दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील निगडोळ येथील शेतकरी योगेश मालसाने यांच्या द्राक्षबागेतील तीनशे वेलींवरील द्राक्षचोरी गेल्याने त्यांचे अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले. याचा तक्रार अर्ज दिंडोरी पोलीस ठाण्यात देऊन आठ दिवस झाले तरी दिंडोरी पोलीस अजूनही पंचनाम्यासाठी सदर द्राक्षबागेत गेलेले नाहीत. संबंधित शेतकरी तीन वेळा दिंडोरी पोलीस ठाण्यात जाऊन आले. मात्र, अजूनही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. या शेतकर्याला न्याय कधी मिळणार, अशी चर्चा तालुकाभर होत आहे. द्राक्ष बागायतदारांवर मोठे संकट निर्माण झालेले असताना, द्राक्षबागेतून 300 वेलींवरील द्राक्षे चोरीला जातात व चार लाखांचे नुकसान होणे फार गंभीर असूनही याची दखल घेतली जात नाही. मागील वर्षीही याच शेतकर्याच्या शेतातून द्राक्षाची चोरी तसेच स्प्रे पाइप, पीव्हीसी पाइप, द्राक्ष फवारणीसाठी वापरले जाणारे डिझेल इंजिन आदींची चोरी झाली होती. त्यावेळी दिंडोरी पोलीस ठाण्यालाही तक्रारी अर्ज दिलेला असताना त्याचीही दखल घेतली गेलेली नाही. आता तीनशे वेलींवरील द्राक्षे चोरी गेल्याने त्यांचे अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले. मात्र, तक्रारीत मटक्याचा उल्लेख केल्यामुळे कदाचित पोलीस सदर चोरी प्रकरणाची दखल घेत नाहीत की काय? असा प्रश्न शेतकर्याला पडला आहे. दिंडोरी तालुक्यासह शहरातील अवैद्यधंद्यांवर सर्वच माध्यम प्रतिनिधींनी आवाज उठवल्यानंतर दिंडोरीत अनेक ठिकाणी छापे मारण्यास सुरुवात झाली असली, तरीही ग्रामीण भागात अजूनही अवैध धंदे जोरात चालू आहेत. त्यामुळे यावर कधी कारवाई होणार की नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे.
दोन दिवसांपूर्वीच दिंडोरी शहरासह तालुक्यातील अनेक तक्रारींसंदर्भात दिंडोरी-पेठचे उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी बैठक बोलावली होती. सर्व अधिकार्यांना लेखी पत्र देऊनही अनेक अधिकारी बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. सदर बैठकीमध्ये माजी आमदार रामदास चारोस्कर, युवानेते गोकुळ झिरवाळ यांनी पोलीस प्रशासनावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. मात्र, निगडोळ येथील घटनेवरून पोलीस प्रशासनाकडून शेतकर्याला अजून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे तालुक्यात उलटसुलट चर्चा होत आहे.
दिंडोरी पोलिसांची तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ
माझ्या बागेतील द्राक्षांची चोरी होऊन आठ दिवस झाले आहेत. लेखी तक्रार केली आहे. तीन वेळा दिंडोरी पोलीस ठाण्यातही तक्रार ऑनलाइन करण्यासाठी गेलो. मात्र, साहेब नाहीत, उद्या या, असे सांगून तीन वेळा मला परत पाठवले. माझ्या द्राक्षबागेचा पंचनामा का केला नाही, हेच समजत नाही. माझ्या शेतात दोन वेळा चोरी झालेली आहे. मात्र, पोलीस दखल घेत नाहीत.
– योगेश मालसाने, शेतकरी, निगडोळ
Grapes stolen from 300 vines in farmer’s orchard