माजी कर्णधारांची विनवणी

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्या प्रकृतीची चिंता जगभरातील प्रमुख देशांतील क्रिकेट संघांच्या माजी कर्णधारांना लागली आहे. यामध्ये भारताचे माजी कर्णधार व महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर व कपिल देव यांचाही समावेश आहे. इम्रान खान यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या, अशी विनंती माजी कर्णधारांनी पाकिस्तान सरकारला पत्र लिहून केली आहे. त्यांना योग्य वागणूक देण्याची मागणीही करण्यात आली आहे. भारत व पाकिस्तान हे दोन देश एकमेकांच्या देशात जाऊन सध्या कोणतीही क्रिकेट मालिका खेळत नाहीत. पुलवामानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध ताणाचे आहेत. क्रिकेट संबंधही ताणले गेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांत त्रयस्थ ठिकाणी एकमेकांविरुद्ध दोन्ही देशांचे संघ सामने खेळतात. गेल्या 15 फेब्रुवारी 2026 रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे टी-20 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही देश आमनेसामने आले होते. त्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात केली. पण त्याआधी कोलंबोत भारताविरुद्ध क्रिकेट सामना खेळण्यास पाकिस्तानने नकार दिला होता. सामना खेळला नाही, तर होणार्‍या परिणामांचा विचार करून पाकिस्तानने माघार घेऊन सामना खेळण्यास होकार दिला होता. कोणत्याही पातळीवर भारताचे पाकिस्तानशी संबंध चांगले नसले, तरी त्या देशाच्या माजी कर्णधारांच्या प्रकृतीची चिंता सुनील गावस्कर आणि कपिल देव यांना लागली आहे. या दोघांनीच नाही, तर इतर देशांच्या माजी कर्णधारांनी चिंता व्यक्त केली आहे. ही क्रिकेटमधील एक माणुसकी म्हणावी लागेल. भ्रष्टाचाराच्या विविध आरोपांवरून इम्रान खान यांना न्यायालयाने शिक्षा सुनावलेली आहे. सुमारे आठशेपेक्षा अधिक दिवस ते तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तुरुंगातील त्यांच्या उपचारांबद्दल प्रश्न आणि चिंता निर्माण होत आहेत. इम्रान खान यांची बहीण अलिमा खानुम यांनी माजी पाकिस्तानी पंतप्रधानांच्या तुरुंगातील वागणूक आणि त्यांच्या बिघडत्या प्रकृतीविरुद्ध आवाज उठवला होता. बेलिंडा क्लार्क (ऑस्ट्रेलिया महिला कर्णधार), ग्रेग चॅपेल (ऑस्ट्रेलिया), मायकेल आथर्टन (इंग्लंड), सुनील गावस्कर व कपिल देव (भारत), नासेर हुसेन (इंग्लंड), इयान चॅपेल (ऑस्ट्रेलिया), मायकेल ब्रेअरली (इंग्लंड), अ‍ॅलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया), डेव्हिड गोव्हर (इंग्लंड) वर्किम ह्यूजेस (ऑस्ट्रेलिया), क्लाइव्ह लॉइड (वेस्ट इंडिज), स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया) आणि जॉन राइट (न्यूझीलंड) यांच्या स्वाक्षर्‍या पाकिस्तान सरकारला लिहिल्या पत्रावर आहेत. काही दिवसांपूर्वी एका वकिलाने न्यायालयात दावा केला होता की, इम्रान खान यांच्या उजव्या डोळ्यात फक्त 15% दृष्टी शिल्लक आहे. त्यांनी आरोप केला की, अधिकार्‍यांनी तीन महिन्यांपासून त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी काहीही केले नाही. आम्ही, आमच्या राष्ट्रीय क्रिकेट संघांचे माजी कर्णधार, पाकिस्तानचे प्रसिद्ध माजी कर्णधार आणि जागतिक क्रिकेटचे दिग्गज इम्रान खान यांच्या कथित वागणूक आणि तुरुंगातील परिस्थितीबद्दल खोलवर चिंता व्यक्त करत आहोत, असे पत्रात म्हटले आहे. इम्रान खान यांना तुरुंगात योग्य वागणूक मिळावी, अशी मागणीही पत्रात करण्यात आल्याचे वृत्त आहे. इम्रान खान जिवंत आहेत की नाहीत? असा प्रश्न गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात उपस्थित झाला होता. इम्रान खान यांच्या कथित मृत्यूच्या अफवांमुळे सध्या पाकिस्तानच्या राजकारणात आणि समाजात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यांना फाशी देण्यात आल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. इम्रान खान यांच्या तीन बहिणी, नूरीन खान, अलीम खान आणि उज्मा खान यांनी दावा केला होता की, त्यांना त्यांच्या भावाला भेटण्याची परवानगी दिली जात नाही. त्यांनी इम्रान खान यांना भेटू देण्याची मागणी केली तेव्हा पोलिसांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. एवढंच नाही, तर पोलिसांनी त्यांना मारहाणदेखील केली, असा गंभीर आरोप त्यांनी केला होता. या प्रकारामुळे इम्रान खान यांच्या सुरक्षेबद्दल आणि प्रकृतीबद्दलच्या चिंता वाढल्या होत्या. इम्रान खान यांच्या कथित मृत्यूच्या आणि त्यांच्या बहिणींना झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर, रावळपिंडी येथील आदियाला जेलबाहेर त्यांचे शेकडो समर्थक मोठ्या संख्येने जमले होते. जमावाने विद्यमान सरकार आणि प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली होती. इम्रान खान यांच्याबद्दल अधिकृत माहिती जाहीर करण्याची आणि त्यांच्या भेटीची सोय उपलब्ध करून देण्याची मागणी, हे समर्थक करीत होते. त्यानंतर इम्रान खान यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली होती. इम्रान खान यांना अनेक भ्रष्टाचार प्रकरणांत वेगवेगळ्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. क्केटमधून निवृत्त झाल्यानंतर इम्रान खान यांनी राजकारणात प्रवेश केला. सन 1996 साली त्यांनी तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाची स्थापना केली. सन 2018 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या. खान यांना सत्ता मिळाली. दि. 18 ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानचे ते 22 वे पंतप्रधान झाले. दि. 10 एप्रिल 2022 पर्यंत ते पंतप्रधान राहिले. अविश्वास ठरावामुळे त्यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक खटले भरण्यात आले. त्यात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. भारताच्या क्रिकेट जगतात जेव्हा सुनील गावस्कर, कपिल देव, मदनलाल, विश्वनाथ, किरमाणी, वेंगसरकर ही नावे चर्चेत होती, तेव्हा इम्रान खान यांचा उदय होत होता. इम्रान खान यांची कारकीर्द 1971 साली इंग्लंडविरुद्ध सुरू झाली. सन 1982 साली ते कर्णधार झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने 1992 साली विश्वचषक जिंकला. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांचा नावलौकिक होता. 88 कसोटी सामन्यांत 37.69 च्या सरासरीने 3,807 धावा, सहा शतके, 22.81 च्या सरासरीने 362 बळी, अशी त्यांची कसोटी कारकीर्द आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांतही त्यांची कारकीर्द लक्षवेधी आहे. 33.41 च्या सरासरीने 175 सामन्यांत 3,709 धावा, एक शतक, 26.62 च्या सरासरीने 182 बळी, अशी त्यांची एकदिवसीय सामन्यांची कारकीर्द आहे. त्या काळात टी-20 क्रिकेट नव्हते. क्केटमधील यशानंतर त्यांनी राजकारणातही यश संपादन केले. पण राजकारणामुळेच त्यांना तुरुंगवास भोगावा लागत आहे. त्यांची क्रिकेट कारकीर्द लक्षात घेऊन किंवा स्मरणात ठेवूनच माजी कर्णधारांना त्यांची कणव आली आहे. त्यांना तुरुंगात दिल्या जाणार्‍या कथित वागणुकीविषयी आणि त्यांच्या प्रकृतीविषयी माजी कर्णधारांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या, अशी विनवणी करण्यात आली आहे. इम्रान खान यांच्याप्रति माजी कर्णधारांनी एक मानवतावादी भूमिका घेतली आहे. इम्रान खान हेही क्रिकेटचे एक कर्णधार होते, याची जाणीव माजी कर्णधारांना झाली आहे.

Former captains’ plea

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *