इराणमधील इस्लामिक सत्तेच्या विरोधात स्थानिक लोकांमध्ये तीव्र असंतोष असल्याचे अलीकडे दिसून येत होते. इस्लामिक कायदे मोडून लोक रस्त्यांवर येऊन महागाईच्या विरोधात निदर्शने करत होते. त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खुला पाठिंबा दिला होता. इराणची धार्मिक सत्ता इस्रायलला धडा शिकवू पाहत होती. इस्रायलच्या पाठीशी असलेल्या अमेरिकेला धडा शिकवण्याची भाषा केली जात होती. चोख अण्वस्त्रे, बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रे इराणकडे असल्याची चिंता इस्रायल आणि अमेरिकेला भेडसावत होती. इराणने अणुकार्यक्रम सोडून द्यावा, हीच अमेरिकेची इच्छा होती. अणुकार्यक्रम सोडून देण्यास इराणची तयारीही नव्हती. अशाही परिस्थितीत अमेरिकेशी अणुकार्यक्रमावर द्विपक्षीय चर्चा करण्यास इराण तयार झाले. चर्चेच्या फेर्या सुरू असतानाही अमेरिकेने इराणला धमक्या देणे सुरू केले होते. चर्चा सुरू असतानाच अमेरिका आणि इस्रायलने शनिवारी (दि. 28 फेब्रुवारी) इराणवर संयुक्त हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनी ठार झाल्याचे वृत्त सर्वप्रथम इस्रायली माध्यमांनी दिले होते. त्याचा इन्कार इराणने करून खामेनी हे राजधानी तेहरानबाहेर सुरक्षित असल्याचे म्हटले होते. खामेनी हवाई हल्ल्यात ठार झाल्याची पुष्टी दुसर्या दिवशी मिळाली. हवाई हल्लेे केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणी लष्कराला व पोलिसांना शस्त्रे खाली ठेवून शरण येण्याचे आवाहन केले होते. शस्त्रे खाली ठेवा आणि शरणागती पत्करा, अन्यथा मृत्यूला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला होता. अणुकार्यक्रमावर चर्चा सुरू असतानाच इराणवर हल्ले करण्यात आले. यावरून ट्रम्प यांचा इरादा स्पष्ट होता. आपल्या नागरिकांच्या (इराणी) हितरक्षणासाठी कटिबद्ध आहे आणि इराणला कधीही अणुबॉम्ब विकसित करू दिला जाणार नाही. हे हल्ले इराणच्या अणुकार्यक्रमाचा पूर्णपणे नायनाट करण्याच्या उद्देशाने करण्यात आले आहेत, असेही ट्रम्प यांनी म्हटले होते. सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे प्रमुख मोहम्मद पाकपूर यांच्यासोबत खामेनींची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या ठिकाणीच हल्ला करण्यात आला. खामेनी यांचा माग इस्रायल आणि अमेरिका सतत काढत होते, असे वृत्त आहे. इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेला बैठकीची माहिती नक्कीच मिळाली असेल. त्यानंतरच हवाई हल्ले करण्यात आले. खामेनी यांना ठार मारण्याचा स्पष्ट इरादा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचा होता, हेच स्पष्ट झाले. अणुकार्यक्रमावरील चर्चा सुरू असतानाच ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी खामेनी यांचा खेळ खतम केला. खामेनी यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातील आणखी चार सदस्यांचाही मृत्यू झाल्याची पुष्टी इराणी माध्यमांनी केली. यात सून, मुलगी, जावई आणि नात यांचा समावेश आहे. खामेनी यांच्या निधनानंतर 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने अनेक अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले होते. हवाई हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च नेत्याचा कुटुंबासह अंत झाला, असे ट्रम्प यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले. खामेनी यांना इतिहासातील सर्वांत वाईट व्यक्तींमधील एक असेही ट्रम्प यांनी म्हटले. खामेनी यांच्यानंतर इराणचे पुढचे भवितव्य काय? प्रश्न आहे खामेनी मारले गेले असले, तरी अमेरिकेच्या ताब्यात इराण आलेला नाही. हवाई हल्ल्यांनंतर इराणने लागलीच इस्रायलवर प्रतिहल्लेे केले. याशिवाय इराणने सौदी अरेबिया, कतार, कुवेत, संयुक्त अरब अमिरातीसह सात देशांमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या पाठिंब्यावर हमास, हेझबुल्लाह, हौथी यांसारख्या दहशतवादी संघटना गप्प बसणार नाहीत. हंगामी धार्मिक नेते म्हणून अलीरेझा अराफी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवीन नेत्याची निवड नंतर केली जाईल. त्यात अमेरिका हस्तक्षेप करू शकणार नाही. मात्र, इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणला धोका कायमच राहणार आहे. इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियन यांनी इस्त्रायल व अमेरिकेचा बदला घेण्याची भाषा केली आहे. इराणमध्ये 1979 साली क्रांती झाली. इस्लामिक क्रांती म्हणून ती ओळखली जाते. या क्रांतीने शाह मोहम्मद रझा पहलवी यांच्या राजवंशाला उलथवून टाकले. इराणी लोकांना आता पुन्हा एकदा याच राजवंशाच्या वारसाकडे सत्ता द्यावीशी वाटत होते. क्राउन प्रिन्स म्हणून ओळखले जाणारे रझा पहलवी यांच्या हाती देशाची सूत्रे दिली जावीत, असे तेथील लोकांचे म्हणणे आहे. इराणमध्ये महागाई वाढली म्हणून लोक निदर्शने करत होते. लोकांना क्राउन पिन्स रझा पहलवी यांचा उघड पाठिंबा मिळत आहे. त्यांनाही तेथील इस्लामिक राजवट उलथवून टाकायची होती. त्यासाठी ते अमेरिकेची मदत घेण्यास मागेपुढे पाहत नव्हते. पॅलेस्टाइन-इस्रायल संघर्षात इराणने पॅलेस्टाइनची बाजू घेतली होती. आजही तीच भूमिका आहे. इराणमधील निदर्शनांना पाठिंबा देऊन ट्रम्प यांनी हल्ला करण्याची धमकी दिली होतीच. ट्रम्प यांची धमकी, त्यांनी निदर्शनांना दिलेला पाठिंबा, तसेच पहलवी यांना मिळत असलेले बळ पाहता इस्लामिक राजवट धोक्यात आली होती. शाह मोहम्मद रझा पहलवी यांना अयातुल्ला रुहोल्ला खामेनी यांच्या नेतृत्वाखाली व्यापक विरोध झाला होता. सन 1978 मध्ये मोठी निदर्शने झाली आणि संप सुरू झाले. 16 जानेवारी 1979 रोजी शाह पहलवी देश सोडून गेले, तर 1 फेब्रुवारी 1978 रोजी खामेनी फ्रान्सहून परतले. 11 फेब्रुवारीला तेहरानमधील चकमकीनंतर क्रांती यशस्वी झाली आणि इस्लामिक रिपब्लिकची स्थापना झाली. खामेनी यांना इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते म्हणून घोषित करण्यात आले. त्यांचे जून 1989 मध्ये निधन झाल्यानंतर अयातुल्ला अली खामेनी हे इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते झाले. 3 जून 1989 रोजी खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर अस्बेंली ऑफ एक्सपर्टस्ने खामेनींना नेतेपदावर नेमले. खामेनींनी 1981-89 दरम्यान राष्ट्रपती म्हणूनही काम केले होते. त्यांनी धार्मिक सत्तेची पायाभरणी केली होती. त्याच धार्मिक सत्तेला गेल्या दोन-तीन वर्षांपासून आव्हान दिले जात होते. क्राउन प्रिन्स रझा पहलवी यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक सत्ता खाली खेचण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. इराणमधील विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या महागाईमुळे जनतेचा संताप अनावर झाला होता. खामेनी यांच्या प्रशासनाने आंदोलन दडपण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले; परंतु आंदोलकांचा जोर कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता. रझा पहलवी यांनी इराणमध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रस्थापित व्हावी, अशी मागणी केली होती. रझा पहलवी हे इराणच्या राजघराण्यातील वारसदार आहेत. सन 1979 च्या ऐतिहासिक इस्लामिक क्रांतीपूर्वी ते इराणचे ‘क्राउन प्रिन्स’ म्हणून ओळखले जात होते. वयाच्या 17 व्या वर्षी ते लष्करी प्रशिक्षणासाठी अमेरिकेला गेले असताना इराणमध्ये सत्तापालट झाला आणि त्यांच्या कुटुंबाला देश सोडून परागंदा व्हावे लागले. तेव्हापासून ते निर्वासित जीवन जगत असून, सध्या अमेरिकेतून इराणमधील लोकशाहीसाठी प्रयत्न करत आहेत. निदर्शनांमध्ये काही आंदोलक जुन्या राजेशाहीच्या पुनरागमनाच्या घोषणा देत असल्याने सर्वांचे लक्ष पुन्हा एकदा पहलवी कुटुंबाकडे लागले होते. पहलवी यांच्या आवाहनानंतर तेहरानच्या रस्त्यांवर निदर्शक मोठी गर्दी करत होेते. ‘हुकूमशाही मुर्दाबाद’ आणि ‘इस्लामिक प्रजासत्ताक संपवा’ अशा घोषणाही दिल्या जात होत्या. निदर्शनांमध्ये 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे, तर 10,600 हून अधिक लोकांना अटक करण्यात आलेली आहे. यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. ट्रम्प यांच्या या भूमिकेचे रझा पहलवी यांनी स्वागत करून आभार मानले होते. आंदोलन सत्तापालटाच्या दिशेने जात आहे. याआधी 2022 साली इराणमध्ये महिलांनी हिजाबविरोधी आंदोलन करून हिजाब वापरणे बंद केले होते. इराणी महिला आता अत्यंत निर्भयपणे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या जळत्या फोटोंवरून सिगारेट पेटवताना दिसत होत्या. आपले हिजाब आणि स्कार्फही जाळताना महिला दिसत होत्या. इराणच्या कायद्यानुसार, सर्वोच्च नेत्याचा फोटो जाळणे हा राजद्रोहाचा गुन्हा असून, यासाठी फाशीची शिक्षाही होऊ शकते. तरीही मृत्यूची भीती सोडून महिलांनी अशा प्रकारे सिगारेट पेटवणे, हे तिथल्या धार्मिक राजवटीच्या अंताचे संकेत मानले जात होते. डिसेंबर 2025 च्या अखेरीस वाढत्या महागाईमुळे सुरू झालेली ही निदर्शने आता वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या मागणीसाठी उग्र रूप धारण करत होती. राजधानी तेहरानसह 27 प्रांतांमधील जनता रस्त्यावर उतरली होती. अयातुल्ला अली खामेनी यांनी या निदर्शनांसाठी थेट अमेरिका व इस्रायलला जबाबदार धरले होते. ‘दंगलखोरांना धडा शिकवा’ असे स्पष्ट आदेश त्यांनी सुरक्षा दलांना दिले होते. त्याचवेळी निदर्शकांची हत्या सहन केली जाणार नाही, असा इशारा ट्रम्प यांनी इराणी सरकारला दिला होता. धार्मिक सत्ता उलथवून टाकण्यासाठी क्राउन प्रिन्स रझा पहलवी निदर्शकांना पाठिंबा देत होते. इराणमधील सत्ता उद्ध्वस्त करण्याचा अमेरिकेचा इरादा होता. हवाई हल्ले पूर्वनियोजित असल्याचे दिसते. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीच्या आधारे हल्लेे करूनच खामेनी यांना संपविण्यात आले.
Game over