भारताच्या सांस्कृतिक इतिहासातली रामराज्याची संकल्पना ही एक अतिप्राचीन संकल्पना आहे. रामायणाच्या माध्यमातून राज्यकर्ता म्हणून श्रीरामांच्या कर्तृत्वाचा उल्लेेख ’रामराज्य’ या एका शब्दातच गुंडाळला गेला आहे. रामायणाचा संपूर्ण भर हा श्रीरामांच्या केवळ वैयक्तिक चारित्र्यावर राहिला आहे. त्यामुळे मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाचा परिचय समाजाला चांगल्या प्रकारे झाल्याचे निदर्शनास येते. तशी रामराज्याची संकल्पना मात्र इथल्या समाजमनात पुरेशी झिरपलेली दिसत नाही.
रामायणकारांनी रामायणाचा हेतू इतका मर्यादित का ठेवला असेल हे कळायला मार्ग नाही. अर्थात, सर्वच रामायणकारांनी रामराज्याची संकल्पना अशी अनुल्लेखाने मारली असेल यावर विश्वास ठेवता येत नाही. कदाचित रामायणानंतरच्या काळातल्या सत्ताधीश राज्यकर्त्यांना रामायणातील रामराज्याची संकल्पना अडचणीची ठरली असावी. त्यामुळे त्यांनी पुढच्या काळात रामायणातून रामराज्याची संकल्पना निष्काषित केली असावी असं मानण्यास पुष्कळसा वाव आहे.
श्रीरामांच्या कथा ऐकत मोठे झालेले छत्रपती शिवाजी महाराज हे बळीराजानंतरचे रयतेचे एकमेव राजे होते, अशी एक ऐतिहासिक साक्ष सर्वांमुखी ऐकायला मिळते. त्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. समाजातल्या अनिष्ट प्रथा झुगारून दिल्या. अंधश्रद्धेेला मूठमाती दिली. कोणत्याही जाती वा धर्मभेदाला राजाश्रय न देता सामाजिक सलोखा निर्माण केला. बुद्धी, चातुर्य, कला, क्रीडा व साहित्याचा नेहमी सन्मान केला. श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. सर्वसामान्य रयतेचा आत्मसन्मान कायम जागृत ठेवला. श्रीरामांना अपेक्षित असणारे रामराज्य कदाचित हेच असावे!
विसाव्या शतकाच्या मध्यावर भारत परकीय सत्तेच्या जोखडातून मुक्त झाला. भारताने लोकशाही राज्यपद्धतीचा स्वीकार केला. राजे-रजवाड्यांचा काळ संपला. लोकप्रतिनिधींचे राज्य सुरू झाले. पुन्हा एकदा भारतभर रामराज्याची चर्चा होऊ लागली. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार या गोष्टींना प्राधान्य मिळणे स्वाभाविक होते. त्याप्रमाणे जनतेचे लोकप्रतिनिधित्व करणार्या राज्यकर्त्यांनी पावले उचलली. भारताला जागतिक महासत्तेची स्वप्ने पडू लागली. या सगळ्या वैश्विक गदारोळात देशातला सामान्य माणूस मात्र सत्तेच्या केंद्रस्थानी राहिला नाही. परिणामी रामराज्याची संकल्पना हे एक अवास्तव स्वप्न बनून ते अप्राप्तच राहिले. दरम्यानच्या काळात सरकारकडून आदर्श गाव योजना आणल्या गेल्या. त्यांची भरपूर चर्चा झाली. अनेक गावांना आदर्श पुरस्काराने गौरवण्यात आलं. त्या गावातल्या मूलभूत भौतिक सुविधा वाढल्या; पण ती गावं आदर्श झाल्याचे दिसले नाही. असं का झालं? या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न केला असता आपला बेसिकमध्येच लोच्या झाला असल्याचं लक्षात येतं. गाव म्हणजे गावातील फक्त रस्ते, इमारती किंवा सोई-सुविधा असं समजून आपण गावाला आदर्श करण्याचा प्रयत्न केला. हीच आपली मोठी घोडचूक ठरली. वास्तविक गाव म्हणजे गावातील माणसे! हे समजून घेण्यात आपण कमी पडलो.
काही वर्षांपूर्वी सरकारने सुरू केलेल्या सांसद आदर्श ग्राम योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्यांनी आयोजित केलेल्या एका बैठकीत मी योजनेचा राज्यस्तरीय प्रशिक्षक या नात्याने उपस्थित होतो. गावचे निवडक नागरिक व खासदार या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीतल्या माझ्या बीजभाषणात मी गाव म्हणजे गावातील माणसे! असं सांगून या योजनेमधून आपल्याला या गावातली माणसं आदर्श बनवायची आहेत. मी सांगितलं- आपल्या गावातली माणसं संविधानातली समानता, बंधुता आणि न्यायाचा अवलंब करतील. गावात जात, धर्म, वर्ग, लिंग व उत्पन्नाच्या आधाराने कोणताही भेदभाव केला जाणार नाही. गावातील नागरिक कोणताही सरकारी कर चुकवणार नाहीत. विजेची चोरी करणार नाहीत. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करतील. गावातली शाळेत जाण्याच्या वयातली सर्व बालके शाळेत जातील. त्यांचे सर्व प्रकारचे लसीकरण नियमितपणे करण्यात गावकरी पुढाकार घेतील. सरकारच्या सर्व योजनांचे लाभ योग्य लाभार्थ्यांना मिळावेत यासाठी गावकरी प्रयत्न करतील. गावात वाचनसंस्कृती व बचतसंस्कृती रुजवली जाईल. गावात बालविवाह व स्त्रीभ्रूणहत्या होणार नाहीत. सर्वजण कायद्यांचं काटेकोर पालन करतील आणि गावच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कामात गावकर्यांचा सक्रिय सहभाग राहिल.
माझ्या बीजभाषणानंतर बैठकीत एकदम सन्नाटा पसरला होता. अशीच योजना असेल तर ती आम्हाला मुळीच नको! असा भाव उपस्थित गावकर्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. गावगाड्याविषयी अनेक विचारवंतांनी नोंदविलेली मतं अभ्यासल्यानंतर गावांत रामराज्य निर्माण करणं किती दुर्लभ आहे याचा प्रत्ययकारी अनुभव येतो.
गाव ही अनेकदा अहंकार आणि दहशतीने चालवली जाणारी एक व्यवस्था असते. भावकीतले वाद गावकीवर अपरिहार्यपणे काही ना काही परिणाम करीतच असतात. गावपातळीवरच्या निवडणुकीत लोकशाही प्रक्रिया कमी आणि व्यक्तिगत युद्धच अधिक असते. एकाच जातीचे लोक गावात राहत असले तरी त्यांच्यात अनेक अंतर्विरोध असतात. गावात प्रगती करणारा एखादा माणूस त्या गावासाठी प्रेरणा ठरण्याऐवजी धोका ठरतो. आपल्या पुढे कुणीही जाऊ नये, ही भावना गावात मोठ्या प्रमाणात रुजलेली असते.
गावातल्या महिलांची स्थिती बिकट असते. चूल आणि मूल हाच प्रकार अजूनही गावात सर्रास सुरू आहे. गावाला आधुनिकतेचा वारा लागलेला असला तरी गावकर्यांचे विचार आधुनिक झालेले दिसत नाहीत. गाव वाईट नाही, पण गाव एक बंदिस्त व्यवस्था आहे. जोपर्यंत हे विचार बदलत नाहीत, तोपर्यंत गावांची परिस्थिती बदलून तिथे रामराज्य येणं अशक्य आहे. याची जाणीव मनाच्या आत खोलवर झिरपत जाते. हे चित्र बदलायला हवं हे खरंच, पण कोण बदलणार हे चित्र? खरंतर रामराज्य ही काही राजकीय व्यवस्था नाही, ती मुख्यत्वे नैतिक आणि सामाजिक व्यवस्था आहे. ती निर्माण होण्यासाठी गावांमध्ये न्याय्य, नेतृत्व आणि समानतेवर विश्वास असलेले जागृत नागरिक असायला हवेत. त्यांना स्वातंत्र्याची जबाबदारी आणि परस्पर सन्मानाचं आकलन असणं आवश्यक आहे. सर्वार्ंत महत्त्वाचं म्हणजे, हा बदल घडवण्यासाठी शासनापेक्षा समाजानेच सामूहिक पुढाकार घ्यायला हवा.
Why doesn’t the concept of Ram Rajya permeate the minds of society?