हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे पराक्रमी सरदार होते, तर आई जिजाऊ माता यांनी बालपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कारांची पायाभरणी केली. जिजाऊ मातेचा शिवबा सह्याद्रीच्या कुशीत, आईच्या मायेत आणि मराठी मावळ्यांच्या संगतीत या मराठी मुलखात वाढला आणि जिजाऊ मातेने शिवबाला सर्वांत महत्त्वाचा व पवित्र असा महामंत्र दिला. तो महामंत्र म्हणजे, स्वाभिमान होय.
शिवबांच्या रक्तात आई जिजाऊ यांनी भिनविलेला हा महामंत्र त्यांनी मराठी माणसांच्या सह्याद्रीच्या मराठी मातीत भिनवायला सुरुवात केली आणि त्यात त्यांना यशही आले. स्वाभिमान या एका महामंत्राच्या जोरावर सवगड्यांच्या सोबतीने गनिमीकाव्याची मदत घेऊन शिवबांनी स्वराज्याची शपथ घेतली. विरोधही तेवढाच आणि जिवाला जीव देणारी माणसे तेवढीच. फक्त अनमोल असा एकच महामंत्र स्वाभिमान आणि एक ध्यास स्वराज्य. शिवबांनी तळहाताएवढ्या मातीवरदेखील हक्क नसलेल्या महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. असंख्य अडचणी, अतोनात कष्ट आणि वेळप्रसंगी मराठी रक्तही देऊन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई या शूर, देशभक्त आणि धार्मिक स्त्री होत्या. त्यांनी लहानपणापासूनच आपल्या शूर पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये देशभक्ती आणि नैतिकतेची भावना जागृत केली. याबरोबरच त्यांनी स्त्रियांबद्दल आदराची भावना निर्माण केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळजीसाठी कटिबद्ध राहिल्या. इतकेच नव्हे, तर राष्ट्रमाता जिजाबाईंनी आपल्या हुशार मुलाची क्षमता पाहून त्यांना रामायण व महाभारत या महाकाव्यांमधील वीरांच्या कथा सांगितल्या. त्यांच्यात प्रतिष्ठा, संयम, शौर्य आणि धर्मनिष्ठा यांसारखी मूल्ये रुजवली. छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्कृष्ट योद्धा होते. त्यांनी अनेक लढाया जिंकल्या आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली. त्यांची युद्धनीती अत्यंत प्रभावी होती. गनिमीकावा वापरून त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. त्यांनी स्वतःच्या सैन्याला कुशल प्रशिक्षण दिले आणि त्यांना आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. एक मजबूत आणि कार्यक्षम प्रशासन व्यवस्था निर्माण केली. रयतेचे कल्याण साधण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जमीन महसूल व्यवस्था, न्यायव्यवस्था आणि लष्करी व्यवस्था यांत सुधारणा केली. इ.स. 1674 मध्ये रायगडावर छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यांनी स्वतंत्र मराठा साम्राज्याची स्थापना केली. प्रशासन, नौदल उभारणी, गुप्तचर व्यवस्था आणि न्यायव्यवस्था यांसारख्या अनेक सुधारणा त्यांनी केल्या. त्यांची सेना आणि युद्धनीती आधुनिक भारतातील अनेक सैन्य तंत्रांचा पाया मानला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त एक योद्धा नव्हते, तर ते कुशल व्यवस्थापक, आदर्श राजा आणि स्वराज्याचे संस्थापक होते. त्यांचे धाडस, बुद्धिमत्ता आणि प्रशासनिक कौशल्य आजही अनेक लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून लोकांना स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार, लोककल्याणकारी धोरणे आणि धर्मनिरपेक्षतेची भूमिका आजच्या काळातही अनुकरणीय आहे. जिजाऊ मातेने पाहिलेले स्वराज्याचे स्वप्न शिवरायांनी प्रत्यक्षात आणले. स्वराज्य निर्माण केले. त्यांनी नुसते मुलुख, प्रदेश जिंकले नाहीत, तर प्रत्येकाच्या मनात स्वाभिमानाची, स्वातंत्र्याची एक ठिणगी पेटवली. नंतर अशा लाखो ठिणग्यांना एकत्र करूनच स्वराज्याची ज्योतिर्मय मशाल पेटवली, जी आजपर्यंत धगधगते. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील तेजस्वी सूर्य आहेत. त्यांचे जीवन धैर्य, नेतृत्व आणि राष्ट्रप्रेम यांचे उत्तम उदाहरण आहे.
आजच्या पिढीने त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणा, स्वाभिमान आणि देशसेवा हे मूल्य जपणे महत्त्वाचे आहे.‘शिवाजी’ या महामंत्रातच महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आहे. या तीन अक्षरांत पराक्रम आहे. निष्ठा आहे, शिस्त आहे, जिगर आहे. ज्वलंत व रसरशीत राष्ट्रीय अस्मिता आहे. होय ‘शिवाजी महाराज’ हे शब्द त्यांचं जीवनचरित्र सर्व मराठी माणसाला प्रेरक व स्फुरक आहे. अभिमानाने छाती भरून यावी, मान ताठ व्हावी असं एक व्यक्तिमत्त्व म्हणजे ‘छत्रपती शिवाजी महाराज’. छत्रपती शिवराय यांची जयंती काही फक्त साजरी करण्यासाठी नाही, तर त्यांचे विचार, त्यांचा स्वाभिमान अंगीकारण्याची गरज आहे. शेवटी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे, मावळे आणि जिजाऊमाता यांना कोटी-कोटी प्रणाम!

Chhatrapati Shivaji Maharaj, the founder of Hindavi Swarajya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *