आरटीओची कारवाई; दुचाकीस्वारांकडून सव्वातीन लाख
मालेगाव : प्रतिनिधी
येथील उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांविरोधात विशेष मोहीम राबवली. गेल्या वर्षभरात विविध कारवायांतून सुमारे दोन कोटी 49 लाखांचा दंड वसूल केला आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई करूनही काही वाहनचालकांमधील बेशिस्तपणा अद्याप कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मालेगाव उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यक्षेत्रात मालेगाव, बागलाण, देवळा, कळवण आणि नांदगाव या पाच तालुक्यांचा समावेश आहे. या सर्व तालुक्यांमध्ये वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच वाहनचालकांनी सुरक्षितपणे वाहन चालवावे, यासाठी विभागाकडून नियमितपणे जनजागृती मोहीमही राबविण्यात येते, तरीही अनेक वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवत असल्याचे कारवाईदरम्यान आढळून आले आहे.
आरटीओ विभागाने विनाहेल्मेट दुचाकी प्रवास, मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे, नियमबाह्य वाहतूक व इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला आहे. या मोहिमेत गेल्या वर्षभरात एक हजार 518 अवजड वाहनांवर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई केली. त्यातून मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला आहे.
राज्यात दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटसक्तीचा नियम लागू करण्यात आला असला तरी अनेक जण या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कारवाईत चार हजार दुचाकीस्वार आढळून आले. यात दोन हजार 276 स्वार, तसेच दुचाकीवर मागे बसलेल्या 77 विनाहेल्मेट प्रवाशांचा समावेश आहे. या सर्वांकडून सुमारे सव्वातीन लाख रुपयांच्या आसपास दंड वसूल करण्यात आला आहे. नियमभंग करणार्यांविरोधातील ही कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दंड भरण्यासाठी ई-चलन पद्धत
वाहतूक विभागाने काळानुरूप तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देत
ई-चलन ही ऑनलाइन पद्धत सुरू केली आहे. या प्रणालीमुळे नियमभंग करणार्या वाहनचालकांना त्यांच्या मोबाइलवर थेट दंडाची नोटीस पाठविण्यात येते. दंड भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्याने वाहनचालकांना सोय झाली आहे. सध्या दंडात्मक कारवाई झालेल्या वाहनचालकांपैकी 20 ते 25 टक्के वाहनचालक ऑनलाइन पद्धतीने दंड भरत आहेत, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली.
Malegaon collects fine of Rs 2.5 crore in a year