आखातातील संघर्ष चिघळत असल्याने तेल पुरवठ्याचा गंभीर जागतिक प्रश्न निर्माण झाला आहे. इराणवरील हल्ल्यांनंतर तेलाच्या किमती भडकल्या आहेत. जेथून तेलाची वाहतूक होत असते, ती हॉर्मझ सामुद्रधुनी इराणने बंद केल्याने वाहतूक बंद पडली आहे. पर्यायाने पुरवठा विस्कळीत होणार आहे. यांवर बुधवारी 4 मार्च रोजी ‘हॉर्मझ सामुद्रधुनी’ या मथळ्याखाली आम्ही याच सदरात परिस्थितीचे विवेचन केले होते. भारताकडे सध्या किती इंधनसाठा आहे आणि तो किती दिवस पुरेल, याची मोघम माहिती सरकारकडून दिली जात आहे. पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनांसाठी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा इंधनाठा आहे. भारताकडे 25 दिवस पुरेल इतका साठा आहे, असे सांगितले जात आहे. तेल आणि स्वयंपाकाचा गॅस आयातीत सुमारे अर्धा भाग होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे भारतात येतो. सुमारे 25 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा भारताकडे असल्याचे सांगितले जात आहे. साठा लगेच कमी होण्याची शक्यता कमी आहे, परंतु कच्च्या तेलाचे वाढते दर आणि जास्त वाहतूक खर्च व विमा खर्च भारताचे आयात बिल वाढवू शकेल तसेच महागाई वाढण्याची भीती आहेच. भारताकडे आपत्कालीन साठ्यासह सुमारे 100 दशलक्ष बॅरल साठा आहे. यामध्ये अतिरिक्त रिफाइंड उत्पादनांचे साठे जोडल्यास मोठा साठा तयार होतो. भारताने 31 मार्च 2025 पर्यंत संपलेल्या आर्थिक वर्षात क्रूड तेल आयातीस 137 अब्ज डॉलर खर्च केले. एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या पहिल्या 10 महिन्यांत 100.4 अब्ज डॉलर खर्च करून 206.3 दशलक्ष टन कच्चे तेल आयात केले. ही आकडेवारी पाहता, भारताकडे सध्या मोठी टंचाई नसली, तरी आखातातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत असून, तो थांबण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत भारतालाच नव्हे, तर जगाला तेलाची कमतरता भासेल. सध्याची संघर्षाची स्थिती पाहून रशियाने भारताला मदत करण्याची तयारी दर्शविली असल्याचे वृत्त आहे. भारताचा जुना मित्र रशिया मदतीला धावून येत असल्याचे यातून दिसत असले, तरी भारताने रशियाकडून तेल घेऊ नये, ही अमेरिकेची भूमिका आहे. युक्रेन युद्ध सुरू झाले तेव्हा भारताने रशियाकडून स्वस्तात तेल घेण्यास सुरुवात केली. भारताचा रशियाशी सुरू झालेला तेल व्यवहार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोळ्यांत खुपायला लागला. रशियाचे तेल खरेदी करून भारत युक्रेन युद्धाला मदत करत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. तरीही भारताने तेल खरेदी सुरू ठेवली होती. दरम्यानच्या काळात रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन भारताच्या चार दिवसांच्या दौर्यावर आले होते. रशियाकडून तेल खरेदी करणार्या देशांवर अतिरिक्त आयात शुल्क लादण्याचा इशारा देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारताने जुमानले नाही. भारताने रशियाकडून तेल घेणे थांबविले नाही. या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा चार दिवसांची भेट भारतासाठी चांगलीत फलदायी ठरली. कोणत्याही दबावाशिवाय भारताला तेलसाठे निर्यात करत राहणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पुतिन यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत केली होती. यानंतर भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबविण्याचा शब्द दिला असल्याचे ट्रम्प सांगू लागले. त्यावेळी भारताचा अमेरिकेशी व्यापार करार रखडलेला होता. आखात संघर्ष पेटण्यापूर्वी अंतरिम व्यापार करार झाला. भारताने रशियन तेल घेणे बंद केले असल्याचे त्यावेळी ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते. पण, भारताने ट्रम्प यांच्या दाव्याचा इन्कार केला नाही. अद्यापही केलेला नाही. जागतिक तेल संकट निर्माण झाले असताना रशिया भारताला तेल देऊ पाहत आहे. प्रश्न हाच आहे की, रशियाकडून तेल घ्यायचे की नाही? ट्रम्प नावाचा माणूस आडवा आला तर भारताची अडचण होऊ शकते. भारत-अमेरिका व्यापार करार अंतिम नाही. त्यात अमेरिकेने भारतावर आणखी शुल्क लादले तर? हा मोठा प्रश्न आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करू नये म्हणून अमेरिका व युरोपियन महासंघाने भारतावर सातत्याने दबाव टाकलेला होता. रशियन तेल खरेदी करून भारत हा रशियाला मदत करत आहे. अमेरिकेसोबत व्यापार करार रखडण्याचे हेच कारण होते. रशियाकडून भारतानेच नव्हे, तर ब्रिक्स संघटनेच्या देशांनी तेल घेऊ नये, अशीच अमेरिकेची भूमिका होती. ब्रिक्समध्ये रशिया, चीन, भारत, ब्राझील, दक्षिण आफ्रिका हे प्रमुख देश आहेत. युक्रेन युद्धाचे कारण पुढे करून अमेरिका आणि ब्रिटन हे देश रशियाची तेल निर्यात थांबविण्याचा प्रयत्न करत होते. त्याचा फटका भारताला बसू लागला होता. वारंवार धमक्या देऊनही भारताने रशियाचे तेल घेणे थांबविले नव्हते. युक्रेन युद्धा थांबावे, ही भारताची स्पष्ट भूमिका आहे. रशियाकडून मिळणारे स्वस्त तेल घेणे भारताने थांबविणे भारताला परवडणारे नव्हते. आखाती संघर्षानंतर रशियन तेल पुन्हा चर्चेत आले आहे. इराणवरील हल्ल्यांचा रशिया, चीनने निषेध केला. परंतु, भारताने निषेध केला नाही, तर अमेरिका, इस्रायल व इराणला संयम पाळण्याचे आवाहन केले होते. यामागे भारताची अमेरिका व इस्रायलशी असलेली जवळीक लपून राहत नाही. अशाही परिस्थितीत रशिया भारताला तेल देऊ इच्छित असेल तर भारताला विचार करावा लागेल. अमेरिकेने आडकाठी आणली किंवा ट्रम्प यांनी आयात शुल्क लादले किंवा लादण्याचा इशारा दिला तर काय करायचे? हा प्रश्न भारतासमोर उभा राहिला आहे. भारताची रशिया आणि अमेरिका या दोन परस्परविरोधी देशांशी मैत्री आहे. रशिया हा सर्वांत जुना मित्र आहे. अमेरिकेने आडकाठी आणली तर रशियाचे तेल घ्यायचे की नाही? याचा विचार भारताला करावा लागणार आहे.
Should I buy Russian oil?