कौटुंबिक वादातून मुलाने बापाच्या पोटात खुपसला चाकू

महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर वडिलांचा अंत

पंचवटी : प्रतिनिधी
पंचवटीतील पेठरोड भागातील नवनाथनगरमध्ये एका मुलाने आपल्याच जन्मदात्या वडिलांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 65 वर्षीय वडिलांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पंचवटी पोलिसांनी संशयित आरोपी मुलाला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेठ रोडवरील रोकडे चाळ परिसरात सखाराम पंडित भावसार (वय 65) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होते. 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास सखाराम भावसार आणि त्यांचा मुलगा अश्विन भावसार (वय 35) यांच्यात कौटुंबिक कारणावरून जोरदार खडाजंगी झाली.
वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या अश्विनने जवळ असलेला चाकू वडील सखाराम यांच्या पोटात डाव्या बाजूला खुपसला. या हल्ल्यात सखाराम भावसार गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या दीड महिन्यापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाला आता हत्येचे स्वरूप प्राप्त झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ, शरद पाटील, उपनिरीक्षक पंकज सोनवणे आणि हवालदार केशव भोये करत आहेत.

Son stabs father in stomach over family dispute

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *