिक पोस्ट केल्या होत्या. इतकेच नव्हे, तर त्यांनी केलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलीनीकरणासाठी आक्रमक पवित्रा घेतलेला असताना शनिवारपासून त्यांनी आपली शस्त्रे म्यान करायला सुरुवात केली. आक्रमक झालेले शशिकांत शिंदे म्हणाले, की विलीनीकरणाच्या विषयाला आम्ही पूर्णविराम देत आहोत. कारण लोकांना वाटेल की, आम्हीच विलीनीकरणासाठी मागे लागलो आहोत, त्यांना गरज नाही. शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनीही विलीनीकरणावर चर्चा करावी असे वाटत नाही, आमचा स्वतंत्र पक्ष आहे. आमच्या पक्षाचे नेते शरद पवार आहेत, आम्ही सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांना वेळ आली तर मदत करू. उद्याचे काही सांगता येत नाही, नियतीच्या मनात काय आहे कळत नाही, अशी भाषा करून या विषयाला पूर्णविराम दिलेला दिसत आहे. विभाजित राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी आणि पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंंबीयांची ताकद निर्माण व्हावी, अशी आशा कुटुंबप्रमुख या नात्याने शरद पवारांना वाटत असावी. त्यामुळेच त्यांनी विलीनीकरणाच्या विषयाची सुरुवात केली असावी. काही दिवस उलटल्यावर त्या प्रयत्नांना यश येईल, अशी आशा उरलेली नाही, असे लक्षात आल्यावर विलीनीकरणाची चर्चा बंद करा, अशा सूचना पवारांनी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना दिल्या असाव्यात. आता रोहित पवारही अजितदादांच्या अपघाती निधनाच्या चौकशीबद्दल किती आग्रही आणि आक्रमक राहतील, हाही एक प्रश्न आहे. एकूणच दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचेच विलीनीकरण झालेले आहे, असेच म्हणावे लागेल.

The divided Nationalist Congress Party should unite!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *